आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली हादरली:बंद हुक्का बारमध्ये 17 वर्षांच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या, अल्पवयीन जखमी; दोघांना अटक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील गोविंदपुरी भागात गुप्तपणे चालवल्या जाणाऱ्या हुक्का बारमध्ये एका 17 वर्षीय मुलाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी रविवारी सांगितले की, हत्येच्या आरोपाखाली दोन किशोरवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी एक तरुण चाकूहल्ल्यात जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी 3.15 वाजता कालकाजी पोलीस ठाण्यात पीसीआर कॉल आला. ज्यामध्ये 7-8 तरुणांनी बंद हुक्का बारमध्ये एका तरुणावर गोळ्या झाडल्याचं सांगण्यात आलं होतं. 1 एप्रिल रोजी हुक्का बार बंद करण्यात आला.

हुक्का बारच्या फरशीवर आढळले रक्त

माहिती मिळताच स्थानिक पोलीस गोविंदपुरी एक्स्टेंशनमध्ये पोहोचले. एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे हुक्का बार चालवला जात होता. पोलिस तेथे पोहोचले तेव्हा फरशीवर रक्ताचे डाग आढळले. स्थानिक लोकांकडून चौकशी केली असता जखमींना एम्समध्ये नेण्यात आल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय कुणालच्या डोक्यात गोळी लागली होती. त्याला रुग्णालयात नेले असताना त्याचा मृत्यू झाला. तर राहुलच्या पायावर वार करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याने वाद

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यावरून वाद झाला होता. अटक केलेल्यांपैकी एकाचा आक्षेपार्ह व्हिडिओ ​​​​​​​कुणाल आणि राहुल यांनी शेअर केला आहे. बदला घेण्यासाठी आरोपी हुक्का बारमध्ये पोहोचले होते. जिथे लकी नावाच्या व्यक्तीची बर्थडे पार्टी चालू होती. या पार्टीत कुणाल आणि राहुल उपस्थित होते.

दिल्ली पोलिसांनी पुढे सांगितले की, या प्रकरणाच्या तपासात स्थानिक हल्लेखोरांचा सहभाग समोर आला आहे. 15 आणि 17 वयोगटातील दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी इतिहास आहे. गुन्ह्यात वापरलेला दंडुका, तलवार (गुप्ती) आणि बुलेट दुचाकी जप्त करण्यात आली आहे.