आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरमीतला पॅरोल:गुरमीत राम रहीमची पॅरोलवर सुटका, चोख सुरक्षा बंदोबस्तात गुरुग्रामला रवानगी; आईच्या आजारपणाचे दिले होते कारण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
2017 मध्ये तुरुंगात नेले जात असतानाचा फाइल फोटो - Divya Marathi
2017 मध्ये तुरुंगात नेले जात असतानाचा फाइल फोटो

बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी ढोंगी बाबा गुरमीत राम रहीमची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. हरियाणातील रोहतक तुरुंगात कैद असलेल्या गुरमीतला शुक्रवारी चोख बंदोबस्तात गुरुग्रामला रवाना करण्यात आले. गुरुग्राममध्ये त्याला कुठे ठेवले जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोबतच, त्याला किती दिवसांचा पॅरोल मिळाला हे सुद्धा सांगण्यात आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने आईच्या तब्येतीचे कारण दाखवून भेटीसाठी पॅरोल मिळवला आहे.

हनीप्रीत आणि कुटुंबियांना भेटण्याचा आग्रह
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरमीतने 17 मे रोजी सुनारिया तुरुंग अधीक्षक सुनिल सांगवान यांच्याकडे पॅरोलचा अर्ज केला होता. या घटनेच्या 6 दिवसांपूर्वीच गुरमीतची प्रकृती बिघडल्याने त्याला रोहतक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तरीही या दरम्यान तो वारंवार हनीप्रीत आणि आपल्या कुटुंबियांना भेटण्याचा आग्रह करत होता. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आले होते.

यापूर्वीही गुपचूप पद्धतीने मिळाला होता पॅरोल
गुरमती राम रहीमला यापूर्वीही पॅरोल मिळाला होता. राम रहीमने यापूर्वी पॅरोलसाठी अनेक वेळा अर्ज केला होता. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव त्याचे अर्ज फेटाळून लावण्यात आले होते. पण, गेल्या वर्षी आईची प्रकृती बिघडल्याने त्याला त्यावेळी गुपचूप पद्धतीने एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. त्याला आईची भेट करून देण्यासाठी मेदांता रुग्णालयात नेण्यात आले होते. यावरून हरियाणा सरकारवर चौफेर टीका झाली होती.

गुरमीतला दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची कैद झाली होती. तर पत्रकाराच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेप झाली. त्याला 25 ऑगस्ट 2017 रोजी पंचकुला न्यायालयात हजर करण्यात आले होते. CBI च्या विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवून सुनारिया तुरुंगात पाठवण्याचा निकाल दिला होता. 27 ऑगस्ट 2017 रोजी तुरुंगातूनच सुनावणी घेण्यात आली याच दिवशी त्याला शिक्षादेखील सुनावण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

बातम्या आणखी आहेत...