आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर हिंसा:गाडीखाली कुणाला चिरडणे म्हणजे प्रभावी नेतेगिरी नव्हे, शेतकरी हत्याकांडाच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश भाजपाध्यक्षांनी कान पिळले

लखनऊ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुमच्या वागणुकीवरच लोकांची मते मिळतील

उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरीतील हिंसाचारानंतर देशभर संतापाची लाट आहे. आशिष मिश्रा या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने जीपने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडल्याने शेतकऱ्यांसह राजकीय पक्षांतही प्रचंड रोष आहे. शिवाय, आगामी काळात उत्तर प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुका पाहता भारतीय जनता पक्षातही या घटनेनंतर अस्वस्थता पसरली आहे. ही स्थिती पाहता उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देवसिंह यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांचे रविवारी कान पिळले. “आपल्या जीपखाली कुणाला चिरडणे म्हणजे नेतेगिरी होत नाही. तुम्हाला जी मते मिळणार आहेत ती तुमच्या वागणुकीवरच मिळणार आहेत,’ असे देवसिंह यांनी म्हटले आहे. तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागात राहणाऱ्या दहा लोकांनी जरी तुमच्या वागणुकीची किंवा तुमच्या नेतृत्वाबद्दल स्तुती केली तर माझी छाती आणखी फुगेल. मात्र, तुमच्या भागातील लोक जर तुमचे तोंडच पाहू इच्छित नसतील तर याला काहीच अर्थ नाही, अशा शब्दांत सिंह यांनी खडसावले.

गेल्या रविवारी लखीमपूरमध्ये भाजप नेते, कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्यात प्रचंड हिंसाचार झाला. यातच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याच्या जीपखाली चिरडून चार शेतकरी ठार झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या घटनेचा व्हिडिओही दुसऱ्या दिवशी व्हायरल झाला होता. जीपखाली चिरडून शेतकरी मारले गेल्याचे पाहताच संतापलेल्या शेतकऱ्यांनी हल्ला केला. यात तीन भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यातच तिघांचा मृत्यू झाला.

लढा हिंदू विरुद्ध शीख करण्याचा प्रयत्न : वरुण
लखनऊ | भाजप खासदार वरुण गांधी म्हणाले, लखीमपूर खिरी प्रकरणास हिंदू विरुद्ध शीख संघर्षाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे केवळ अनैतिक आणि खोटेच नव्हे, तर त्या जखमांवरील खपली काढण्याचा धोकादायक प्रयत्न आहे. या समाजात सलोखा निर्माण करण्यात एक पिढी गेली. राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणून याचा राजकीय लाभ उचलणे चुकीचे आहे. वरुण यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्याच्या आदल्या दिवशीही त्यांनी लखीमपूरच्या घटनेबाबत सरकारच्या इच्छाशक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते.

मंत्रिपुत्र आशिष मिश्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
लखीमपूर | केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिषला ११ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. उत्तर प्रदेश एसआयटीने त्याची १२ तास चौकशी केली. यानंतर शनिवारी रात्री उशिरा सहकार्य न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आशिषला लखीमपूरमध्ये न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ११ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. एसआयटीने तीन दिवस पोलिस कोठडीची मागणी केली होती. आता ११ आॅक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होईल.

बातम्या आणखी आहेत...