आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात अखेर कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला. केंद्र सरकारच्या तज्ज्ञांच्या समितीने शुक्रवारी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या ‘कोविशील्ड’ या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्याची शिफारस केली. सूत्रांनी सांगितले की, आता औषधी नियामकांकडून शनिवारी अंतिम मंजुरी मिळू शकते. कोविशील्डचे ५ कोटी डोस तयार आहेत. ते एक-दोन दिवसांत विमानाद्वारे देशभरातील विभागीय केंद्रांवर पोहोचवले जातील. केंद्र सरकारने ६ किंवा ७ जानेवारीपासून देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. ज्या एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाईल, त्यांची यादी राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे सोपवली आहे.
‘कोविशील्ड’ या लसीची निर्मिती पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. संस्थेने भारतात वापराच्या परवानगीसाठी ६ डिसेंबरला अर्ज दिला होता. याआधी ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या याच लसीला मंजुरी मिळालेली आहे. आता केंद्र सरकारच्या तज्ज्ञांच्या समितीनेही तिच्या वापराला मंजुरी दिली आहे.
लस आपल्यापर्यंत अशी येणार
१ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार, केंद्राकडे सुपूर्द
सर्वप्रथम १ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. सर्व राज्यांनी त्यांची यादी केंद्राला पाठवली आहे. त्यांना फेब्रुवारीपर्यंत लस मिळेल. त्यानंतर पोलिस, मनपा कर्मचारी यांसारख्या फ्रंटलाइन वर्कर्सना लस मिळेल. त्यांची संख्या २ कोटी आहे. केंद्राने त्यांच्या याद्याही मागवल्या आहेत. त्यांना मार्चपर्यंत लस देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
काेविशील्ड ७०% पर्यंत प्रभावी, चाचण्यांचे निष्कर्ष
वैद्यकीय चाचण्यांत ‘काेविशील्ड’ ९०% पर्यंत प्रभावी असल्याचे आढळले होते. मात्र, माणसांवरील चाचण्यांत ब्रिटन आणि भारतात तिचे वेगवेगळे निष्कर्ष निघाले. आता केंद्र सरकारच्या मते ती ६२.१% पर्यंत प्रभावी आहे. म्हणजे १०० पैकी ६२ लोकांना ती कोरोनापासून सुरक्षा देईल.
सध्या लसीचे ५ कोटी डोस हिमाचलमध्ये ठेवले आहेत
सरकार सर्वात आधी सीरम इन्स्टिट्यूटकडून लस खरेदी करेल. लसीच्या ५ कोटी डोसला हिमाचलच्या सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीने मंजुरी दिली आहे. तेथून ते विभागीय केंद्रांवर पोहोचवण्याची जबाबदारीही सीरमची असेल. त्यानंतर ते राज्यांच्या मुख्यालयांपर्यंत जातील. नंतर राज्ये आपल्या व्यूहरचनेनुसार लसीकरण सुरू करतील.
तयारी तपासण्यासाठी आज देशभरात रंगीत तालीम
लसीकरण सुरू होण्याआधी २ जानेवारीला अंतिम सराव होईल. त्यात लसीचा पुरवठा, साठा आणि लॉजिस्टिकची तयारी पाहिली जाईल. प्रत्येक राज्यातील दोन शहरांच्या तीन-तीन केंद्रांवर सराव होईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी त्याच्या तयारीचा आढावा घेतला.
लसीच्या वाहतुकीवर ई-विनद्वारे नजर : कोल्ड चेनवर कोणत्या बॅचचे किती डोस पोहोचले आहेत, याची संपूर्ण माहिती ई-विनवर (इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क) अपडेट केली जाईल. त्याच्याच माध्यमातून पूर्ण निगराणी ठेवली जाईल.
सध्या तर ही सुरुवात आहे..
देशात सध्या ६ लसी वेगवेगळ्या टप्प्यांतून जात आहेत, ऑगस्टपर्यंत सर्व बाजारात येतील
१ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना २ फेब्रुवारीपर्यंत, २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्सना मार्चपर्यंत लस
कोविशील्ड : १० कोटी डोस या महिन्यापर्यंत तयार होतील
मंजुरी मिळणार आहे. सध्या ५ कोटी डोस तयार आहेत. याच महिन्यापर्यंत आणखी १० कोटी डोस तयार होतील. ही देशात दिली जाणारी पहिली लस असेल.
कोव्हॅक्सिन : फेब्रुवारीपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे
भारत बायोटेक, एनआयव्ही व आयसीएमआर यांनी मिळून तयार केली. २५ शहरांत तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू. आतापर्यंत कुठल्याही स्वयंसेवकाला साइड इफेक्ट दिसला नाही.
स्पुटनिक-व्ही : मार्चपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे
रशियन लस. भारतात डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व आरडीआयएफ
एकत्रितपणे पहिल्या-दुसऱ्या टप्प्याची चाचणी करत आहेत.
झायकोव्ह-डी : मार्चनंतर केव्हाही बाजारात येण्याची शक्यता
झायडस कॅडिलाने तयार केली आहे. दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्याची चाचणी एकाच वेळी सुरू आहे. किंमत निश्चित नाही. मार्चनंतर कधीही बाजारात येऊ शकते.
बायोलॉजिकल ई : जुलैपर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे
ही लस अमेरिकी कंपनी डायनाव्हॅक्स टेक्नॉलॉजी आणि ह्यूस्टनच्या बेयलर कॉलेजने मिळून बनवली आहे. भारतात दुसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू झाली आहे. जुलैपर्यंत येईल.
एचजीसीओ-१९ : अॉगस्टमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे
पुण्याची जेनेव्हा फार्मा आणि एचडीटी बायोटेकची निर्मिती. माणसांवर चाचण्या सुरू झाल्या नाहीत. ऑगस्टमध्ये येऊ शकते.
याशिवाय फायझरची लसही... तिला ब्रिटनमध्ये आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे. भारतात मंजुरीसाठी अर्ज केला आहे. तथापि, शुक्रवारच्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत तिच्यावर चर्चा झाली नाही.
स्वदेशी लसीला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या दाव्यावरही तज्ज्ञांच्या समितीने चर्चा केली. चाचणीसाठी वेगाने आणि जास्त स्वयंसेवकांची नोंदणी करा, असे समितीने कंपनीला सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.