आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार,
दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत आहे. आज मंगळवार 7 मार्च असून फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी. पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी.
गारपिटीमुळे राज्यातील शेतीचा झाला शिमगा
राज्यातील काही भागांना सोमवारी पहाटे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. विशेषत: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यात वादळी वारे व गारपीट झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कापूस, कांदे व फळपिकांना योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर ऐन होळीच्या सणात नवे विघ्न ओढवले. नाशिक जिल्ह्यात २६८५.३५ हेक्टरवरील द्राक्ष, कांदा, गहू आणि डाळिंबासह भाजीपाला पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली. निफाड, सिन्नर, बागलाण, येवला, दिंडोरी, नाशिक तालुक्यात जास्त नुकसान झाले. तर नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील रस्त्यांवर अक्षरश: गारांचा खचस साचला होता. वाचा सविस्तर
विधानसभेच्या नोटिसीला राऊतांची केराची टोपली
उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्य विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याप्रकरणी विधानसभेत हक्कभंग सूचना दाखल झाली आहे. त्यासंदर्भात लेखी खुलासा ४८ तासात करावा, अशी नोटीस विधानसभा अध्यक्षांनी बजावली होती. सदर नोटीसची मुदत संपली आहे. मात्र राऊत यांनी विधिमंडळाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली असून विधिमंडळ सचिवालय राऊतांना स्मरणपत्र पाठवणार असल्याचे समजतेय. होळी व सु्ट्यामुंळे चार दिवस विधिमंडळाचे कामकाज बंद होते. बुधवारी कामकाज पुन्हा एकदा सुरु होणार आहे. या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राऊत यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंग सूचनेवर निर्णय देणार आहेत. वाचा सविस्तर
त्रिपुरात माणिक साहा पुन्हा एकदा मुख्यमंत्री
माणिक साहा पुन्हा एकदा त्रिपुराचे मुख्यमंत्री होणार आहेत. सोमवारी भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड झाली असून त्यांचा शपथविधी ८ मार्च रोजी होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणे अपेक्षित आहे. याआधी केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाईल, असा कयास लावला जात होता. वाचा सविस्तर
पाककडून युक्रेनला दारूगोळ्याची रसद
आर्थिक कंगाली आणि अन्नधान्याच्या विवंचनेत सापडलेल्या पाकिस्तानला रशियाने मदत केली. त्याबदल्यात पाकिस्तान रशियाला धोका देत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने युक्रेनला रॉकेट आणि तोफगोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी ब्रिटनशी करार केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तान शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसोबत हा करार केला आहे. या कारखान्यांची मालकी पाकिस्तान सरकारकडे आहे. करारांतर्गत तोफखान्याच्या रॉकेटसह दारूगोळ्याचे १६२ कंटेनरची खेप एमव्ही ज्यूस्ट जहाजाने फेब्रुवारीमध्ये कराचीवरून जर्मनीमार्गे युक्रेनला पाठवली आहे. वाचा सविस्तर
WPL मध्ये मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय
हेली मॅथ्यूजच्या 77 धावा आणि 3 बळी या दुहेरी कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 9 गडी राखून पराभव केला. सोमवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर, बेंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.4 षटकांत सर्वबाद 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने हेली मॅथ्यूज आणि नताली स्किव्हर ब्रंट यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर 14.2 षटकांत एक विकेट गमावून विजय मिळवला आहे. वाचा सविस्तर
आता पाहुयात आज दिवसभर आपली नजर कशावर असणारे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.