आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीदरम्यान जेईई आणि नीट परीक्षा घेण्यावरून आता राजकीय वाद पेटला आहे. सरकार व विरोधी पक्षांत यावरून जुंपली असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत बुधवारी ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा टाळण्याची मागणी केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी राज्यांनी कोर्टात जावे, असा सल्ला दिला, तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी अगोदर राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांची भेट घ्यावी, असा प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “अमेरिकेत शाळा सुरू झाल्याने ९७ हजार मुले कोरोनाबाधित झाल्याचे आढळले आहे. येथे असे घडले तर काय करायचे?’
नीटची राज्यात ६१५ केंद्रे
देशात १०९४ परीक्षा केंद्रे
देशभरात जेईई मुख्य परीक्षा २३२ शहरांतील सुमारे १०९४ केंद्रांवर होईल. यात सुमारे ८.५८ लाख विद्यार्थी सहभागी होतील, तर नीटसाठी ४ हजार केंद्रे आहेत. यासाठी १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दावा : ९९% विद्यार्थ्यांना सोयीचे केंद्र दिले वस्तुस्थिती : प्रत्येक राज्यात निवडक शहरातच केंद्रे आहेत
एनटीएचा दावा आहे की, जास्त प्रवास करावा लागू नये म्हणून ९९% विद्यार्थ्यांना सोयीचे केंद्र दिले आहे. मात्र, प्रत्येक राज्यातील निवडक शहरातच केंद्रे आहेत. राजस्थानातील ३३ जिल्ह्यांपैकी ९ मध्येच जेईई मुख्यसाठी केंद्र आहे. म्हणजे २४ जिल्ह्यांतील मुलांना प्रवास करावा लागेल, तर नीटसाठी केंद्र केवळ ६ शहरातच आहे. बिहारमध्ये केवळ पाटणा व गया येथेच नीटचे केंद्र आहे. पाटण्यात ६५ हजार विद्यार्थी येतील. हरियाणात जेईईकरिता ९ जिल्ह्यांत केंद्रे आहेत, तर नीटसाठी केवळ २ शहरांतच केंद्रे आहेत, जी सर्वाधिक बाधित गुडगाव आणि फरिदाबादमध्ये आहेत. आसाम, बिहार, गुजरात, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा आदी राज्यांत पुराचे थैमानही आहे.
असहाय विद्यार्थ्यांच्या फरफटीची कहाणी
२०० किमी दूर केंद्र, जाणार कसे... वर संसर्गाची भीती... बिहारचा दानिश खान भागलपूरमध्ये राहतो. नीटचे केंद्र पाटणा आणि गया या शहरांमध्ये आहे. त्यांना घरापासून २५० किमी दूर पाटणा येथे केंद्र मिळाले आहे. तेथे पोहोचण्यासाठी सध्याच्या काळात केवळ एक रेल्वे आहे. पुरामुळे रस्ता बंद आहे. तो म्हणतो, खासगी गाडी करूनच जावे लागेल. अॅलर्जी व डोळ्यांचा त्रास आहे. अशात ३ तास मास्क घालून परीक्षा कशी देणार?
महाराष्ट्रात एकही परीक्षा नाही : सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये नियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्यात आली असून ११ ऑक्टोबरला अराजपत्रित गट-ब साठी होणारी परीक्षाही होणार नाही. या काळात महाराष्ट्रात राज्य सरकारी सेवा किंवा विद्यापीठांच्या परीक्षा होणार नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.