आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यावरून शिवसेनेने नकार दिला आहे. यावर रावसाहेब दानवेंनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेकडे दाखवण्यापुरतेही हिंदुत्व राहिले नाही. त्यामुळे ते वारंवार आम्ही हिंदुत्ववादी आहोत, असा उल्लेख करत सुटलेत अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नीतीवरही त्यांनी जळजळीत टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात, मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर चालत नाही. मुस्लिमांचीही मते हवीत पण एमआयएम पक्ष चालत नाही. ही काँंग्रेसची नीती आहे. अशी टीकाही दानवेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केली आहे.
बाबासाहेबांचा काँग्रेसने दोनदा पराभव केला
एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर रावसाहेब दानवे यांनी आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यात उभे राहिले होते. काँग्रेसने उमेदवार उभा केला. पंडित जवाहरलाल नेहरू प्रचाराला आले. बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेब दादरमध्ये लोकसभेला उभे राहिले. त्या ठिकाणीही काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला. बाबासाहेबांचा पराभव केला. एका बाजूला दलितांचे मत लागतात, पण दलितांचा नेता लागत नाही. तसे एमआयएमचे मुसलमान मते लागतात, पण पक्ष लागत नाही. ही यांची नीती आहे, आता सर्वांनी ओळखून घेतले आहे, अशी जोरदार टीका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.
शिवसेनेकडे आता केवळ दाखवण्यापूरते ही हिंदुत्व राहिले नाही, म्हणून त्यांना सारखा तसा उल्लेख करावा लागतो की आम्ही हिंदुत्ववादी आहोत. मात्र शिवसेनेत आता भाजपला शह देण्याची क्षमता राहिली नाही, शिवसेनेचा घसरता जनाधार लक्षात घेता पक्षाला वाईट दिवस येऊ नये म्हणून हे सुरू आहे. असे मत रावसाहेब दानवेंनी व्यक्त केले आहे. केवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हिंमत वाढवण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे. यातून शिवसेना काही साध्य करू शकणार नाही असे ही यावेळी रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे
नेहमी एमआयएमही भाजपची बी टीम आहे अशी टीका होते. सावर बोलताना बी नाही तर एमआयएम आमची झेड टीमही नाही असे रावसाहेब दानवेंनी स्पष्ट केले आहे. तर आमचा नंबर एकचा शत्रू काँग्रेस, दोन नंबरचा शत्रू एमआयएम आहे. असे ही यावेळी त्यांनी सांगितले आहे. जनतेचा अंदाज घेण्यासाठी राष्ट्रवादीने टाकलेली ही गुगली आहे. राष्ट्रवादी गेला बाजूला, काँग्रेस गेला बाजूला, शिवसेनाच आतून एमआयएमशी हातमिळवणी करतेय की काय, अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण शिवसेनेने आतापर्यंत जे जाहीरपणे म्हणले नाही, तेच केले आहे. रावसाहेब दानवेंनी केलेल्या दाव्यानंतर आता शिवसेना एमआयएमशी हातमिळवणी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.