आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमाजवादी पक्षाच्या नेत्या आणि उमेदवार डिंपल यादव या मैनपुरी लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहे. त्यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार रघुराज सिंह यांना 2 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केले आहे. या निवडणुकीतील विजयासह त्या तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एक नजर टाकूया डिंपल यादव यांच्या जीवन प्रवासावर...
डिंपल यादव या समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी आहेत. सपचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव यांच्या त्या सून आहेत.
जन्म महाराष्ट्रात, शिक्षण पुण्यात
डिंपल यादव यांचा जन्म 15 जानेवारी 1978 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांचे वडील भारतीय सैन्यदलात कर्नल होते. कर्नल राम चंद्र सिंह रावत त्यांचे वडिल आहेत तर त्यांच्या आईचे नाव चंपा रावत आहे. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तराखंडचे आहेत. मात्र त्यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले. याशिवाय भटिंडा आणि अंदमान व निकोबार बेटांवरील आर्मी स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. लखनौ विद्यापीठातून त्यांनी वाणिज्य विषयात पदवी घेतली.
विद्यार्थीदशेतच अखिलेश यांच्यासोबत प्रेम
विद्यार्थीदशेतच डिंपल यांचा अखिलेश यादव यांच्याशी भेट झाली. तिथेच त्यांचे प्रेम जडले. अखिलेश यांच्या कुटुंबीयांचा दोघांच्या विवाहाला आधी विरोध होता. पण अखिलेश यांच्या आजी मूर्ती देवींनी विवाहाला परवानगी दिल्यानंतर कुटुंबीय विवाहासाठी तयार झाले. या दोघांचा 24 नोव्हेंबर 1999 रोजी विवाह झाला.
तीन अपत्ये
अखिलेश आणि डिंपल यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. त्यांच्या मुलींची नावे टिना आणि अदिती तर मुलाचे नाव अर्जुन आहे.
पराभवाने राजकीय कारकीर्दीला सुरुवात
2009 मधील फिरोजाबादमधील लोकसभेच्या पोट निवडणुकीतून डिंपल यादव यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या राज बब्बर यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 2012 मधील लोकसभेच्या निवडणुकीत कनौजमधून त्या बिनविरोध निवडून आल्या. तेव्हा त्या स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून बिनविरोध निवडून येणाऱ्या केवळ चौथ्या आणि देशातील 44 व्या उमेदवार ठरल्या. उत्तर प्रदेशातून लोकसभेवर बिनविरोध निवडून जाणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवारही ठरल्या. 2014 मध्ये कन्नौज मतदारसंघातून त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या. 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना कन्नौज मतदारसंघातून भाजपच्या सुब्रत पटनायक यांच्याकडून 10 हजार मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला.
डिंपल भाभी या नावाने लोकप्रिय
डिंपल यादव यांना उत्तर प्रदेशात डिंपल भाभी या नावाने ओळखले जाते. डिंपल यांचे पती अखिलेश यादव यांना यूपीतील मतदार भैया या नावाने संबोधतात. त्यामुळे त्यांचे डिंपल भाभी हे नाव जनतेत प्रचलित झाले आहे. मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबातील राजकारणात सक्रीय असणाऱ्या डिंपल या सहाव्या व्यक्ती आहेत.
डिंपल-अखिलेश यांची Love Story
अखिलेश यादव अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अखिलेश आणि डिंपल यांची पहिली भेट झाली तेव्हा अखिलेश 21 वर्षांचे तर डिंपल 17 वर्षांच्या होत्या. एका मित्राच्या घरी दोघांची भेट झाली होती.
आजीच्या मदतीने कुटुंबीयांना सांगितले
अखिलेश शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेल्यावरही डिंपल त्यांच्या संपर्कात होत्या. अखिलेश बहुतेकवेळा ऑस्ट्रेलियातून डिंपल यांना कार्ड आणि प्रेमपत्र पाठवायचे. अखिलेश ऑस्ट्रेलियातून परतल्यावर त्यांच्यावर कुटुंबीयांकडून लग्नासाठी दबाव येऊ लागला. यानंतर डिंपल यांच्याविषयी कुटुंबीयांना कसे सांगावे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर अखिलेश यांनी आजीच्या मदतीने कुटुंबीयांना डिंपल यांच्याविषयी सांगितले.
मुलासमोर वडिलांची माघार
मुलायम सिंह यादव यांना डिंपल पसंत नव्हत्या असे सांगितले जाते. डिंपल राजपूत होत्या आणि त्यांचे वडील सैन्यात असल्याने मुलायम सिंहांना हे नाते पसंत नसल्याचे सांगितले जाते. मात्र अखिलेश यादव निर्णयावर ठाम राहिले. अखेर मुलासमोर वडिलांना माघार घ्यावी लागली आणि दोघेही विवाहबद्ध झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.