आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Agnipath Scheme India | Agnipath Scheme Statment Arun Puri | Don't Back Down From 'Agneepath', Recruitment Process Starts In June, Some Organizations Call For India Shutdown Today

सरकार ठाम:‘अग्निपथ’वरून माघार नाहीच, जूनमध्येच भरती प्रक्रिया सुरू, काही संघटनांचे आज भारत बंदचे आवाहन

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिन्ही लष्करी दलांच्या प्रमुखांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतल्यानंतर ‘अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही,’ असे सरकारने रविवारी स्पष्ट केले. त्याबरोबरच योजनेअंतर्गत भरतीचा कार्यक्रम जारी करून सशस्त्र दलांत याच माध्यमातून भरती करण्याचे सरकारचे इरादे जाहीर केले. लष्करी प्रकरणांचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, ‘सशस्त्र दलांना या योजनेची अत्यंत आवश्यकता आहे. भविष्यात तिन्ही दलांत अधिकारी रँकच्या खालील सर्व भरती अग्निपथ योजनेमार्फतच होईल. पहिल्या वर्षी ४६ हजार जणांची भरती केली जाईल. पुढील ४ ते ५ वर्षांत ५०-६० हजार जणांची भरती होईल आणि नंतर हा आकडा वाढून ९० हजार ते एक लाख होईल. तिन्ही दलांचे सरासरी वय कमी करण्यास प्राधान्य आहे. तीन दशकांपासून यावर विचार केला जात आहे. कारगिल आढावा समितीनेही याबाबत टिप्पणी केली होती. या सुधारणेसह देशातील तिन्ही दलांत अनुभव आणि उत्साह यांचा संगम करण्याची आमची इच्छा आहे. आमचा उद्देश देशातील लष्कर तरुण करणे, जवानांचे सरासरी वय ३२ वर्षांवरून २६ पर्यंत कमी करणे हा आहे. आजचे युवक टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांना तंत्रज्ञानाची माहिती आहे. भविष्यात युद्ध तंत्रज्ञानाद्वारे लढले जाईल, रणगाडे आणि तोफांद्वारे नव्हे. आपल्याला ड्रोन वॉरसाठी तयार राहावे लागेल.’ त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांनी भरती कार्यक्रमाची माहिती दिली.

नियमित सैनिकांसारख्या सुविधा आणि सेवा शर्ती :
अग्निवीरांना सियाचीन आणि इतर क्षेत्रांत तैनात केल्यास त्यांना सध्या कार्यरत असलेल्या नियमित सैनिकांएवढाच भत्ता मिळेल. सेवा शर्तीत अग्निवीरांबाबत कुठलाही भेदभाव होणार नाही. अग्निवीरांनाही नियमित सैनिकांसारख्याच सुविधा मिळतील. त्यांना याआधीच्याच पायाभूत आराखड्याचा लाभ मिळेल. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची भरपाई मिळेल. त्यांच्यासाठी वेगळी बरॅक किंवा प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था केली जाणार नाही.

आंदोलनात सहभागी नव्हतो असे शपथपत्र युवकांना द्यावे लागेल : पुरी म्हणाले, ‘शिस्त हाच लष्कराचा पाया आहे. जाळपोळ, तोडफोड करणाऱ्यांसाठी येथे कुठलेही स्थान नाही. आपण निदर्शने, जाळपोळ, तोडफोड आणि हिंसाचारात सहभागी नव्हतो, असे शपथपत्र अग्निवीर बनण्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला द्यावे लागेल. पोलिस सत्यापन अनिवार्य असेल. एखाद्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल तर तो सशस्त्र दलांत सहभागी होऊ शकणार नाही.

बनावट देशभक्त ओळखा : प्रियंका : योजनेविरोधात युवकांमधील आक्रमकता कमी झाली, पण राजकीय विराेध वेगाने वाढत आहे. अग्निपथ योजनेचा विराेध करणाऱ्या युवकांच्या समर्थनात काँग्रेसने दिल्लीत जंतर-मंतर येथे सत्याग्रह केला. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी युवकांचे समर्थन करत बनावट देशभक्त ओळखावे, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी साेशल मीडियावर म्हणाले, खोटी आश्वासने देऊन युवकांना बेराेजगारीच्या अग्निपथावर चालण्यास भाग पाडले जात आहे. शिवसेनेच्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, युवकांकडे नोकऱ्याच नसतील तर राम-राम म्हटल्याने काहीच साध्य होणार नाही. युवकांच्या महत्त्वाकांक्षा आणि आयुष्याशी खेळ करणे योग्य नाही. करारावर सैनिक ठेवणे धोकादायक आहे.

तेलंगणात काेचिंग संचालक माजी सैनिक अटकेत, बिहारमध्ये चार काेचिंग संस्थांवर गुन्हा
पाटणा / हैदराबाद - बिहार आणि तेलंगणामध्ये हिंसाचारामागे कोचिंग संस्था असल्याचे समोर आले आहे. बिहारमध्ये चार काेचिंग संस्थांवर तरुणांना भडकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. ६२० पेक्षा जास्त लोकांना यापूर्वीच अटक केली आहे आणि १३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणातील सिकंदराबादेत हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी कोचिंग संचालक सुब्बाराव यांना अटक केली. सुब्बाराव माजी सैनिक असून आंध्र-तेलंगणात सुमारे ८ कोचिंग संस्थांचे मालक आहेत. पोलिसांनुसार सुब्बारावने व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला होता. त्याद्वारे लोकांना आंदोलनात बोलावले होते. रविवारी गुजरातच्या अहमदाबादेत विनापरवानगी आंदोलनासाठी गोळा झालेल्या १४ लोकांना ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांत ९ जणांना अटक आणि ८ जणांना ताब्यात घेतले आहे.

तिन्ही लष्करी दलांचा भरती कार्यक्रम जाहीर
-हवाई दल : नोंदणी : २४ जूनपासून
आॅनलाइन परीक्षा : पहिला टप्पा -२४ जुलैपासून डिसेंबरपर्यंत पहिल्या बॅचचे नामांकन. प्रशिक्षण : ३ डिसेंबरपर्यंत सुरू.
-नाैदल : भरतीचा सविस्तर कार्यक्रम: २५ जूनपर्यंत जाहीर हाेईल. प्रशिक्षण : पहिल्या बॅचचे प्रशिक्षण २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू.
-सैन्य दल : ४०,००० अग्निवीरांच्या भरतीसाठी ८५ फेऱ्या. २० जून रोजी मसुदा अधिसूचना जाहीर हाेईल. एक जुलैनंतर वेगवेगळ्या भरती युनिट अधिसूचना जारी करतील. प्रशिक्षण : २५००० अग्निवीरांच्या पहिल्या बॅचचे डिसेंबरपूर्वी आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत, दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२३ पासून

अग्निवीर योजनेत महिलांना संधी देणार नौदल
नौदलाने महिला अग्निवीरांची भरती केली जाईल असे संकेत व्हाइस अॅडमिरल डी. के. त्रिपाठी यांनी दिले. महिला आणि पुरुष अग्निवीरांना आयएनएस चिल्कावर प्रशिक्षण दिले जाईल.

आज भारत बंदचे आवाहन : अग्निपथ योजनेच्या विरोधात काही संघटनांनी सोमवारी भारत बंदचे आवाहन केल्याने सरकार अलर्ट आहे. काँग्रेसने देशभरात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...