आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dr Babasaheb Ambedkar Birth Anniversary Today Updates: The Philosopher Of Complete Modernity In India Dr. Yashwant Manohar; News And Live Updates

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष:भारताच्या पूर्ण आधुनिकतेचे तत्त्वज्ञ - डॉ. यशवंत मनोहर

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंधुपूर्वकाळापासून भारतात एक श्रमणसंस्कृती नांदली. परस्परसलोखा आणि इहवाद हीच तिची प्रकृती होती. वेगवेगळ्या गणसत्ताकांची ही संस्कृती होती. पुढे वेदांमधून चातुर्वण्याचे शोषणसत्ताक आले आणि समतेची जागा विषमतेने घेतली. मुक्ततत्त्ववादाची जागा मूलतत्त्ववादाने घेतली.

परस्परांमधील करुणाभाव आणि इहवादी मानसिकता ही आधुनिकतेचीच पायाभूत तत्त्वे आहेत. इहवाद या संकल्पनेत विज्ञानदृष्टी, बुद्धिप्रामाण्यवाद आणि निरंतर निर्दोष होत राहण्याची प्रक्रिया अंतर्भूत आहे. आधुनिकता हा पूर्ण ‘समानुष’ जीवनाचा प्रवाही मूल्यप्रकल्पच आहे. कोणत्याही विद्यमान स्थितीतील पूर्ण अद्ययावतता म्हणजे आधुनिकता. या आशयाच्या ‘अधुनापासून आधुनिक ही संकल्पना निर्माण झाली आहे. जीवनातील त्रुटींशी आणि प्रश्नांशी सामना करताना माणसाला जे अद्ययावत रूप प्राप्त होते, त्याला आधुनिकता म्हणायला हवे. स्वतःला अन्वर्थक, कालोचित आणि परिष्कृत करण्याची ही मानवी प्रक्रिया नूतनीकरणाचीच किंवा पुनर्घडणीचीच प्रक्रिया असते. आधुनिकता अशी सतत सर्वमय होत राहणारी विधायक जीवनशैली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्वज्ञ होते आणि त्यांची आधुनिकता आमूलाग्र व्यवस्थांतर करणारीच होती. व्यवस्थेत काही तपशिलाचे बदल असा सुधारणावाद त्यांना मान्यच नव्हता, तर अन्याय्य व्यवस्था तिच्या संपूर्ण तत्त्वव्यूहासकट उद्ध्वस्त करणे आणि नव्या न्याय्य तत्त्वव्यूहासकट नवी व्यवस्था निर्माण करणे, हा त्यांच्या आधुनिकतेचा अर्थ होता.

सिंधुपूर्वकाळापासून भारतात एक श्रमणसंस्कृती नांदली. परस्परसलोखा आणि इहवाद हीच तिची प्रकृती होती. वेगवेगळ्या गणसत्ताकांची ही संस्कृती होती. पुढे वेदांमधून चातुर्वण्याचे शोषणसत्ताक आले आणि समतेची जागा विषमतेने घेतली. मुक्ततत्त्ववादाची जागा मूलतत्त्ववादाने घेतली. सलोखा, स्वातंत्र्य, इहवाद या गोष्टींना मागे सारून ब्राह्मणवर्णाचे वर्चस्व पुढे आले. इथून भारतात पुढे श्रमणसंस्कृतीची आधुनिकता आणि वैदिक मूलतत्त्ववाद हा मूल्यसंघर्ष सुरू झाला. हा समानुषता आणि अमानुषता, सर्वसमता आणि सर्वविषमता, इहवाद आणि परलोकवाद, न्याय आणि अन्याय असा संघर्ष होता. हा स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य, सत्य आणि असत्य वा सद आणि असद असा संघर्ष होता. हा स्थितिवाद विरुद्ध गतिवाद वा शोषण आणि शोषणविहीनता यांच्यातीलच संघर्ष होता. हा मूठभर अभिजनांचे अतार्किक वर्चस्व आणि सर्वजनांना सममूल्य असाच संघर्ष होता. बाबासाहेबांनी या झगड्यात माणसाच्या सार्वभौमत्वासाठी आधुनिक मूल्यांचे महाकथन डोक्यात घेतले. त्यांनी पाश्चात्त्य आधुनिकतेचेही मर्म समजावून घेतले आणि श्रमणसंस्कृतीपासूनची भारतातील आधुनिकताही त्यांनी प्रखरपणे पुढे आणली. या आधुनिकतेलाच त्यांनी ‘भारतीय’ हे मूल्यदर्शी नाव दिले. मी कोणती जात नाही, कोणता धर्म नाही, कोणता प्रांत नाही. मी प्रारंभीही केवळ भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे आणि ‘आम्ही भारताचे लोक’ असे नवे भान, नवे वर्णन इथल्या लोकांना दिले. जातींच्या आणि धर्माच्या जखमांनी जर्जर झालेल्या इथल्या गर्दीला ‘भारतीय’ हे एकसंधता देणारे सुंदर शीर्षक त्यांनी दिले. पूर्वी ‘एक जात-एक मूल्य, एक धर्म-एक मूल्य’ अशी विघटनशीलता होती. आता ‘एक व्यक्ती-एक मूल्य’ हे आधुनिकतेचे नवे संघटनसूत्र त्यांनी दिले.

हा एकूण समाजाचे तुकडे करणाऱ्या व्यवस्थेला बदलण्याचाच मुद्दा आहे. माणसांची गर्दी म्हणजे राष्ट्र नव्हे. विघटन म्हणजे भारत नव्हे. एका जातीचे वा एका धर्माचे राष्ट्र संभवत नसते. लोकांधील परस्परसलोखा म्हणजे संविधानराष्ट्र म्हणूनच विषमतेचे निर्मूलन करून आपल्या संमिश्र वा बहुविध लोकजीवनाचे जतन करायला हवे असे बाबासाहेबांचे संविधान सांगते. बाबासाहेबांचा हा आधुनिक मूल्यांचा कोश पूर्णतः बुद्धिप्रामाण्यवादी आहे. विज्ञान जसे कुठे थांबत नाही तसा हा आधुनिकत्वाचा प्रकल्पही कुठे थांबत नाही. विचार कुठे थांबत नाही. ज्ञान कुठे थांबत नाही. अधिक निर्दोष होत राहणारी माणसाची प्रज्ञा कुठे थांबत नाही. जीवनातील सर्व विद्रूपांविरुद्ध संघर्ष करीत ती पुढे पुढे जात राहते. माणसाचे हे वर्तन जीवनाच्या अधिक निरामयतेचे सतत निर्माण करणारे आधुनिक वर्तनच असते. बाबासाहेब आंबेडकरांची ही आधुनिकता माणसाला त्याच्या निसर्गदत्त ताकदीची सतत जाणीव करून देते. माणसाला सर्वच प्रकारच्या परावलंबनापासून मुक्त करण्यासाठी आंदोलन उभे करते. या आधुनिकतेने माणसालाच जीवनाचा एकमेव महानायक मानले.

माणूसच सर्व गोष्टींचा एकमेव मूल्यदंड आहे, हे बाबासाहेबांची आधुनिकता सांगते आणि भारतीय आधुनिकतेचे निर्माते बाबासाहेब अत्यंत निर्णायक भाषेत हे सांगतात की, “शेवटची गोष्ट तुम्हास सांगतो, की दैवावर भरवसा ठेवून वागू नका. जे काही करायचे असेल, ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा.” ही आहे बाबासाहेबांची पूर्ण आधुनिकता. तिला आमूलाग्र व्यवस्थांतरच अभिप्रेत आहे. कुठल्यातरी श्रद्धेला वा अंधश्रद्धेला ही आधुनिकता अजिबात जवळ फिरकू देत नाही. या संदर्भात एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला हवी की या आधुनिकतेला जितके आपण दूर लोटू तितकेच जीवनही आपल्याला टूर लोटेल. कोरोनाच्या प्रारंभ काळात यज्ञ, पूजा, मंत्रपठण, टाळ्या-थाळ्या वाजवणे या गोष्टी झाल्या. हे सर्व उपाय सांगणाऱ्या मंदिरनिष्ठांनी मंदिराकडे जाणारे रस्ते सोडले आणि हे सर्वच लोक आता दवाखान्याच्या मार्गाने निघाले आहेत. दैववाद हरतो आहे. थाळ्या-टाळ्या निरर्थक ठरत आहेत. सर्वच आधुनिकताविरोधी माणसे आधुनिकतेच्या आश्रयाला जात आहेत. लस घेत आहेत. त्यांच्या नकळत ते स्वतःला खोडून काढत आहेत. आधुनिकतेचा विजय जाहीर करीत आहेत. हे लोकच बाबासाहेबांच्या आधुनिकतेचे अजिंक्य झेंडे खांद्यावर घेत आहेत.

संविधानाच्या ४७ व्या अनुच्छेदात बाबासाहेबांनी पोषणमान उंचावण्याचा आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा निर्देश केला आहे. आज राज्यकर्त्यांच्या भयानक अपूर्व कर्तृत्वामुळे या गोष्टी दिवाळखोरीत जमा झाल्या आहेत. २५ व्या अनुच्छेदात सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्तेसोबत बाबासाहेबांनी सार्वजनिक आरोग्याचाही निर्देश केला आहे. या सर्वच गोष्टींना आणि सद्सद्विवेकाला इजा करणारे कोणतेही स्वातंत्र्य संविधान कोणालाही देत नाही. पण, आज आरोग्याचे, सद्सद्विवेकाचे आणि मानसिक आरोग्याचे जे धिंडवडे निघत आहेत, त्यामुळे संविधानाला अभिप्रेत अवघा भारतच हवालदिल झालेला आहे. एका बाजूने बाबासाहेबांच्या आधुनिकतेचे उल्लंघनही केले जात आहे. आणि याच आधुनिकतेच्या आश्रयाला ही धर्मनिष्ठ माणसे जात आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आधुनिकता अशी गरजेपुरती आणि गरज संपली की फेकून देता यावी अशी नाही. ‘गरज सरो, वैद्य मरो’ असे वागणे बाबासाहेबांच्या आधुनिकतेला नको आहे. आधुनिकतेला आधुनिक मन वा आधुनिक चारित्र्य हवे आहे. दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे असे या आधुनिकतेला अभिप्रेत नाही. प्रत्येकच माणसाचे जीवन आधुनिकतेचा भक्कम मूल्यदंड व्हावे, असे बाबासाहेबांच्या आधुनिकतेचे ध्येय आहे. ही आधुनिकता विचारातही हवी आणि वर्तनातही ओतप्रोत असावी. माणसाच्या एकूणच सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सर्वव्यापी नैतिक व्यवहाराचे नियंत्रक मूल्य ती व्हावी. बाबासाहेबांनी दिलेले हे तत्त्वज्ञान भारताला पूर्ण आधुनिक करणारे तत्त्वज्ञान आहे. ते भारतीय संविधानातही आहे आणि धम्मातही आहे. ही पराकोटीची अंतर्विरोधविहीन आधुनिकता भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देणारे बाबासाहेब हे भारतातले एकमेव प्रज्ञावंत आहेत.

संविधानाच्या २५ व्या अनुच्छेदात सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतिमत्तेसोबत बाबासाहेबांनी सार्वजनिक आरोग्याचाही निर्देश केला आहे. या गोष्टींना आणि सद्सद्विवेकाला इजा करणारे कोणतेही स्वातंत्र्य संविधान कोणालाही देत नाही. पण, आज आरोग्याचे, सद्सद्विवेकाचे आणि मानसिक आरोग्याचे जे धिंडवडे निघत आहेत, त्यामुळे संविधानाला अभिप्रेत अवघा भारतच हवालदिल झाला आहे.

डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक, नागपूर संपर्क : ८००७१५५५७७

बातम्या आणखी आहेत...