आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतीय रेल्वेे मंत्रालय आता ‘ऑन डिमांड रेल्वे’ योजना सुरू करणार आहे. यामुळे सर्वांना कन्फर्म तिकीट दिले जाऊ शकेल. यासाठी रेल्वेने २०२४ ची कालमर्यादा निश्चित केली आहे. याशिवाय मालवाहतुकीत रेल्वे आपली सध्याची हिस्सेदारी २७ टक्क्यांवरून वाढवून २०३० पर्यंत ४५ टक्के करण्याची तयारी करत आहे. रेल्वे मंडळाचे चेअरमन आणि सीईओ व्ही. के. यादव यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. रेल्वे सामान्य पद्धतीने कधीपर्यंत चालवल्या जातील, या प्रश्नावर यादव म्हणाले, अशी कोणती निश्चित तारीख सांगणे शक्य नाही. रेल्वे मंडळानुसार, रेल्वेला वार्षिक सुमारे १६ कोटी वेटिंग तिकिटे बुक होतात. यापैकी जवळपास ७ कोटींहून जास्त प्रवासी वेटिंग तिकीट सुटण्याआधी कन्फर्म होतात आणि सुमारे ९ कोटींचे कन्फर्म होत नाहीत.
यापैकी ऑनलाइन बुक तिकीट आपोआप रद्द होते, तर विंडो तिकीट घेणारे विविध प्रवासी खाली बसून प्रवास करतात. ही संख्या दरवर्षी वाढत आहे. वेटिंग संपवण्यासाठी मागणी आधारित रेल्वे चालवण्याची तयारी आहे. राष्ट्रीय रेल्वे आराखड्याअंतर्गत फ्रेट कॉरिडॉर २०२४ पर्यंत तयार होईल. यामुळे मागणीआधारित रेल्वे चालवल्या जाऊ शकतील. यादव यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे रेल्वेला प्रवाशांकडून होणाऱ्या उत्पन्नात ८७ टक्के नुकसान झाले आहे. गेल्या वर्षीचे उत्पन्न ५३ हजार कोटी रु. होते. या वर्षी आतापर्यंत ४६०० कोटी झाले आहे. रेल्वेने यासोबत व्हिजन २०२४ अंतर्गत मालवाहतूक २०२४ दशलक्ष टन पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१९ मध्ये हे १२१० दशलक्ष टन होते.
रेल्वेकडून १०८९ मेल, एक्स्प्रेस ट्रेनची सुविधा
यादव यांनी आभासी पत्रपरिषदेत सांगितले की, आतापर्यंत आम्ही १,७६८ रेल्वेच्या तुलनेत १,०८९ मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे चालवत आहोत. रेल्वे याशिवाय २६४ कोलकाता मेट्रो ट्रेन आणि ३,९३६ उपनगरीय रेल्वे चालवत आहे. आता आम्ही अशा ठिकाणी २० विशेष क्लोन ट्रेनही चालवत आहोत, जिथे वेटलिस्टनुसार जास्त मागणी आहे. सणासुदीत कन्फर्म तिकिटांची जास्त मागणी पाहता रेल्वेने गर्दी कमी करण्यासाठी ६१८ विशेष रेल्वे चालवल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.