आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Outbreak Updates: Noncovid Hospital In A Tent On The Maharashtra Gujarat Border; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:महाराष्ट्र-गुजरात सीमेवर तंबूत नॉनकोविड रुग्णालय; स्वत:ची खाट, झाडाला सलाइन टांगून टायफॉइडच्या रुग्णांवर तंबूतच उपचार

नवापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 दिवसांत 900 रुग्ण, कोविडच्या भीतीमुळे तंबूचा आसरा

नंदुरबारपासून १५ किलोमीटर अंतरावरील शिवपूर गावाचे शिवार रिक्षा, जीप, व्हॅन या वाहनांनी भरलेले दिसते. गावात प्रवेश करताच ठिकठिकाणी झोपलेले रुग्ण. कुणी झाडाच्या सावलीत, कुणी ट्रॅक्टरच्या कडेला, कुणी अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या छताखाली तर अनेक जण तात्पुरत्या उभ्या केलेल्या मंडपात. ताडपत्रीवर रुग्णांना झोपवलंय, झाडाच्या फांद्यांना बांधलेली सलाइन्स आणि उपचार करणारे एक डॉक्टर, दोन स्थानिक मदतनीस. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या सीमेवरील १०-१२ गावांतील रुग्णांवर येथे उपचार सुरू आहेत. घाबरून जाऊ नका, हे कोरोनाचे रुग्ण नाहीत, तर टायफाॅइडचे रुग्ण आहेत.

आठशे लोकवस्तीच्या या गावातील निम्मा गाव साथीच्या आजाराने हैराण झाला. शेवटी गावातील डॉ. नीलेश वळवी यांना गावकऱ्यांनी बोलावले आणि तंबू ठोकून येथेच तात्पुरते रुग्णालय सुरू केले. आता या गावातीलच नाही तर गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील १०-१२ गावांमधील ९०० हून अधिक टायफाॅइडच्या रुग्णांना गेल्या पंधरा दिवसांत या ठिकाणी उपचार केल्याचे ते सांगतात. धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर टायफाॅइडची चाचणी करून उपचारासाठी रुग्ण येथे दाखल होत आहेत.

कोविडची चाचणी मात्र केली जात नाही. अन्यत्र कोविडच्या चाचणीशिवाय प्रवेश नाही, त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्यांची संंख्या वाढली आहे. गुजरातमधील सायला, मोगरानी, ताकली, भिलमवाली, नासेरपूर या निझर तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील नंदुरबारमधील पिपलोद, भवाली, विरपूर, लोय गावचे शेकडो रुग्ण या ठिकाणी येत आहेत. गावकऱ्यांनी उभारलेल्या मंडपासह प्रत्येकाच्या घरापुढील मंडपात रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र दिसते. डाॅ. नीलेश वळवी आणि दोन स्थानिक स्वयंसेवक या रुग्णालयात रुग्णांची सेवा करत आहे. अनेक रुग्णांवर झाडाखाली सलाइन लावून उपचार सुरू आहेत. कुटुंबच्या कुटुंब एकत्र उपचार घेत आहेत.

आदिवासी म्हणतात, याचाच आधार
टायफाॅइडच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यात प्रवेश न मिळाल्याने त्यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. आदिवासींसाठी हा मोठाच आधार असल्याचे ते मानतात. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. नीलेश वळवी या ठिकाणी मदतीसाठी येत आहेत.

खाट घेऊन या आणि सलाइन लावून जा
रुग्ण येताना आपली खाट घेऊन येतात. सकाळी ११ ते रात्री ११ असा बारा तास हा दवाखाना चालतो. एका दिवसाचे एका रुग्णाकडून उपचाराचे १८०० रुपये घेतले जातात. त्यात त्यांना तीन सलाइन लावले जातात. गेल्या १५ दिवसांत अशाप्रकारे ९०० हून अधिक रुग्णांनी या ठिकाणी उपचार घेतल्याचे स्थानिक सांगतात. शिवपूर गावातील रुग्णांवर उपचार झाल्यानंतर आता पंचक्रोशीतील महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवरील गावांवरून रुग्ण या ठिकाणी येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...