आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना प्रतिबंधक लस:वाजवी दरातील सुरक्षित लसीचे जगाला वेध; परिणामी भारताकडेही सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही आठवड्यांत लस तयार होईल, नंतर लसीकरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सध्या जगभरातील अनेक देश कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. विविध देशांत तयार होत असलेल्या अनेक लसींची नावे सातत्याने कानावर येत आहेत. मात्र, यानंतरही जगाला सुरक्षित पण वाजवी दरातील लसीचे वेध लागले आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारताकडेदेखील असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवी दिल्लीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कोरोना महामारी आणि लसीच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी सरकारने ही बैठक बोलावली होती.

या वेेळी मोदी म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी “मेड इन इंडिया’ लस तयार करण्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या टीमसोबत माझी सविस्तर चर्चा झाली. भारतातील शास्त्रज्ञांना लसनिर्मितीच्या यशाबाबत प्रचंड आत्मविश्वास आहे. अहमदाबाद, पुणे आणि हैदराबाद येथे भेट देऊन लस उत्पादनाबाबत देशाची तयारी कशी आहे, याचा प्रत्यक्ष आढावा मी घेतला आहे.’

मोदी म्हणाले, सध्या सुमारे ८ संभाव्य लसींच्या चाचण्या विविध टप्प्यांत आहेत. यांचे उत्पादनही भारतातच होणार आहे. भारताच्या तीन वेगवेगळ्या संस्थांच्या लस अंतिम टपप्यात आहेत. लसनिर्मितीच्या विकासाचा हा टप्पा लक्षात घेता आता लसीची फार वाट पाहावी लागणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये लस तयार होईल. यानंतर वैज्ञानिकांच्या मंजुरीने भारतात लसीकरण सुरू होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

प्रत्येक भारतीयाला मोफत लस कधी ? : राहुल
भारतातील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस कधी मिळणार, असा सवाल राहुल गांधींनी सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सोशल मीडियावर उपस्थित केला. ते म्हणाले, पंतप्रधान सर्वपक्षीय बैठकीत स्पष्टीकरण देतील, अशी आशा आहे. भाजपने बिहार विधानसभा आणि हैदराबाद महानगरपालिका निवडणूक जाहीरनाम्यात त्या राज्यांमध्ये प्रत्येक नागरिकाला मोफत लस दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. यावरून राहुल गांधी यांनी हा प्रश्न उपस्थित केला.

मॉडर्ना लसीने शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडी ३ महिन्यांत नष्ट होऊ शकतात : संशोधन
अमेरिकी कंपनी मॉडर्ना लसीच्या परिणामाबाबत शास्त्रज्ञांनी आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. या शास्त्रज्ञांनुसार, मॉडर्नाच्या लसीमुळे मानवी शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडी (संसर्ग टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणारे आणि पुन्हा कोरोनाबाधित न होऊ देणारे प्रोटीन) तीन महिन्यांत नष्ट होतात. अमेरिकेच्या राष्ट्रीय संसर्गजन्य रोगप्रतिबंधक विभागाकडून हे संशोधन करण्यात आले. ही लस (एमआरएनए-१२७३) विकसित करण्यात या विभागाचाही समावेश आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. दरम्यान, तीन महिन्यांत अँटिबॉडी नष्ट झाल्यास चिंता करण्याचे कारण नसल्याचेही यात म्हटले आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत मानवी शरीराला लसीच्या माध्यमातून संबंधित रोगाच्या विषाणूची ओळख पटलेली असते. यामुळे एखादी व्यक्ती अशाच विषाणूंमुळे पुन्हा बाधित झाल्यानंतरही शरीर अँटिबॉडी तयार करते.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा कोरोना लसीच्या चाचणीसाठी अनफिट
भोपाळ । मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना कोरोना चाचणीसाठी अनफिट घोषित करण्यात आले. ही माहिती मिश्रा यांनीच माध्यमांना दिली. ते म्हणाले, लसीच्या चाचणीत सहभागी होण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. या माध्यमातून समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा माझा मानस होता. मात्र, आयसीएमआरने (भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था) चाचणीसाठी निश्चित केलेल्या निकषांनुसार मला अनफिट घोषित करण्यात आले. भोपाळमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. यात मिश्रा यांना स्वयंसेवक म्हणून भाग घ्यायचा होता. मात्र त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांना नकार देण्यात आला. नरोत्तम मिश्रा काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही आणि सतत मास्कविरोधी वक्तव्ये केल्यामुळे देशभर प्रचंड चर्चेत आले होते. त्यांच्यावर या काळात खूप टीकाही झाली होती.

प्रारंभी २ टप्प्यांत देशातील ३ कोटी नागरिकांना लस
सर्वपक्षीय बैठकीत आरोग्य मंत्रालयातर्फे लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत सादरीकरण करण्यात आले. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, देशाच्या आरोग्य क्षेत्रातील सुमारे १ कोटी कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम लस देण्यात येईल. यात डॉक्टर, नर्स, आशा वर्कर आदींचा समावेश आहे. नंतर पोलिस, सुरक्षा दल, महानगर-नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या लसीचे डोस दिले जातील. यांची संख्या सुमारे २ कोटींच्या जवळपास आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser