आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदेचे पावसाळी अधिवेशन:विरोधक अधिवेशनात एकजुटीने सरकारला घेरण्याच्या तयारीत, यूपीएसह इतर पक्षांसोबत काँग्रेसची चर्चा, लवकरच बैठक

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियंत्रण रेषेबाबत सरकारकडून उत्तर घेणार

संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष एकजुटीने सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. चीनसोबतचा तणाव, राष्ट्रीय सुरक्षा, कोरोनावरील उपाययोजना, अर्थव्यवस्था व राज्यांना जीएसटीची नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला जाऊ शकतो.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील अनेक पक्षांचे नेते दोन्ही सभागृहांना निशाणा करण्याची रणनीती करणार आहेत. त्यासाठी याच आठवड्यात बैठक घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या रणनीतीसंबंधी गटाची मंगळवारी बैठक आयोजित केली आहे. त्याचबरोबर यूपीएच्या घटक पक्षांना व समान विचारांच्या विरोधी पक्षांतील लोकांनी संसदेत एकजूट दाखवण्यासाठी संपर्क साधण्याची सूचनाही सोनियांनी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यास केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ममता, उद्धव यांनी केले होते आवाहनतृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ऑनलाइन बैठकीत विरोधी पक्षांनी एकजूट दाखवावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. जेईई-नीट व जीएसटीवरून झालेल्या या बैठकीत त्यांनी हे विचार मांडले होते. विरोधी पक्षातील समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन सरकारवर हल्ला केला पाहिजे. सामान्य लोकांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असे तृणमूल नेते डेरेक आेब्रायन यांनी म्हटले होते. त्यासाठी विरोधकांना खूप काही करावे लागेल, असे त्यांनी म्हटले होते.

११ अध्यादेशांवरून टीका

सरकारने ११ अध्यादेश जारी केले आहेत. त्यावरूनही सरकारला घेरण्याची काँग्रेसची याेजना आहे. या अध्यादेशातील उपयाेगिता काय आहे? याचा शाेध घेऊन अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पक्षातील नेत्यांना यासंबंधी रणनीति तयार करण्याची सूचना केली आहे. रमेश हे रणनीति गटाचे समन्वयक आहेत.

नियंत्रण रेषेबाबत सरकारकडून उत्तर घेणार

चीनसाेबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील तणावाच्या दृष्टीने सरकारकडून भूमिका जाणून घेण्याचाही विराेधकांचा प्रयत्न राहील. भाकपचे डी. राजा यांनी लवकरच विराेधी पक्षांच्या संयुक्त बैठकीचे आयाेजन केले जाईल, असे स्पष्ट केले आहे.काेराेना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त हाेत असल्याने हा मुद्दा विराेधक अधिवेशन काळात उपस्थित करू शकतील. त्याशिवाय साेशल मीडिया प्लॅटफाॅर्म फेसबुक व सत्ताधारी पक्ष यांच्यातील संबंधावरूनही संसदेचे वातावरण तापण्याची शक्यता दिसून येते. वेगवेगळ्या परीक्षांसंदर्भातही विराेधक सरकारला लक्ष्य करू शकतात.