आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Children Suffering From Serious Illnesses Will Be Vaccinated First News And Live Updates

मुलांची लस 2 आठवड्यांत:2 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी दोन वेगवेगळ्या लसी येणार; आधी गंभीर आजाराने ग्रस्त मुलांना लस देण्यात येणार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबरमध्ये कोव्हॅक्सिनचे 5.5 कोटी, झायकोव्ह-डीचे 1 कोटी डोस

देशात मुलांनाही पुढील २ आठवड्यांत लस मिळू लागेल. कोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने २ ते १७ वर्षीय मुलांवर चाचण्या पूर्ण केल्या आहेत. तज्ज्ञ त्याच्या निष्कर्षांचे विश्लेषण करत आहेत. पुढील आठवड्यात दुसऱ्या व तिच्या टप्प्यातील ट्रायलचे निकाल सरकारकडे सोपवले जातील. मंजुरी मिळताच मुलांचे लसीकरण सुरू होईल. दुसरीकडे, झायडस कॅडिलाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झायकोव्ह-डी लस आणू, असा दावा केला आहे. त्याला सरकारची मंजुरीही मिळाली आहे. चाचण्यांत ही लस १२ वर्षांवरील मुलांसाठी सुरक्षित आढळली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देशात मुलांसाठी २ लसी उपलब्ध होतील. दिवाळीपूर्वी दोन्ही कंपन्यांचे एकूण ६.५ कोटी डोस तयार असतील.

व्हॅक्सिन मैत्री पुन्हा सुरू केल्याने डब्ल्यूएचओ म्हणाले - धन्यवाद भारत
नवी दिल्ली | व्हॅक्सिन मैत्री कार्यक्रम पुन्हा सुरू केल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) सरचिटणीस डॉ. टेड्रोस एडेनॉम गॅब्रिएसस यांनी भारताचे आभार मानले आहेत. भारताने नुकतेच कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत पुन्हा लस निर्यात सुरू करण्याची घोषणा केली आहे. गॅब्रिएसस म्हणाले, भारताने आॅक्टोबरपासून कोव्हॅक्ससाठी कोरोना लस शिपमेंट सुरू करण्याची घोषणा केली अाहे. यासाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडवियांचे धन्यवाद. भारताचे हे पाऊल वर्षअखेरपर्यंत जगात ४०% लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.

पहिली : कोव्हॅक्सिन - २ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना देणार
दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण. पुढील आठवड्यात चाचण्यांचे निकाल सरकारकडे सोपवून मंजुरीची परवानगी मागितली जाईल. सूत्रांनुसार, चाचण्यांत कोव्हॅक्सिन मुलांसाठी हानिकारक सिद्ध झालेली नाही. यामुळे लसीला तत्काळ मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हीच लस प्रौढांनाही दिली जात आहे. प्रौढांना एकूण ९.५४ कोटी डोस दिलेले आहेत. ऑक्टोबरमध्ये एकूण ५.५ कोटी डोस तयार करण्याचा दावा केला गेला आहे.

दुसरी : झायकोव्ह-डी - ही लस १२ वर्षांवरील मुलांसाठी असेल
या लसीला सरकारने मंजुरी िदली अाहे. महिनाअखेरीस कंपनी लसीची पहिली खेप तयार करेल. त्याच्या एक-दोन दिवसांनंतर सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीकडून (सीडीएल) तपासणी करून लस राज्यांना पाठवली जाईल. तीन डोस असलेली ही एकमेव लस आहे. तीदेखील स्वदेशी लस आहे. ही लस झायडस कॅडिलाने तयार केली आहे. ऑक्टोबरमध्ये लसीचे १ कोटी डोस मिळण्याचा दावा आहे.

मात्र किंमत निश्चित नाही...
मुलांना दिल्या जाणाऱ्या काेरोना प्रतिबंधक लसींच्या किमती अद्याप ठरलेल्या नाहीत. उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी लस निर्माता कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत दरांबाबत दोन बैठका घेतलेल्या आहेत. सरकार या लसी कंपन्यांकडून कोणत्या दराने घेईल, खासगी रुग्णालयांना ती काय दराने मिळेल हे ठरवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...