आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने शनिवारी केली. आता सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनला ड्रग कंट्रोलर जनरलकडून मंजुरी मिळणे बाकी आहे. तर झायडस-कॅडिलाला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. दुसरीकडे ब्रिटनमधून गुजरातेत परतलेल्या चौघांमध्ये कोरोनाचे नवे स्वरूप आढळले आहे. परिणामी देशात नव्या स्वरूपाची लागण झालेल्यांची संख्या ३३ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ब्रिटनहून येणाऱ्यांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार, ब्रिटनमधून ८ जानेवारी ते ३० जानेवारीपर्यंत येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य असेल. चाचणीचा खर्चही प्रवाशांना करावा लागेल.
दुसरीकडे पीएमओत मुख्य वैज्ञानिक सल्लागारपदी विजय राघवन यांच्या नियुक्तीवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधानांनी वुहानमधील ‘वटवाघळ’ प्रकल्पाचा भाग असणाऱ्या राघवन यांची नियुक्ती केल्याने आपण आश्चर्यचकित झाल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.
कुठेय कोरोना? भाजपची लस घेणार नाही : अखिलेश यादव
आपण कोरोना लस टोचून घेणार नसल्याचे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, देशात कुठेही कोरोना विषाणू संसर्ग नाही. केवळ विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपने हे भय पसरवले आहे. मी तर मास्क न घालताच सर्वांसोबत बसत असतो. विरोधकांना राज्यात-देशात कुठलाही कार्यक्रम घेता येऊ नये, केवळ याचसाठी भाजपने कोरोना संसर्ग पसरवलेला आहे.
आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लस, इतरांना जुलैपर्यंत : हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आधी ‘देशात लस मोफत दिली जाईल.’ असे म्हटले होते. नंतर ते म्हणाले, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना मोफत लस दिली जाईल. यात १ कोटी आरोग्य कर्मचारी व २ कोटी आघाडीवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्राधान्य यादीतील २७ कोटी लाभार्थींना जुलैपर्यंत कशी लस द्यायची याला अंतिम रूप दिले जात आहे. सुरक्षित व प्रभावी लसीला प्राधान्य आहे. अफवांकडे दुर्लक्ष करा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.