आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा29 दिवसांनी म्हणजेच 21 जुलै रोजी द्रौपदी मुर्मू देशाच्या पुढील राष्ट्रपती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. मंगळवारी भाजप आणि मित्रपक्षांनी द्रौपदी यांच्या नावाचा निर्णय घेतला आहे. या गोष्टी दिल्लीत घडत होत्या, तेव्हा द्रौपदी या आपल्या ओडिसातील मयूरभंज येथील माहुलदिहा येथील घरी होत्या. त्यांच्या सोबत मुलगी इतिश्री होती.
इतिश्रीने सांगितले की, संध्याकाळी पंतप्रधान मोदींचा फोन आला. ते काय बोलले माहित नाही मात्र आई गप्प झाली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, ती काहीच बोलू शकली नाही. थोड्या वेळाने, ती फक्त धन्यवाद म्हणू शकली आणि तेही मोठ्या कष्टाने.
'हा क्षण आईसाठी स्वप्नासारखा'
दिव्य मराठीच्या विनंतीवरून, इतिश्री यांनी द्रौपदी यांच्यासोबत १५ सेकंद बोलणे करुन दिले. यावेळी द्रौपदी म्हणाल्या की, हा क्षण माझ्यासाठी, आदिवासींसाठी आणि महिलांसाठी ऐतिहासिक आहे. नंतर इतिश्री यांनी सांगितले की आईसाठी हे स्वप्नवत आहे. झोपडीतून वरच्या पदापर्यंतचा प्रवास हे केवळ स्वप्नच असू शकते. आदिवासी समाजातील लोक असे स्वप्नही पाहू शकत नाही.
छोटीशी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा होता
एका मुलाखतीत द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले होते की, त्या आदिवासी संथाल समाजातून येतात. त्यांचे कुटुंब अतिशय गरीब होते, त्यामुळे केवळ छोटीशी नोकरी करून कुटुंब वाढवणे हे त्यांचे सुरुवातीचे उद्दिष्ट होते. त्यांना नोकरी मिळाली, पण सासरच्यांच्या सांगण्यावरून ती नोकरी त्यांना सोडावी लागली. त्यांचे घरात मन रमत नव्हते तेव्हा त्यांनी मुलांना मोफत शिकवायला सुरुवात केली. येथूनच त्यांच्या समाजसेवेची सुरुवात झाली.
पती आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेल्या
1997 मध्ये त्यांनी रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. 2000 मध्ये त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली. त्यानंतर त्या मंत्री झाल्या. 2009 मध्ये निवडणूक हरल्यानंतर त्या गावात आल्या. पण त्याच दरम्यान एका अपघातात त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. एका मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर येताच 2013 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचाही अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांच्या पतींचाही मृत्यू झाला. यानंतर त्या पूर्णपणे तुटून गेल्या, मात्र हिंमत एकवटून त्यांनी पुन्हा स्वत:ला समाजसेवेत झोकून दिले.
Z+ सुरक्षा मिळाली
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना केंद्राकडून Z+ सुरक्षा कवच देण्यात आले आहे. आजपासून म्हणजेच बुधवारपासून त्या नेहमीच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) संरक्षणाखाली राहतील. सकाळपासून सशस्त्र जवानांच्या तुकडीने पहारा देण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा कवच मिळाल्यानंतर मुर्मू रायरंगपूर येथील आपल्या विधानसभेतील जग्गनाथ मंदिर आणि शिवमंदिराच्या दर्शनासाठी गेल्या. त्यांनी शिवमंदिरात झाडू मारुन पूजा केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.