आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजस्थान सत्तासंघर्ष:मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांना जैसलमेरला हलवले, राजस्थानात काँग्रेसला आता घोडेबाजाराची धास्ती

जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फूट टाळण्यासाठी तुम्ही कुठपर्यंत पळाल : भाजप

राजस्थानमधील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांना जयपूरहून ५७० किमी दूर जैसलमेरला हलवले आहे. १४ ऑगस्टला विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते येथेच थांबतील. किल्ल्यासारख्या कडेकोट हॉटेलमध्ये या आमदारांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी यावर गमतीशीर टोला लगावत विचारले, गहलोत कुठपर्यंत पळाल. जैसलमेरच्या पुढे तर पाकिस्तान आहे.

दुसरीकडे, अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यानंतर आमदारांना खरेदी-विक्रीसाठी फोन येत असल्याचा दावा गहलोत यांनी एक दिवसाआधी केला होता. यामुळे आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठीच त्यांना जैसलमेरला पाठवण्यात आल्याचे मानले जात आहे. वृत्तांनुसार, तीन चार्टर्ड विमानांमधून एकूण ९७ आमदार जैसलमेरमध्ये दाखल झाले. ते १४ जुलैपासून जयपूरमधील फेअरमोंट हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान, अशोक गहलोत यांनी भाजपवर फोडाफोडीवरून परखड टीका केली. ते म्हणाले, तेलगू देसम पार्टीच्या चार राज्यसभा सदस्यांना एका रात्रीतून आपल्या पक्षात सामील करून घेणे भाजपला त्या वेळी योग्य वाटले. मात्र बसपच्या सहा आमदारांचा काँग्रेस प्रवेश आता चुकीचा ठरवला जात आहे. तसेच मायावतींचे नाव न घेता त्या भाजपच्या इशाऱ्यावरूनच विधाने करत असल्याचा आरोप गहलोत यांनी केला.

अपात्रतेबाबत काँग्रेसचे सुप्रीम कोर्टात अपील
सचिन पायलट यांच्यासह १९ बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईस स्थगिती देण्याच्या हायकोर्टाच्या निकालाविरुद्ध काँग्रेसने सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. सभापतींनी अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन हा निर्णय घेतल्याचा काँग्रेसचा दावा आहे.