आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काश्मीरच्या पर्यटनाची आेळख हाऊसबोट सेवेला आता घरघर लागतेय. दल सरोवर, नगीन सरोवर आणि झेलम नदीपात्रातील आलिशान लाकडी महालांची संख्या २० वर्षांत प्रचंड घटली आहे. आधी या भागात १६०० हाऊसबोट होत्या. ही संख्या आता ९१० एवढी आहे. आठ महिन्यांत १० हून जास्त हाऊसबोट दल सरोवरात बुडाल्या. सरोवरात व्यवसाय करणारे हाऊसबाेटचे मालक मोहंमद शरीफ म्हणाले, नवीन हाऊसबोट तयार करणे आणि जुन्या हाऊसबोटच्या दुरुस्तीवर बंदी आहे. त्यामुळे ही संस्कृती नामशेष होत चालली आहे. येथील बहुतांश हाऊसबोट ५० वर्षे जुन्या आहेत. आता काळानुसार या बोटी अधिक जर्जर होत आहेत. आम्हाला त्यांची दुरुस्ती करण्याचीदेखील परवानगी नाही. म्हणूनच ९१० हाऊसबोटी शिल्लक आहेत. त्यातही बहुतांश बोटींची स्थिती वाईट आहे.
त्यांची तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. असेच चालत राहिल्यास एका दशकानंतर तुम्हाला येथे एकही हाऊसबोट दिसणार नाही. २००९ मध्ये जम्मू-काश्मीर हायकोर्टाने हाऊसबोटच्या दुरुस्तीवर बंदी लावली होती. तत्कालीन राज्य सरकारने श्रीनगरच्या पाण्यातील प्रदूषणामागील मुख्य कारण हाऊसबोट सांगितले होते. २००९ नंतर पर्यटन विभागासमोर २०० हाऊसबोटच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. एक अन्य हाऊसबोटचे मालक बशीर अहमद म्हणाले, सरकार दल सरोवराच्या वाईट स्थितीसाठी हाऊसबोटला जबाबदार धरते. दल सरोवराच्या परिसरात शेकडो हॉटेल आहेत. लाखो लोकांची वस्ती आहे. हॉटेल व घरांचे सांडपाणी थेट दल सरोवरात सोडले जाते. मग केवळ हाऊसबोट मालक प्रदूषणाला कसे जबाबदार ठरतील? आमच्या हाऊसबोटींची तत्काळ दुरुस्ती करायला हवी, अन्यथा आम्ही आमची आेळख हरवून बसू. पर्यावरण कार्यकर्ते तारीक अहमद पतलू म्हणाले, सरोवराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
दररोजचे सुमारे ४.२ कोटी लिटरचे सांडपाणी सरोवरात सोडले जाते. या प्रदूषणात १ टक्के भागीदारी हाऊसबोटींची आहे. मात्र केवळ हाऊसबोटी जबाबदार नाहीत. हाऊसबोटच्या आकर्षणातून पर्यटक श्रीनगरला येतात. त्यांना येथे पाण्यात राहण्याचा अद्भुत अनुभव मिळतो. त्याशिवाय आरामदायी सुविधाही मिळतात. त्यात चार बेडरूमचीदेखील सोय असते. एका बेडरूमचा दर २ हजारांपासून ८ हजारापर्यंत असतो. हाऊसबोटची किंमत २-३ कोटी रुपये असते. दल सरोवराच्या संरक्षणावर १५ वर्षांत १ हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.