आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्वाचा पेच:मागणी आमूलाग्र बदलांची; पण अध्यक्षपदी हवे राहुल गांधीच! पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार : राहुल

काँग्रेसमध्ये आमूलाग्र सुधारणांची मागणी करत सामूहिक पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेर शनिवारी चर्चेची दारे खुली केली. आपल्या १० जनपथ निवासस्थानी त्यांनी या नेत्यांसोबत सुमारे सव्वाचार तास चर्चा केली. काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून मतदार यादी बनवणे सुरू झाल्याची घोषणा बैठकीनंतर करण्यात आली.

नेत्यांनी सांगितले की, चर्चेसाठी गेल्यानंतर सोनिया-राहुल-प्रियंका गांधींनी स्वागत केले. तसेच पक्षश्रेष्ठी पक्षांतर्गत संघर्ष वाढवण्याऐवजी हा वाद चर्चेतून सोडवण्याच्या मूडमध्ये असल्याचे स्वागत-सत्कारातून स्पष्ट झाले. या बैठकीत गुलाम नबी आझाद यांनी सर्वप्रथम मुद्दा मांडण्यास सुरुवात केली. यानंतर २० नेत्यांनी पक्ष बळकटीसाठी सूचना दिल्या. बिहार निवडणुकीतील पराभवाचे चिंतन करण्याची मागणी करणारे आणि पक्षाचे तळागाळातील संघटन कमकुवत झाल्याचे विधान करणाऱ्या पी.चिदंबरम यांनीही या बैठकीत पुन्हा हेच मुद्दे मांडले.

राहुल गांधींच्या निकटवर्तीय एनएसयूआय प्रभारी रुची गुप्ता यांचा राजीनामा; म्हणाल्या- राहुलच काँग्रेस सांभाळू शकतात.
एनएसयूआयच्या प्रभारी आणि काँग्रेसच्या संयुक्त सचिव रुची गुप्ता यांनी पदाचा राजीनामा दिला. त्या राहुल गांधींच्या निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. संघटनात्मक बदल करण्यामध्ये सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून होणारा विलंब पक्षाचे नुकसान करत असल्याचा आरोप गुप्तांनी केला होता. दरम्यान, शनिवारच्या बैठकीत वेणुगोपाल अनुपस्थित होते. गुप्तांनी म्हटले की, मला राजीनामा देताना दु:ख होत आहे. मला पक्षाची सेवा करण्याची संधी देण्यासाठी राहुल व सोनिया गांधींची मी आभारी आहे. दरम्यान, राजीनामा देण्यापूर्वी गुप्तांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटले, संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेसला सक्षम नेतृत्व निवडण्याची गरज आहे. राहुल गांधी हेच काँग्रेसचे नेतृत्व करू शकतात.

पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा
बैठकीतील प्रमुख मुद्दे

- नेत्यांना ऐकवण्याऐवजी त्यांचे ऐकून घेण्याकडे हायकमांडचा कल.
- सोनिया गांधी यांनी सर्व सूचना स्वीकारल्या.
- एरवी बैठकीत मौन बाळगणाऱ्या प्रियंका गांधींनीही मत मांडले.
- २० काँग्रेस नेत्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.
- माध्यमांद्वारे टीका करण्याऐवजी पक्षाजवळ सूचना मांडण्याचा संकल्प करण्यात आला.
- यासाठी पक्षाकडून चर्चेची दारे कायम खुली ठेवण्यावर एकमत झाले.
- महिन्यातून किमान दोनदा होणार चिंतन बैठक.

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार : राहुल
राहुल गांधी यांनी आता सक्रिय होऊन पक्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी, असा सूर उपस्थित नेत्यांमधून उमटला. तर पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. मात्र पक्षाच्या विचार -विनिमयातून स्पष्ट झाले की राहुल गांधी “नामांकनाऐवजी निवडणूक’ प्रक्रियेतूनच ही जबाबदारी स्वीकारतील.

- प्रत्येक नेत्याने दिलेल्या सूचना सोनिया गांधी यांनी टिपून घेतल्या. कोविड-१९ व आजारपणामुळे पक्षांतर्गत संवादामध्ये व्यत्यय आल्याचे त्यांनी सांगितले. - दरम्यान, या वेळी शशी थरूर, पवन बन्सल, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी, विवेक तनखा आणि हरीश रावत यांच्यासह प्रमुख नेत्यांनीही सूचना मांडल्या.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी आमदार भाई जगताप
नवी दिल्ली | मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक ऊर्फ भाई जगताप यांची निवड झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी चेहरा देऊन मुंबई काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न आहे. कार्याध्यक्षपदी चरणसिंग सप्रा यांची नियुक्ती, तर प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहंमद आरिफ नसीम खान यांची निवड झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...