आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामच्या जेराई गावातून ग्राउंड रिपोर्ट:उल्फाचा आदेश धुडकावला; येथे जोमाने फडकेल तिरंगा

आसाम / दिलीपकुमार शर्मा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेराईतील शाळा मुख्याध्यापक दिलीप बरुआ प्रजासत्ताक दिनाची तयारी करताना. - Divya Marathi
जेराईतील शाळा मुख्याध्यापक दिलीप बरुआ प्रजासत्ताक दिनाची तयारी करताना.
  • गेल्या वर्षी 26 जानेवारीला उल्फा- आयने राज्यात 5 बॉम्बस्फोट केले होते

आसाममध्ये अतिरेकी संघटना उल्फा- आयने एक लेखी आदेश काढून लोकांना प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. ही संघटना आपला दबदबा दाखवून देण्यासाठी अशावेळी स्फोट घडवून आणते. तरीही उल्फा- आयचे कमांडर इन चीफ परेश बरुआचे गाव जेराईमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. गावात प्रवेश करताच डावीकडे पहिले घर उल्फाचे संस्थापक अनुप चेतियाचे आहे. त्यानंतर पुढचे घर परेश बरुआचे आहे. तेथे त्यांचे मोठे बंधू बिमल बरुआ राहतात. जेराई गावातील स्वच्छ व पक्के रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र या गावाला भारताच्या कोणत्याही विकसित गावाबरोबर आणतात.

सरपंच मेदिना कोच बरुआ सांगतात, उल्फा आदेश काढत असली तरी १५ वर्षांपासून आम्ही प्रजासत्ताक दिवस साजरा करतोय. १९७९ मध्ये स्थापनेनंतर उल्फा आसामला स्वतंत्र देश करण्याच्या मागणीवर ठाम आहे. मात्र, अरविंद राजखोवा, अनुप चेतिया सारखे उल्फा नेते समर्पण करत सरकारसोबत चर्चा करत आहेत.

सरपंच मेदिना सांगतात, स्वतंत्र देशाची मागणी पूर्ण होणार नाही. आम्ही सर्व भारतीय नागरिक आहोत. गावातील अनेकांनी आपली मुले गमावली आहेत. उल्फामुळे गावातील लोकांना वाईट वागणूक मिळाली. आमच्या पुढच्या पिढीने शिक्षण, खेळाच्या क्षेत्रात छाप पाडावी असे आम्हाला वाटते. सध्या आमचे गाव फक्त उल्फाच्या नावाने ओळखले जाते.

जेराईतील शाळा मुख्याध्यापक दिलीप बरुआ २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची तयारी करत आहेत. ते म्हणतात, राष्ट्रीय दिवसाचे पालन करणे माझे कर्तव्य आहे. उल्फाशी काहीही संबंध नसताना लष्कराच्या उल्फा विरोधातील कारवाईत मी १६ वर्षांच्या भावाला गमावले आहे. मला विनाकारण मारहाण करण्यात आली, त्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

जेराईत राहणारे परेश बरुआचे मोठे बंधू बिमल बरुआ सांगतात, उल्फाबाबत लोकांच्या भावना खूप बदलल्या आहेत. सरकारने रस्ते, शिक्षण, आरोग्याच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी बिमल बरुआ यांचा २२ वर्षांचा मुलगा मुन्ना डिगबोई तेल रिफायनरीतील अॅप्रेन्टिस ट्रेनिंग सोडून उल्फा-आयमध्ये सामील झाला. याबाबत नाराज बिमल बरुआ सांगतात, कोणतेही आई- वडील त्यांच्या शिकलेल्या मुलाला अतिरेकी संघटनेत पाठवणार नाहीत. त्याला अभियांत्रिकीचे शिक्षण दिले होते. आमचा मुलगा जिवंत आहे की, नाही याबाबत उल्फाने माहिती देण्याचे आवाहन करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...