• Home
  • National
  • Corona Transition: It took 18 days to win the Mahabharata War, today it will take 21 days to win the Corona War Narendra Modi

कोरोना संक्रमण: महाभारताचे युद्ध जिंकायला 18 दिवस लागले होते, आज कोरोनाचे युद्ध जिंकायला 21 दिवस लागतील- नरेंद्र मोदी

  • 130 कोटी योद्ध्यांसोबत मला हे युद्ध जिंकायचे आहे

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 05:53:15 PM IST

वाराणसी- कोरोना व्हायरसचे वाढत्या संक्रमणामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, आई शैलपुत्री देवीला प्रार्थना आहे की, कोरोनाविरोधात सुरू झालेल्या युद्धात, देशातील 130 कोटी जनतेचा विजय होवो. काशीचा खासदार असल्यामुळे, मला यावेळी तुमच्यासोबत असायला हवं होतं. पण, दिल्लीमध्ये होत असलेला गोंधळ तुम्हाला माहितच आहे. मी वाराणसीबाबत सतत अपडेट घेत आहे. महाभारताचे युद्ध जिंकायला 18 दिवस लागले होते. आज हे कोरोनाचे युद्ध जिंकायला आपल्याला 21 दिवस लागणार आहेत.

मोदी पुढे म्हणाले की, आज 130 कोटी योद्ध्यांसोबत मला हे युद्ध जिंकायचे आहे. संकटसमयी काशीने सर्वांचे मार्गदर्श करावे. काशीचा अनुभव शाश्वत, सनातन आहे. आज लॉकडाउनच्या परिस्थिती देशाला संयम,समन्वय आणि संवेदनशीलतेची गरज आहे, ती काशीने द्यावी. काशी म्हणजे शिव, शिव म्हणजे कल्याण. महादेवाच्या नगरीत सर्वांना सामर्थ्य देण्याचे आणि सय्यम देण्याची शक्ती आहे. कोरोनासाठी देशभरात मोठी तयारी सुरू आहे. पण, सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला सोशल डिस्टेंसिंग पाळावी लागेल. सध्या नागरिकांनी घरात राहणे, त्यांच्यासाठी आणि इतर लोकांसाठी गरजेचे आहे.

संक्रमणाच्या 598 केस आणि 11 मृत्यू


देशातील राज्य सरकारांनी प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार, संक्रमितांची संख्या बुधवारी 598 झाली आहे. आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु केंद्र सरकारने आतापर्यंत देशात 562 पॉझिटिव्ह आणि 512 ऍक्टिव्ह केस असल्याची माहिती दिली आहे. आज संक्रमणाच्या 62 नवीन केस समोर आल्या आहेत. पूर्वोत्तर भाग मिझोरममध्ये एक नवीन केस समोर आली आहे. येथे नेदरलँडवरून आलेला एक पादरी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

X