आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोज मुंतशिर यांचा स्वातंत्र्य दिनी संदेश:मी भारत आहे मला वेदांच्या ऋचांनी जन्म दिला आहे; माझ्या माथ्यावर स्वातंत्र्याचा 75 वा सूर्य चमकणार आहे, कारण माझ्या मनात शहिदांच्या समाध्या आहेत

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी भारत आहे, मला वेदांच्या ऋचांनी जन्म दिला आहे माझी ओळख देण्यासाठी एवढेच पुरेसे आहे की अमृतस्वरूपा गंगा माझी आई आहे. मी ऋषींच्या आश्रमात वाढलो आहे युगपुरुषांचे बोट धरून चालत आहे आणि संघर्षांच्या प्रचंड अग्नीत पाेळलाे आहे.’

माझ्या इतिहासाचे पहिले पान तेव्हा लिहिले गेले होते, जेव्हा माणसाने वेळेची दिवस आणि तारखेत वाटणी करणे शिकले नव्हते. दहा हजार वर्षांपूर्वी माझी पायाभरणी सुरू झाली होती, पण एवढा जुना इतिहास सिद्ध करण्यासाठी आज माझ्याकडे पुरावे नाहीत.

सिंधू खोऱ्याच्या संस्कृतीला तर ३४०० वर्षेच झाली, मग मी १० हजार वर्षांच्या इतिहासाचा दावा का करतो, असा प्रश्न लोक उपस्थित करतात. मी त्या इतिहासकारांना काय उत्तर देऊ, जे दगड-विटांच्या पुराव्यांशिवाय बहिरे होतात!

३४०० वर्षांपूर्वीचे अवशेष तर त्यांना दिसतात, पण ५००० वर्षांपूर्वी, कुरुक्षेत्रात शस्त्र खाली ठेवलेल्या अर्जुनाला गीतेचे ज्ञान देणारे कृष्ण दिसत नाहीत, ७००० वर्षांपूर्वी शरयूच्या किनाऱ्यावर सूर्याला अर्घ्य देणारे श्रीराम दिसत नाहीत आणि ८००० वर्षांपूर्वी रचण्यात आलेल्या ऋग्वेदाच्या ऋचा दिसत नाहीत.

आज मानचित्रावर माझी जी प्रतिमा आहे, मी तसा नव्हतो. अनेक तुकड्यांत, जनपद-महाजनपदांत विभागलेला होतो. मग एक दिवस, तक्षशिलेत जन्मलेल्या माझ्या एका पुत्राने आपली शिखा खुली केली आणि येथूनच माझा अखंड राष्ट्र बनण्याचा मार्गही खुला झाला. विविध तुकड्यांत विखुरलेले माझे भाग एका ध्वजाखाली एकत्र झाले.

आजच्या भौगोलिक भाषेत बोलायचे, तर चाणक्य आणि चंद्रगुप्ताने माझा बिहारपासून बलुचिस्तान आणि काश्मीरपासून कंदाहारपर्यंत विस्तार केला. मी आपल्या भुजांचा विस्तार पाहून आनंदी होतो, पण अशोकाचे शौर्य आपले आजोबा चंद्रगुप्तांचे साम्राज्य आणखी विस्तारण्यास संकल्पबद्ध होते. अशोकाने माझे बाहू, तक्षशिलापासून इराणपर्यंत खुले केले. माझा विस्तार संपूर्ण विश्वाला आश्चर्यचकित करत होता, भौगोलिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही रूपांत.

एकीकडे माझ्या हातात तळपत्या तलवारी होत्या, तर दुसरीकडे माझ्या गळ्यातून बुद्ध आणि महावीर यांची वाणी निनादत होती. नंतर अनेक शतके उलटली. मी काळाच्या पटावर कधी पळालो, कधी चाललो, कधी रांगलो, पण कधी थांबलो नाही. कृष्णाचे वचन माझ्या नेहमी स्मरणात राहिले,‘कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य आहितः।’

जर मी उजव्या हाताने कर्म केले, तर माझ्या डाव्यात हातात विजय अवश्य असेल. कर्मयोगाच्या सिद्धांतावर चालत मी वैभव व संपत्तीच्या शिखरावर पोहोचलो. मला सोन्याची खाण म्हणू लागले आणि माझे वैभव दूरवरच्या देशांतील लुटारू व आक्रमकांना आकर्षित करू लागले. अरब, मेहमूद, तुर्क, तैमूर, मंगोल हे घोड्यांवर बसून आले आणि माझ्या मंदिरांतील सोने लुटून नेले, माझे ग्रंथ जाळले, माझा इतिहास छिन्नविच्छिन्न केला. माझ्या शरीरावर अगणित जखमा झाल्या, पण मनावर विश्वबंधुत्वाचा आदर्श कायम राहिला. मी परदेशी लोकांचे घाव सहन करत राहिलो आणि ‘अतिथिदेवो भव’चा पुनरुच्चार करत राहिलो. माझी हीच शांतिप्रियता सातासमुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजी व्यापाऱ्यांसाठी वरदान ठरली. माझ्या राजांच्या दरबारात जमिनीवर नाक रगडणारे गोरे अचानक राजसत्तेचे मालक झाले. व्हिक्टोरियाने पाठवलेल्या बेड्यांनी मला असे जखडून टाकले की, माझ्या नसा वेदनेने विव्हळल्या. शेकडो वर्षे विश्वासघाताच्या धुरात माझा श्वास कोंडला गेला. किती वेळा माझ्या प्रतिष्ठेचे हनन झाले, किती वेळा माझा स्वाभिमान लुटला गेला, हेही आता मला आठवत नाही. पण मीही असे पुत्र जन्माला घातले होते, जे ‘रंंग दे बसंती’ गात माझ्यासाठी फासावर चढले. अशा मुली जन्माला घातल्या होत्या, ज्या लहान मुलांना पाठीवर बांधून इंग्रजांशी लढल्या. माझा एक मुलगा अाल्फ्रेड पार्कमध्ये एक पिस्तूल घेऊन अगणित इंग्रजी रायफलींशी लढला, आणि जेव्हा पिस्तुलात शेवटची गोळी उरली तेव्हा वंदे मातरम म्हणत माझ्या चरणी अर्पण झाला. जे हात माझ्या दिशेने आले, माझ्या वीरांनी ते कापून फेकून दिले... ज्या डोळ्यांनी माझ्याकडे वटारून पाहिले, ते कायमचे बंद झाले.

हुतात्म्यांच्या रक्ताने माझी जमीन भिजली आहे, माझ्या भाळी स्वातंत्र्याचा ७५ वा सूर्य चमकणार आहे, कारण माझ्या हृदयात शहिदांच्या समाध्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...