आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे निधन:मर्सिडीज दुभाजकाला धडकली, मुंबईची महिला डॉक्टर चालवत होती कार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यात त्यांच्या कारला अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, 54 वर्षीय मिस्त्रींची मर्सिडीज कार चारोटी गावालगतच्या सूर्या नदीवरील पुलाच्या दुभाजकाला धडकली. धडकेनंतर मर्सिडीजच्या एअरबॅग्ज उघडल्या, पण त्यानंतरही मिस्त्रींसह 2 जणांचा बळी गेला. कारमध्ये एकूण 4 जण होते. सायरस यांची कार मुंबईतील एक महिला डॉक्टर चालवत होती.

प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. पोलिसांनी मर्सिडीजमधून प्रवास करणाऱ्या सर्वांची माहिती जारी केली आहे. अपघातात सायरस मिस्त्रींसह जहांगीर दिनशा पंडोले यांचाही मृत्यू झाला आहे. तर अनायता पंडोले (महिला) व त्यांचे पती दरीयस पंडोले जखमी झाले आहेत. अनायता पंडोले मुंबईतील विख्यात डॉक्टर आहेत. मर्सिडीज त्याच चालवत होत्या. त्यांचे पती दरीयस पंडोले JM फायनांशिअलचे CEO आहेत. जहांगीर पंडोले दरीयसचे वडील होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत.

दपारी 3.30 च्या सुमारास झाला अपघात

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या माहितीनुसार, 'मिस्त्री MH-47-AB-6705 क्रमांकाच्या कारने प्रवास करत होते. अपघात दुपारी 3.30 च्या सुमारास अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर झाला. त्यात 2 जण ठार, तर 2 जण जखमी झाले.'

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मिस्त्री यांच्यासह सर्वच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे सायरस व अन्य एकाला मृत घोषित करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघाताशी संबंधित 5 फोटो पाहा...

मर्सिडीज बेंझच्या अपघातानंतर सायरस मिस्त्री (उजवीकडे) व कार चालवणारी महिला डॉक्टर (डावीकडे) असे पडले होते.
मर्सिडीज बेंझच्या अपघातानंतर सायरस मिस्त्री (उजवीकडे) व कार चालवणारी महिला डॉक्टर (डावीकडे) असे पडले होते.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले.
अपघातात सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ GLC 220 कारच्या पुढील भागाचा असा चुराडा झाला होता.
अपघातात सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ GLC 220 कारच्या पुढील भागाचा असा चुराडा झाला होता.
सायरस मिस्त्रींची कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावरील डिव्हायडरला धडकली होती.
सायरस मिस्त्रींची कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावरील डिव्हायडरला धडकली होती.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मिस्त्रींची कार महामार्गावरून बाजूला काढली.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मिस्त्रींची कार महामार्गावरून बाजूला काढली.

गत जून महिन्यातच झाले होते वडिलांचे निधन

सायरस यांचे वडील व विख्यात उद्योगपती पालोनजी मिस्त्री (93) यांचे गत 28 जून रोजीच निधन झाले होते. आता सायरस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मातोश्री पाट्सी पेरिन डुबास, शापूर मिस्त्रींसह लैला मिस्त्री व अलू मिस्त्री या 2 बहिणी राहिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते एका ट्विटद्वारे म्हणाले - 'सायरस मिस्त्रींचे अकाली निधन स्तब्ध करणारे आहे. त्यांचा भारताच्या आर्थिक शक्तीवर विश्वास होता. त्यांच्या निधनामुळे उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबीय व मित्रांप्रती शोक संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.'

शिंदे, गडकरी व गोयंकासह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

सायरस मिस्त्री यांच्या निधनावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. गडकरी म्हणाले - 'टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे ऐकून अतिव दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती.'

NCP खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या - 'अत्यंत धक्कादायक बातमी. माझा भाऊ सायरस मिस्त्रीचे निधन झाले. विश्वास बसत नाही. रेस्ट इन पीस सायरस.'

आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनीही सायरस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले - 'सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. ते माझे खूप चांगले मित्र होते. त्यांनी शापूरजी पालोनजी समूहाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली.'

टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते सायरस

रतन टाटा यांनी डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. सायरस टाटा सन्सचे सर्वात तरुण चेअरमन होते. मिस्त्री कुटुंबीयांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागिदारी आहे. ते टाटा ट्रस्टमधील टाटा सन्सनंतर दुसरे मोठे समभागधारक आहेत.

24 ऑक्टोबर 2016 रोजी हकालपट्टी

सायरस मिस्त्री यांची अवघ्या 4 वर्षांतच 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 12 जानवारी 2017 रोजी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

या वादानंतर टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सायरस यांच्या कामाची पद्धत टाटा समूहाच्या कामाच्या पद्धतीशी सुसंगत नाही. त्यामुळे संचालक मंडळाने त्यांच्यावर अविश्वास दाखवल्याचे टाटा सन्सने म्हटले होते. सायरस 150 हून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते.

बातम्या आणखी आहेत...