आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर सुरूच:महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर, 24 तासांमध्ये जवळपास 26,000 रुग्ण आढळले; हा एका दिवसात संक्रमित आढळण्याचा सर्वात मोठा आकडा

नवी दिल्ली/बंगळुरू/मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 25,833 नवे रुग्ण आढळले

देशात काेरोनाचे ३९,२२२ नवे रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत आढळलेले नवे रुग्ण गेल्या वर्षी १ डिसेंबरनंतर सर्वाधिक आहेत. गुरुवारी बळींचा आकडा १५२ झाला. तर महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. येथे गुरुवारी २५,८३३ नवीन संक्रमित आढळले.

मंत्रालयानुसार, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ६,९६८ रुग्ण अधिक वाढले. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी १५ लाख १३,५२४ झाली आहे. गेल्या २४ तासांत १५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णही २ लाख ६८,०९३ झाले आहेत. वाढत्या रुग्णांमुळे गुजरातच्या अहमदाबादेत सरकारी बस स्थगित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री विजय रूपाणींनी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापली आहे. पंजाबमध्ये रात्रीची संचारबंदी २ तासांनी वाढवली आहे. तेथे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असेल. पंजाबच्या ९ शहरांत रात्रीचा कर्फ्यू सुरू आहे. या शहरांत दररोज १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या उडुपीतील मणिपाल-एमआयटी कॅम्पस ५९ रुग्ण आढळल्यानंतर ते कंटेंनमेंट झोन घोषित केले आहे.

केंद्रीय पथक लस प्रकल्पांच्या उत्पादनवाढीचा आढावा घेणार
देशात रोज सरासरी २० लाख कोरोनाचे डोस देणे सुरू आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. यामुळे लस उत्पादन वाढत नाही तोवर सर्वांना लस देणे कठीण आहे, असे केंद्राचे मत आहे. यामुळे कॅबिनेट सचिवांच्या आदेशानुसार अनेक मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांचे पथक स्थापण्यात आले आहे. त्यांना लसनिर्मिती प्रकल्पांत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या कंपन्यांशी चर्चा करून देशात कशा प्रकारे लस उत्पादनाची क्षमता वाढवली जाऊ शकेल यावर काम करण्यास सांगण्यात आले आहे.

सूत्रांनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशील्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ कंपनीशी एकूण १८.५ कोटी डोसचा करार केला आहे. यात ७ कोटींवर डोस राज्यांना पाठवण्यात आले आहेत. भारत बायोटेकची लस उत्पादन क्षमता दरमहा ४ कोटी आहे. सीरमची क्षमता दरमहा ६-७ कोटी आहे. मात्र अद्याप पूर्ण क्षमतेने उत्पादन होत नाहीय. मार्चमध्ये दोन्ही कंपन्यांत सुमारे ७ कोटी डोसचे उत्पादन सुरू होईल.

विदर्भात कोरोनाचे ४८ मृत्यू, ६८०६ नवे रुग्ण
अमरावती | विदर्भात गुरुवारी तब्बल ४८ रुग्णांचा मृत्यू, ६८०६ नवे रुग्ण आढळले. पूर्व विदर्भात ३०, पश्चिम विदर्भात १८ जणांचा मृत्यू झाला. नागपूर विभागात ४५०१, अमरावती विभागात २३०५ नवे रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९५,५७१, तर बळींचा आकडा ७९१५ झाला. आतापर्यंत ३ लाख ४२ हजार २७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

मराठवाड्यात ३,५४३ रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
आैरंगाबाद | मराठवाड्यात गुरुवारी ३,५४३ नवे रुग्ण, तर २७ जणांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत १,५५७, जालना ४१९, परभणी १६६, हिंगाेली ८७, नांदेड ६२५, लातूर २९१, उस्मानाबाद १६४, बीडमध्ये २३४ रुग्ण सापडले. औरंगाबादेत १५, जालना ४, नांदेड ३, हिंगोली, बीडमध्ये प्रत्येकी २, तर लातूरमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात २५,८३३ नवे रुग्ण : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २५,८३३ नवे रुग्ण आढळले. हा आकडा देशाच्या एकूण नव्या रुग्णांच्या ६३.२१% इतका आहे. यानंतर सर्वाधिक १,७९२ रुग्ण केरळ, तर पंजाबमध्ये १,४९२ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक व हरियाणात सातत्याने रुग्ण वाढत आहेत.

देशात ब्रिटन, द. आफ्रिका व ब्राझील स्ट्रेनचे ४०० रुग्ण
ब्रिटन, दक्षिण आफ्रिकन व ब्राझील या देशांत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे भारतातही ४०० रुग्ण आढळले आहेत. ४ मार्चपर्यंत या स्ट्रेनचे देशात २४२ रुग्ण होते. दोन आठवड्यांत ही संख्या १५८ ने वाढली आहे.

संसर्ग वाढण्यामागे राज्यांतील माती-हवामानाचा काहीही संबंध नाही : आयसीएमआर
आयसीएमआरचे वैज्ञानिक डॉ. समीरण पांडा यांच्यानुसार, राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचे कारण तेथील माती वा हवामान हे नाही. कमी काेरोना चाचण्या, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत गर्दी ही रुग्णवाढीची कारणे आहेत. व्यावसायिक घडामोडी जास्त असलेल्या राज्यांत लोकांचे बाहेर पडणे हेही संसर्ग वाढण्यामागील महत्त्वाचे कारण आहे.

बातम्या आणखी आहेत...