आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना औषध:पतंजलीचे कोरोना औषध लाँच, पाच तासांतच प्रचारावर बंदी! सरकारची भूमिका - मंजुरीशिवाय हा दावा केलाच जाऊ शकत नाही

हरिद्वार/ नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने संशोधनाची माहिती मागवली, पतंजलीने 11 पानांचे उत्तर पाठवले

योगगुरू रामदेवबाबा यांनी मंगळवारी कोरोना विषाणुबाधेवर गुणकारी औषध तयार केल्याचा दावा केला. कोरोनिल आणि श्वासारी नामक औषधे लाँच करत रामदेवबाबांनी असा दावा केला की, ७ दिवसांत कोरोना रुग्ण १०० टक्के बरा होऊ शकतो. याचे क्लिनिकल ट्रायल (मानवावरील चाचण्या) यशस्वी ठरल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, हे औषध लाँच केल्यानंतर अवघ्या पाच तासांत कंेद्र सरकारने याच्या प्रचार-प्रसारावर तत्काळ बंदी घातली. या औषधाची शास्त्रीय चाचणी झाली नसल्याचे केंद्राने नमूद केले. दुसरीकडे आयुष मंत्रालयाने पतंजली आयुर्वेदकडून त्यांच्या परवान्यासह इतर सविस्तर माहिती मागवली. औषधाचे नाव, वापराची सामग्री, औषधावरील संशोधनाची जागा, रुग्णालये, प्रोटोकॉल, नमुन्यांचा आकार, संस्थात्मक नियमांच्या पूर्ततेसंबंधी कागदपत्रे, चाचण्यांचे परिणाम इत्यादीचा यात समावेश आहे. मंत्रालयाचा निर्णय येईपर्यंत औषधाचा प्रचार करता येणार नाही.

शंका : डॉक्टरांनुसार, प्रयोगाच्या नादात महत्त्वाचा वेळ वाया जाईल

रामदेवबाबा यांच्या दाव्याशी डॉक्टर सहमत नाहीत. फरिदाबाद फोर्टिस रुग्णालयाचे पल्मोनॉलॉजी विभागप्रमुख डॉ. रविशंकर झा म्हणाले की, शास्त्रीयदृष्ट्या कोणत्याही औषधाने या विषाणूची शरीरातील बाधा पूर्णपणे नष्ट करणे शक्य नाही. हे दावे नुकसानीचे ठरू शकतात. लोक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी स्वत:च ही औषधे घेऊ लागतील. याच्या क्लिनिकल ट्रायलचा कोणताही पुरावा नाही. या गावठी उपचारांच्या नादात महत्त्वाचा वेळ वाया जाईल आणि रुग्णाची प्रकृती गंभीर होऊ शकते.

कायदेशीर : संशोधनासाठी सरकारचे निकष निश्चित, याचे पालन आवश्यक

- केंद्राने पतंजली आयुर्वेदला कळवले आहे की, आयुर्वेदिक औषधांसह सर्व औषधांचा प्रचार ड्रग्ज अँड रेमेडीज अॅक्ट, १९५४ आणि कोविड-१९च्या संसर्गाच्या दृष्टीने सरकारने जाहीर केलेले नियम तसेच निर्देशांनुसार नियमित केला जातो.

- आयुष मंत्रालयाने २१ एप्रिल रोजी काढलेल्या अधिसूचनेत आयुषचा हस्तक्षेप, औषधांसह कोविड-१९ वर होत असलेल्या शोधांची गरज व पद्धती ही माहिती दिली आहे. सरकारच्या मंजुरीशिवाय उपचारांचा दावा करण्यास यात बंदी आहे.

संपूर्ण चाचणी केली, ३ दिवसांत ६९% तर ७ दिवसांत १००% रुग्ण बरे झाले

रामदेवबाबा यांनी दावा केला की, आयुर्वेदिक औषध कोरोनिल आणि श्वासारीने कोरोना रुग्णांवर केलेली चाचणी १०० टक्के यशस्वी झाली. पतंजली रिसर्च सेंटर व जयपूर येथील खासगी संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने सर्व करार-नियमांचे पालन करून क्लििनकल ट्रायल झाले असल्याचे म्हटले आहे. या चाचणीत ३ दिवसांत ६९ टक्के रुग्ण बरे झाले, तर ७ दिवसांत १०० टक्के रुग्ण बरे झाल्याचेही त्यांनी नमूद केले. पहिल्या चाचणीत २८० तर दुसऱ्या चाचणीत १०० रुग्ण सहभागी होते. एकाचाही मृत्यू झाला नाही.

गरम पाण्यासोबत गुळवेल, तुळस व अश्वगंधाच्या गोळीने उपचार...

पतंजलीच्या “दिव्य कोरोनिल’ गोळीत गुळवेल, तुळस व अश्वगंधा आहे. दिवसांत तीन वेळा गरम पाण्यासोबत ही गोळी घेण्याचा सल्ला रामदेवबाबा यांनी दिला. हे केवळ प्रतिकारशक्ती वाढवणारे औषध नाही तर कोरोना पूर्णपणे बरे करेल दावा त्यांनी केला. ५४५ रुपयांचे किट आठवडाभरात बाजारात येईल, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...