आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:7 जूनपर्यंत 23.5 कोटी लोकांना डोस; त्यापैकी मृत्यू फक्त 0.0002 % : केंद्र

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात कोरोना लसीमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूला केंद्र सरकारने दिला दुजोरा

कोरोना लसीमुळे देशात पहिल्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या वृत्तानंतर केंद्र सरकारने म्हटले आहे की, १६ जानेवारीपासून सात जूनपर्यंत २३.५ कोटी लोकांना डोस (एक किवा दोन्ही) देण्यात आले आहेत. त्यात फक्त ०.०००२% मृत्यू झाले आहेत. अशा प्रकारे कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या तुलनेत लसीकरणानंतर मृत्यू जोखीम नसल्यासारखीच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले की, एवढ्या मोठ्या संख्येत लस दिल्यानंतर त्यामुळे झालेल्या मृत्यूंचा हा दर नगण्य आहे.

मंत्रालयाने याबाबत प्रसिद्ध झालेल्या माध्यमांतील बातम्या म्हणजे ‘अपूर्ण’ आणि ‘मर्यादित समज’ अशी टिप्पणी केली. या वृत्तांत म्हटले आहे की, १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर सात जूनपर्यंत कोरोनाची लस घेतल्यामुळे ४८८ मृत्यू झाले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींच्या दुष्परिणामांवर अभ्यास करत असलेल्या केंद्रीय समितीच्या अहवालात कोरोना लस घेतल्यानंतर देशात पहिल्या मृत्यूला दुजोरा मिळाला आहे. या अहवालानुसार, लसीकरणानंतर अॅनाफिलेक्सिसमुळे (प्राणघातक अॅलर्जी) ६८ वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला ८ मार्चला लस देण्यात आली होती. समितीने लसीच्या प्रतिकूल परिणामांमुळे झालेल्या मृत्यूंच्या ३१ प्रकरणांचे मूल्यांकन केले होते.

फायझर, अॅस्ट्राझेनेका कोरोनाच्या डेल्टा स्वरूपावरही उपयोगी
लंडन | फायझर-बायाएनटेक आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना प्रतिबंधक लसी विषाणूच्या डेल्टा स्वरूपावरही गुणकारी आहेत. “द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित एका शोधनिबंधात हे नमूद करण्यात आले आहे. पब्लिक हेल्थ स्कॉटलंड आणि ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. त्यानुसार, फायझर आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लसी तुलनेने डेल्टा स्वरूपावर अधिक सुरक्षा देत आहेत. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका लस भारतात पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशील्ड नावाने तयार होत आहे, हे येथे उल्लेखनीय होय.