आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे डीएनए विधानावरुन वादात सापडले आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, जर हिंदू आणि मुस्लीमांचा डीएनए एकच आहे तर मग धार्मिक परिवर्तनाविरूद्ध कायदा बनवून उपयोग काय? लव्ह जिहादविरुद्ध कायदा तयार करण्याची काय गरज आहे? मोहन भागवत यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की, त्यांचे आणि ओवैसींचे डीएनए एकच आहे. अशी टीका सिंह यांनी मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये बुधवारी रात्री एका श्रद्धाजंलीच्या कार्यक्रमात केली.
दिग्विजय यांची विचारसरणी फुटीरतावादी - नरोत्तम मिश्रा
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मोहन भागवत यांच्या विधानाची बाजू घेत हे विचार देशाच्या एकात्मतेचे आणि अखंडतेचे असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच दिग्विजय सिंह यांची विचारसरणी फुटीरतावादी असल्याची टीका मिश्रा यांनी केली आहे.
भागवत आणि ओवैसी एकाच नाण्याच्या दोन बाजू
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती शेअर करत भागवत आणि ओवैसी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे संबोधले आहे. त्यासोबतच ते एकमेकांचे मदतनीस असल्याचे वर्णन सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे. यापूर्वी 5 जुलै रोजी सिंह यांनी एक ट्विट करत मोहन भागवतजी, तुम्ही तुमच्या शिष्यांना, उपदेशकांना, विश्व हिंदू परिषदेला, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही हा विचार द्याल का? हे शिक्षण तुम्ही मोदी-शहा आणि भाजपच्या मुख्यमंत्री यांनाही देणार आहात का? असा सवाल उपस्थित केला होता.
काय म्हणाले होते भागवत?
मोहन भागवत लोकांनी संबोधित करताना म्हणाले की, ‘पूजा करण्याच्या पद्धतीच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी जमावाद्वारे मारहाण करून हत्येत (लिंचिंग) सहभागी लोकांवर निशाणा साधला. लिंचिंग करणारे लोक हिंदुत्वविरोधी असल्याचे ते म्हणाले. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा. मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू असू शकत नाही.’ भागवत रविवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या ‘हिंदुस्तानी पहले, हिंदुस्तान पहले’ कार्यक्रमाला संबोधित करत होते.
भागवत यांच्या या विधानावर गोंधळ
‘हिंदू-मुस्लिम एकतेला वेगळे वळण लावले जात आहे, पण दोन्ही वेगवेगळे नाहीत, तर एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, भलेही ते कोणत्याही धर्माचे असोत. आपण लोकशाहीत राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व राहू शकत नाही, फक्त भारतीयांचे प्रभुत्व असू शकते. डीएनएच्या या विधानावरुन भागवत यांच्या मोठ्या प्रमाणावर टिका केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.