आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरस मिस्त्रींवर अंत्यसंस्कार:मुंबईच्या वरळी स्मशानभूमीत दिला अंतिम निरोप, प्रार्थना सभेत भजन व गायत्री मंत्राचे पठन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मंगळवारी वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा मुंबईच्याच वाळकेश्वर सी फेसिंग मेंशनमधून स्मशानभूमीपर्यंत पोहोचली. त्यांच्या प्रार्थना सभेत भजन व गायत्री मंत्राचे पठन झाले.

सायरस मिस्त्रींच्या अंत्यसंस्कारासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी, एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती जमले तत्पूर्वी, मिस्त्री कुटुंबीयांनी सायरस यांच्या अंत्यसंस्काराची माहिती देताना शोकसभेसाठी न येण्याचे आवाहन केले होते.

रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात झाले निधन

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका रस्ते अपघातात निधन झाले होते. ते गुजरातच्या उदवाडा स्थित पारशी मंदिरातून परत येत होते. 54 वर्षीय मिस्त्रींची मर्सिडीज GLC 220 कार महाराष्ट्रातील पालघरमधील सूर्या नदीवरील पुलाच्या दुभाजकाला धडकील. त्यात मिस्त्री व त्यांचे मित्र जहांगीर पंडोलेंचा (49) मृत्यू झाला. तर कार चालवणाऱ्या महिला डॉक्टर अनायता पंडोले व त्यांचे पती दरीयस पंडोले गंभीर जखमी झाले. दरीयस जेएम फायनांशिअलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

134 KMPH वेगाने धावत होती कार

सायरस मिस्त्री ज्या लग्झरी मर्सिडीज कारमधून प्रवास करत होते, ती ताशी 134 किमी वेगाने धावत होती. याचा खुलासा कारच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमधून झाला आहे. कारने रविवारी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी चारोटी चेकपोस्ट क्रॉस केली. तेथून 20 किमी अंतरावर अपघात झाला. मर्सिडीजने अवघ्या 9 मिनिटांत हे 20 किमीचे अंतर कापले. यावरून तिचा वेग लक्षात येतो.

सायरस व जहांगीरने सीटबेल्ट लावले नव्हते

पोलिसांनी सांगितले की, भरधाव वेग व ओव्हरटेकिंग करताना नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. अपघातात बळी गेलेल्या सायरस व जहांगीर या दोघांनीही सीट बेल्ट लावले नव्हते. दुभाजकाला धडकल्यानंतर कारच्या पुढच्या भागातील एअरबॅग्ज उघडल्या. पण मागच्या बाजूच्या एअरबॅग्ज उघडल्या नाही. त्या योग्यवेळी उघडल्या असत्या तर कदाचित सायरस यांचा बळी गेला नसता. रविवारी एका प्रत्यक्षदर्शीनेही सायरस यांची कार रॉन्ग साइडने ओव्हरटेक करताना डिव्हायडरला धडकल्याचे सांगितले.

'मल्टीट्रॉमा'मुळे झाला सायरस मिस्त्रींचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालानुसार, अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीराच्या आतील अवयवांना गंभीर जखम झाली होती. वैद्यकीय भाषेत त्याला पॉलीट्रॉमा (Polytrauma)असे म्हटले जाते. यामुळेच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुंबईच्या जेजे रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा सायरस व जहांगीर यांचे पोस्टमॉर्टम झाले होते.

कारची न्यायवैद्यक तपासणी

मोटार वाहन निरीक्षक मनीष मोरे यांनी सांगितले की, सध्या अपघातग्रस्त कारची न्यायवैद्यक तपासणी सुरू आहे. त्यातून अपघाताचे खरे कारण कळेल. पोलिसांनी सांगितले - घटनास्थळी किंवा त्यांच्या कारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. रस्त्याची स्थितीची चांगली होती. त्यामुळे अखेर चूक कुठे झाली याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचेही संकेत दिलेत. गाडी कुणाच्या नावावर आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

अनयाता-दरीयस ब्रीच कँडी रुग्णालयात वर्ग

अपघातानंतर अनायता व दरीयस याच्यावर वापीच्या इंद्रधनुष्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी येथील डॉक्टर तेजस शाह यांनी सांगितले की, अनायता व दरीयस पंडोले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यांचा ऑक्सिजन लेव्हल घसरला होता. रक्तदाबही उच्च होता. त्यांना खूप सारे फ्रॅक्चर होते. त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले.

अपघातानंतर अनायता पंडोले व सायरस मिस्त्री जमिनीवर असे पडले होते.
अपघातानंतर अनायता पंडोले व सायरस मिस्त्री जमिनीवर असे पडले होते.

गत जून महिन्यातच झाले होते वडिलांचे निधन

सायरस यांचे वडील व विख्यात उद्योगपती पालोनजी मिस्त्री (93) यांचे गत 28 जून रोजीच निधन झाले होते. आता सायरस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मातोश्री पाट्सी पेरिन डुबास, शापूर मिस्त्रींसह लैला मिस्त्री व अलू मिस्त्री या 2 बहिणी राहिल्या आहेत.

टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते सायरस

रतन टाटा यांनी डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. सायरस टाटा सन्सचे सर्वात तरुण चेअरमन होते. मिस्त्री कुटुंबीयांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागिदारी आहे. ते टाटा ट्रस्टमधील टाटा सन्सनंतर दुसरे मोठे समभागधारक आहेत.

24 ऑक्टोबर 2016 रोजी हकालपट्टी

सायरस मिस्त्री यांची अवघ्या 4 वर्षांतच 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 12 जानवारी 2017 रोजी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

या वादानंतर टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सायरस यांच्या कामाची पद्धत टाटा समूहाच्या कामाच्या पद्धतीशी सुसंगत नाही. त्यामुळे संचालक मंडळाने त्यांच्यावर अविश्वास दाखवल्याचे टाटा सन्सने म्हटले होते. सायरस 150 हून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते.

बातम्या आणखी आहेत...