आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मी डॉ. पुनीत टंडन... मी आज तुम्हाला कोविड- १९ शी संबंधित माझे व्यक्तिगत अनुभव सांगतोय. त्यातून कोविड- १९ लसीबाबतचे भ्रम दूर करण्यात तुमची मदत होईल. मी भोपाळच्या गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि हमीदिया रुग्णालयात पॅथॉलॉजी तज्ञ आहे. मला कॅन्सर डायग्नोसिसची (हिस्टोपॅथॉलॉजी) आवड आहे. तसेच मी धावपटूही आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये जेव्हा कोरोनाला सुरुवात झाली तेव्हापासून मी शेकडो डाॅक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना या घातक आजारांशी लढताना जवळून पाहिले आहे. सर्वांप्रमाणेच मलाही त्या चमत्कारी दिवसाची प्रतीक्षा होती, ज्या दिवशी शास्त्रज्ञ आपल्याला या घातक विषाणूशी लढण्यासाठी लस देतील.
शेवटी १६ जानेवारी २०२१पासून सर्व फ्रंटलाइन हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल ही घोषणा झाली आणि हे स्वप्न लवकर पूर्ण झाले. १५ जानेवारी २०२१ ला माझा मोबाइल वाजला आणि मला समजले की, त्या निवडक लोकांमध्ये माझा समावेश करण्यात आला आहे, ज्यांना इतर डॉक्टर व पॅरामेडिक्ससोबत पहिल्या दिवशी लस दिली जाईल. दुसऱ्या दिवशी आमच्या संस्थेच्या सुसज्ज लसीकरण केंद्रात मला लस देण्यात आली. लसीकरणानंतर मी निरीक्षण कक्षात बसलो, माझ्या चारही बाजूला कॅमेरे होते. माझ्या मनात देशाबाबत आभाराच्या भावना निर्माण झाल्या. विश्वास ठेवा, मी त्या क्षणाच्या भावना शब्दांत व्यक्त करू शकत नाही. लसीकरणाच्या एक दिवस आधीपासून आणि त्यानंतरही मी सतत कोविड- १९ अँटिबॉडीजसाठी स्वत:ची चाचणी करत होतो. याचा निकाल खाली दिला आहे. ज्यात व्हॅल्यू एकपेक्षा जास्त असणे म्हणजे अँटिबॉडी तयार झाल्यात.
(पहिल्या दिवसाचा अर्थ आहे पहिला डाेस घेतल्याचा दिवस म्हणजे १६ जानेवारी २०२१)
पहिला डोसच्या एक दिवस आधी = ०.०५
१४ वा दिवस (३० जानेवारी) = ०.८८
३८ वा दिवस (दुसऱ्या डोसच्या सकाळी लसीकरणाआधी, २४ फेब्रुवारी) = २.२८
६० वा दिवस (वा दुसऱ्या डोसच्या तीन आठवड्यांनी, १६ मार्च) = ११.७५
आता मी सांगतो, ३० मार्च २०२१ रोजी सकाळी जो माझ्या पहिल्या डोसनंतरचा ७४ वा दिवस होता आणि दुसऱ्या डोसनंतर ३५ वा. मी सकाळी उठलो तेव्हा सर्व काही ठिक वाटत हाेते. मात्र, गळ्यात टोचत होते. तो कामाचा दिवस होता आणि मी वन विहार नॅशनल पार्कमध्ये १० किमी धावण्याचे ठरवले होते. मी तेथे सकाळी ६.३० वाजता गेलो. नियमित वॉर्मअपनंतर ७ वाजता धावायला सुरुवात केली. सुमारे ६ किमी गेल्यावर थोडा थकवा जाणवू लागला, जे असामान्य नव्हते. तरीही मी कोणत्याही अडचणीशिवाय १० किमी धावणे पूर्ण केले आणि पाहिले तर त्या वेळी माझी सरासरी हृदयगती १४४ बीट्स प्रति मिनिट होती, जी माझ्या नियमित धावण्याच्या तुलनेत १०-१२ बीट्स प्रति मिनिट जास्त होती. धावल्यानंतर नियमित व्यायाम केल्यानंतर सुमारे ८.३० वाजता घरी पोहोचलो आणि त्यानंतर कामावर गेलो. सायंकाळी ५ वाजता घरी परतलो. थोडी झोप लागली आणि काही वेळाने हलकी कणकण जाणवली. संध्याकाळी अनेक कामे असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले. सायंकाळी उशिरा जाणवले की पडशाने नाक वाहत आहे. मात्र, मी लवकरच झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ३१ मार्चला मला ताप जाणवला. तापमान मोजले ते ९९ डिग्री फॅरेनहाइट होते. मला जास्त चिंता वाटली नाही. मात्र काळजी म्हणून मी घरीच मास्क घातला. मला विश्वास होता की, मी लसीकरण केले आहे. यामुळे काहीच होणार नाही. तरीही त्या दिवशी कामावर जाताना रुग्णालयातील फीव्हर क्लिनिकमध्ये थांबून कोविड- १९ची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तेथे मला नेहमीप्रमाणे हसत राहणारे डॉ. प्रिन्स मला भेटले आणि लक्षणे बघता कोविड- १९ चाचणीसाठी माझ्या स्वॅबचे नमुने घेतले.
निकाल समजला तर मी सांगू शकत नाही की, मला किती धक्का बसला. मी कोरोना पॉझिटिव्ह होतो. असे कसे होऊ शकते? पण थोडे थांबा, लस तयार करणाऱ्यांनी कधीच सांगितलेले नाही की, लसीनंतर कोणालाच संसर्ग होऊ शकणार नाही. उलट त्यांनी सांगितले की, लसीकरणानंतर लस तुम्हाला गंभीर लक्षणांपासून वाचवेल. मात्र, नेहमी कोविडच्या प्रोटोकॉलचे पालन करत राहावे लागेल. बहुतेक मीच निष्काळजी केली असेल. निकाल समजताच मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले. फुप्फुसातील संसर्ग समजावा म्हणून मी छातीचा सीटी स्कॅन केला. (तसा तो या आजाराच्या पाचव्या दिवशी करायला हवा)
माझा वर्गमित्र आणि फिजिशियन डॉ. अनिल भार्गव यांच्यासह अॅनेस्थेशियातज्ञ माझी पत्नी डॉ. रुची आणि सहकाऱ्यांनी माझ्या उपचाराची सोय केली. काही तपासण्या व होम आयसोलेशनचा सल्ला दिला. सांगायला हवे की, गेल्या वर्षी कोरोनामुळे मी माझ्या दोन काकांना गमावले आहे. यामुळे माझ्या आई- वडिलांसाठी जास्त काळजीत होतो. मात्र घरातील इतर सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली. ९९ ते १००.४ अंश फॅरेनहाइटचा ताप दोन दिवस होता आणि पॅरासिटामॉलने बराही झाला. मला शरीरात वेदना नव्हत्या, अशक्तपणा नव्हता. सुरुवातीला आश्चर्य वाटत असल्याने माझ्या सहकाऱ्यांनी रक्ताच्या विविध चाचण्या करण्याचा सल्ला दिला. माझी सीआरपी व आयएल६ सामान्यापेक्षा अडीच ते तीनपट जास्त होती. इतर सर्व सामान्य होते. छातीचा सीटीही ठीक होता. माझी सुंघण्याची आणि चवीची क्षमता काहीसी प्रभावित झाली होती.
तिसऱ्या दिवशी ताप सामान्य झाला आणि त्यानंतरचे सर्व तपासणी अहवाल सामान्य आले. आजाराच्या सातव्या दिवशी, गेले चार दिवस ताप नसल्याने माझ्या फीव्हर क्लिनिकमध्ये पुन्हा चाचणीसाठी नमुने दिले. ६ एप्रिलच्या रात्री ९ वाजता मला ‘एमपीएनआरएचएम’ कडून मेसेज आला की, तुमचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. हे बघून मला शांतता वाटली. मात्र, अजूनही मी क्वॉरंटाइनच्या सरकारी नियमांचे पालन करत आहे आणि माझ्या फिजिशियनच्या संपर्कात आहे. हा अनुभव वाचल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न येत असतील.
जर लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होत आहे तर मग आपण लस का घ्यायची?
याचे उत्तर इंग्लंड, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अॅस्ट्राझेनेकाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत आहे. त्याचा अहवाल ‘द लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. (अहवालाची लिंक : https:/www.astrazeneca.com/media-centre/press-releases/2021/covid-19-vaccine-astrazeneca-confirms-protection-against-severe-disease-hospitalisation-and-death-in-the-primary-analysis-of-phase-iii-trials.html) अहवालानुसार- गंभीर संसर्ग आणि मृत्यू रोखण्यात लस शंभर टक्के प्रभावी ठरली आहे. लस घेतल्यानंतरही शक्य आहे की, कोरोनाचा संसर्ग होईल, मात्र विश्वास ठेवा- लसीनंतरच्या संसर्गाचा प्रभाव खूप किरकोळ वा सामान्य असेल. जर तुम्ही माझे प्रकरण पाहिले तर माझ्या संसर्गाचा अहवाल सातव्या दिवशी निगेटिव्ह आला. मला खूप किरकोळ लक्षणे होती. हे लसीच्या तुम्हाला गंभीर लक्षणांपासून वाचवण्याची क्षमता सिद्ध करते. यामुळे माझी वैयक्तिक विनंती आहे की, तुम्ही लस घेऊन स्वत:ला कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून सुरक्षित करू शकता. आणि सोबतच कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल म्हणजे मास्क, सॅनिटायझेशन, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन लसनंतरही करायचे आहे. माझा हाच धडा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.