आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा वादात सापडला आहे. या दौऱ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. पण यामुळे औरंगाबादेत याविषयी खमंग चर्चा रंगली आहे.
मुख्यंमत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांपूर्वी औरंगाबादच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रात्री 10 वाजेनंतर एका सभेला संबोधित केले होते. यासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने रात्री 10 नंतर भोंगे अर्थात लाऊडस्पीकर लावण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळे शिंदेंवर न्यायालयाच्या या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आनंद कस्तुरेंची तक्रार
या प्रकरणी आनंद ज्ञानदेव कस्तुरे नामक एका सामाजिक कार्यकर्त्याने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून मुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 'शिंदेंनी 31 जुलै रोजी रात्री 10 वाजेनंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाऊडस्पीकरवरुन भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच या ठिकाणी बेकायदेशीर जमावही उपस्थित होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे व या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा,' अशी मागणी कस्तुरे यांनी आपल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे. पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला आहे. पण तूर्त त्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.
शिवसेनेचाही आक्षेप
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनीही याप्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. औरंगाबाद पोलिस किरकोळ प्रकरणांतही गुन्हा दाखल करतात. पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात मध्यरात्रीपर्यंत डीजे वाजत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची योग्य ती दखल घेतली पाहिजे. कायदा सर्वांना समान आहे हे पोलिसांनी दाखवून द्यावे, असे ते म्हणाले.
सेनेचा बुरुज ढासळला
मराठवाडा विशेषतः औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण येथील सेनेच्या बहुतांश आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे सेनेचा हा बुरुज ढासळल्याचे चित्र आहे. त्यातच शिंदेंनी औरंगाबादवर लक्ष केंद्रीत करून शहरात विविध ठिकाणी सभांचा धडाका लावल्यामुळे सेना नेत्यांचे धाबे दणाणलेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.