आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरने धावत जाऊन वाचवले रुग्णाचे प्राण:ट्रॅफिक जाममध्ये अडकले होते; शस्त्रक्रियेसाठी 3 KM धावत जाऊन रुग्णालय गाठले

बंगळुरू17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरुतील एका डॉक्टरने तब्बल 3 किमी धावत जाऊन रुग्णाचे प्राण वाचवल्याची कौतुकास्पद घटना घडली आहे. हा डॉक्टर बंगळुरुच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकला होता. तिकडे रुग्णालयात एका रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया करायची होती. ट्रॅफिकमधून वेळेवर सुटका होणार नाही हे लक्षात आल्यानंतर या डॉक्टरने आपली कार तिथेच सोडून धावत रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

डॉक्टर गोविंद नंदकुमार असे या डॉक्टरचे नाव आहे. ते बंगळुरुच्या मणिपाल रुग्णालयात गॅस्ट्रो एंटरोलॉजी सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ते 30 ऑगस्ट रोजी एका अर्जंट लेप्रोस्कोपिक गॉलब्लॅडरच्या सर्जरीसाठी जात होते. पण ते सरजापूर-मराठपल्ली मार्गावरील ट्रॅफिक जाममध्ये अडकले.

रुग्णालयात दाखल महिलेवर लवकर शस्त्रक्रिया होणे अत्यंत महत्वाचे होते. त्याला उशीर झाला तर तिच्या प्राणावरही बेतले असते. पण ट्रॅफिक जाममुळे डॉक्टर नंदकुमार यांना इंचभरही हालता येत नव्हते. अखेर त्यांनी आपली कार आहे त्याच ठिकाणी बाजूला लाऊन धावत रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तब्बल 3 किमी धावत जाऊन महिला रुग्णावर शस्त्रक्रिया केली.

12 दिवसांपूर्वीची घटना

डॉक्टर नंदकुमार यांनी सांगितले की, ते सेंट्रल बंगळुरुच्या मणिपाल रुग्णालय, सरजापूरमध्ये नियमित ये-जा करतात. त्या दिवशीही ते वेळेपूर्वीच घराबाहेर पडले होते. त्यांची टीम सर्जरीसाठी पूर्णतः तयार होती. पण हेवी ट्रॅफिक पाहून त्यांनी कार व चालक तिथेच सोडून धावत जाण्याचा निर्णय घेतला. ते कोणताही विचार न करता धावत निघाले.

डॉक्टर नंदकुमार यांनी सांगितले की, मी नियमित व्यायाम करत असल्यामुळे धावणे माझ्यासाठी नवी गोष्ट नव्हती.
डॉक्टर नंदकुमार यांनी सांगितले की, मी नियमित व्यायाम करत असल्यामुळे धावणे माझ्यासाठी नवी गोष्ट नव्हती.

डॉक्टर नंदकुमार यांची सहकारी रुग्णाला अॅनेस्थेशिया देण्याची तयारी करत होते. ते ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचताच तातडीने शस्रक्रिया करण्यात आली. हे ऑपरेशन यशस्वी ठरले. तसेच रुग्णाला वेळेवर सुट्टी देण्यात आली.

ट्विटरवर शेअर केला व्हिडिओ

डॉक्टर नंदकुमार यांनी आपल्या धावण्याचा एक शॉर्ट व्हिडिओही तयार केला. त्यांनी तो सोमवारी ट्विटरवर शेअर केला. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अशा स्थितीचा सामना करण्याची ही माझी काही पहिलीच वेळ नाही. बंगळुच्या विविध भागांत अनेकदा पायीच प्रवास करावा लागतो. कधी-कधी रेल्वे मार्गही ओलांडावा लागतो. मला कोणतीही काळजी नव्हती. कारण रुग्णाची योग्य ती काळजी घेण्यासाठी रुग्णालयात मुबलक स्टाफ व मुलभूत सोईसुविधा उपलब्ध होत्या. पण एखाद्या छोट्या रुग्णालयासाठी ही स्थिती गंभीर ठरली असती.

ट्रॅफिक जामविषयी ते म्हणाले की, त्या दिवशी रुग्ण व त्यांचे कुटुंबीय माझी वाट पाहत होते. सर्वजण एखादा रुग्ण वाहतूक कोंडीत अडकला तर काय होईल या प्रश्नावर विचार करत होते. कारण तिथे रुग्णवाहिका जाण्यासाठीही जागा नव्हती.

बातम्या आणखी आहेत...