आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी लोन अ‍ॅप रॅकेटचा पर्दाफाश:कर्जाच्या वसुलीसाठी पाठवत होते महिलांचे न्यूड फोटो, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून चीन व दुबईत करत होते गुंतवणूक

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनी लोन अॅप रॅकेटविरोधात देशात प्रथमच मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी देशभरात छापेमारी करुन जबरी वसुली करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह 8 संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सर्वच संशयित क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून चीन, हाँगकाँग व दुबईत पैशाची गुंतवणूक करत होते. छापेमारीत 25 हून अधिक बँक खात्यांची पडताळणी करण्यात आली. त्यात एका खात्यातून जबरदस्तीने वसूल करण्यात आलेली 8.25 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक एसयूव्ही, लॅपटॉप, डझनभर डेबिट कार्ड व पासबूकही जप्त करण्यात आलेत.

पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी इंटेलिजेंस फ्यूजन व स्ट्रॅटेजिक ऑपरेशंस युनिटला या टोळीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, डीसीपी (विशष विभाग) के.पी.एस. मल्होत्रा यांच्या नेतृत्वातील एका पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

आरोपींना दिल्ली, हरयाणा, राजस्थानातून अटक

अनेक आठवड्यांपर्यंत चाललेला तांत्रिक तपास व गुप्तहेर माहितीनंतर एसीपी रमन लांबा, पोलिस निरीक्षक मनोज व पोलिसांच्या इतर पथकांनी दिल्ली, हरयाणा, राजस्थान व देशाच्या इतर भागातून संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले मोबाईल व अन्य साधन सामग्री जप्त करण्यात आली आहे.

जबरी वसुलीसाठी पाठवत होते न्यूड फोटो

जप्त करण्यात आलेल्या गॅजेट्सची तपासणी केली असता आरोपी महिलांच्या छायाचित्रांशी छेडछाड करत असल्याचे निष्पन्न झाले. ते या मॉर्फ करण्यात आलेल्या नग्न छायाचित्रांचा वापर जबरी वसुलीसाठी करत होते. दिल्ली पोलिस या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा तपासून पाहण्यासाठी अंमलबजावणी संचलनालय व प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधणार आहे. या टोळीने आपल्या अॅपच्या माध्यमातून लोन दिले व त्यानंतर 10 ते 20 पट अधिक पैसा वसूल केला. कर्जाची परतफेड करण्यास विलंब झाल्यानंतर त्यांनी पीडितांना धमकावले, शिविगाळ केली व बदनाम केले, असे पोलिसांनी सांगितले.

म्होरक्याला जोधपूर येथून अटक

या टोळीच्या कृष्णा उर्फ रवीशंकर नामक म्होरक्याला राजस्थानच्या जोधपूर येथून अटक करण्यात आली आहे. त्याने एका संशयित चिनी व्यक्तीसोबत काम केले होते. या प्रकरणी त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. कृष्णा आपल्या कथित चिनी सहकाऱ्याला बँक खात्यांचे डिटेल्स दिले. त्यानंतर वसूल करण्यात आलेला पैसा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून चीनला पाठवला. या प्रकरणी 3 चिनी नागरिकांच्या क्रिप्टो खात्यांची ओळख पटवण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींत कार्तिक पांचाळ नामक व्यक्तीचा समावेश आहे. हा व्यक्ती कर्ज हवे असलेल्या किंवा घेतलेल्या पीडितांशी संपर्क साधण्यासाठी कॉलर्सची टीम चालवत होता, असे मल्होत्रा यांनी सांगितले.

6 हजाराचे द्यावे लागत होते 40 हजार

पोलिस तपासात ही टोळी पीडितांना विना केवायसी कर्ज देत असल्याचे निष्पन्न झाले होते. ते कर्ज अत्यंत कमी वेळात देण्याचे आश्वासन देत होते. पण, त्यानंतर विविध शुल्कांचे कारण देऊन कर्जाची पूर्ण रकम देण्यास टाळाटाळ करत होते. उदाहरणार्थ, त्यांनी कर्ज म्हणून 6 हजार देऊन त्यातील जवळपास 2300 रुपये शुल्क म्हणून कापत होते. यामुळे पीडितांना अवघे 3700 रुपये मिळत होते. या प्रकरणी पीडितांना 6 हजार रुपयांचे 30 हजार ते 60 हजार रुपयांची परतफेड करावी लागत होती.

बातम्या आणखी आहेत...