आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बिहारमध्ये लाेजपा वाढल्यास भाजप, महाआघाडीला लाभ

नवी दिल्ली / धर्मेंद्रसिंह भदाैरिया2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी वडिलांना मुखाग्नी देताना चिराग काेसळले. या दरम्यान लाेकांनी आधार देऊन अंत्यसंस्कार पूर्ण केले. - Divya Marathi
शनिवारी वडिलांना मुखाग्नी देताना चिराग काेसळले. या दरम्यान लाेकांनी आधार देऊन अंत्यसंस्कार पूर्ण केले.
  • रामविलास पासवान यांच्या पश्चात चिराग यांचा मार्ग किती सुकर, किती कठीण?

चिराग पासवान यांची लाेकजनशक्ती पार्टी (लाेजपा) महाआघाडी किंवा जनता दल युनायटेड (जदयू) यापैकी काेणासाठी सर्वाधिक नुकसानकारक ठरेल? हाच सध्या बिहार विधानसभा निवडणुकीतील महाप्रश्न ठरलाय. भाजपच्या निवडक जागा वगळता विराेधात उमेदवार उतरवणार नसल्याची ग्वाही चिराग यांनी दिल्याने भाजपची हानी हाेणार नाही. पहिल्या टप्प्यातील ७१ जागांपैकी लाेजपाने ४२ उमेदवारांची घाेषणा केली आहे. त्यापैकी सर्वाधिक ३५ उमेदवारांना जदयूच्या उमेदवारांसमाेर मैदानात उतरवले आहे. लाेजपा जदयूचे माेठे नुकसान करेल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते महाआघाडीचे तुलनेने नुकसान कमी हाेईल.

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसाेबत लाेजपाने ४२ जागांवर आपले उमेदवार उतरवले हाेते. त्यापैकी दाेघांचा विजय झाला हाेता आणि ३६ उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले हाेते. ३६ जागांवर लाेजपा दुसऱ्या क्रमांकावर राहिली हाेती. त्यापैकी २१ जागा जदयूने जिंकल्या हाेत्या. तेव्हा राष्ट्रीय जनता दलाने (राजद) ८, तर काँग्रेसने ६ जागी विजय मिळवला हाेता. सीएसडीएसचे प्राेफेसर संजय कुमार म्हणाले, लाेजपाचे उमेदवार उतरल्याने महाआघाडीची हानी हाेण्याची शक्यता फार कमी आहे. काही कडव्या झुंजी हाेतील. त्यात चिराग यांचे उमेदवार जदयूचे नुकसान करतील. त्यामुळे महाआघाडी व भाजपचा फायदा हाेऊ शकताे. बिहारमधील जवळपास सर्वच विधानसभेत लाेजपाचे किमान ५ त १० हजारांवर समर्पित मतदार आहेत. त्यामुळे फटका बसणार आहे. हे निश्चित. लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत उमेदवार कमी असताना देखील लाेजपाचा मतांचा टक्का ५ टक्के राहिला. म्हणूनच लाेजपामुळे जदयूला २० हून जास्त जागांचा फटका बसू शकताे, असे मला वाटते.

दुसरीकडे जदयूचे मुख्य सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते के. सी. त्यागी लाेजपामुळे काही फटका बसेल, हा तर्क फेटाळून लावतात. बिहारमधील निवडणूक नितीश कुमार हवे किंवा नाही, यावर हाेत आहे. मतदारांच्या मनात एकच गाेष्ट आहे. गेल्या १५ वर्षांत केलेला विकास लाेकांना ठाऊक आहे. लाेक ही गाेष्ट पाहतात. बिहारमध्ये जदयू, भाजप व राजद हे तीन प्रमुख आहेत. त्यापैकी दाेन पक्ष एकत्र आल्यानंतर तेच निवडणुकीत विजयी हाेतात. गेल्यावेळी जदयू व राजद हाेते. तेच विजयी झाले. यंदा जदयू व भाजप आहे. तेच जिंकतील. महाआघाडीसाेबतच मुकाबला आहे. लाेजपा काही फॅक्टर नाही, असे त्यागी यांनी सांगितले.भाजपच्या बंडखाेर उमेदवारांसंबंधी (आता लाेजपचे उमेदवार) संजय कुमार म्हणाले, भाजपचा स्ट्राइक रेट जदयूपेक्षा चांगला राहू शकताे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप व जदयूच्या विजयी जागांतील फरक ८ ते १० जागांदरम्यान राहिल्यास नितीश यांना काही अडचण नसेल. परंतु, फरक २० जागांहून जास्त राहिल्यास परिस्थिती बदलू शकते. भाजप नितीश कुमार यांच्यावर दबाव वाढवू शकते. भाजप २०२० ची निवडणूक लढवत असली तरी पक्षाची नजर २०२५ वर आहे. २०२० मध्ये पक्षाने जदयूला खूप मागे टाकून पुढे निघून जायला हवे, असे भाजपला वाटत असावे. रामविलास पासवान यांच्या निधनानंतरच्या परिणामाबद्दल संजय कुमार म्हणाले, सहानुभूती जरूर असेल. परंतु, त्याची क्राॅस कास्ट अपील असेल, ही शक्यता कमी दिसते.

बातम्या आणखी आहेत...