आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Durga Puja In Bengal; 32 Thousand Crore Business Is Expected Due To Increase In Holidays | Marathi News

नवरात्रीची तयारी जोरात:बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्साह; सुट्या वाढल्यामुळे व्यवसाय 32 हजार कोटी होण्याची अपेक्षा

कोलकाता / सोमा नंदीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे. यानंतरच्या दुर्गापूजा या मोठ्या उत्सवाची तयारीही जोरात सुरू आहे. युनेस्कोने दुर्गापूजेला ‘सांस्कृतिक वारसा’ असा दर्जा दिल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये उत्साही वातावरण आहे.

जागतिक पातळीवर मिळालेल्या या बहुमानामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्साहात आहेत. याची झलक त्यांनी गुरुवारी कोलकात्यात काढलेल्या ऐतिहासिक मिरवणुकीत दिसली.

युनेस्कोचे आभार मानण्यासाठी काढण्यात आलेल्या पाच किलोमीटरच्या मिरवणुकीत सर्व क्लबचे प्रतिनिधी आणि हजारो नागरिक नाचत-गात सहभागी झाले होते. दुर्गापूजेला यंदा बंगालमध्ये ३७,००० पेक्षा अधिक कार्यक्रम होतील. यापैकी २५०० कोलकात्यात होतील.

२६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्र महोत्सवादरम्यान बंगालमध्ये १ ते ५ ऑक्टोबरपर्यंत कार्यक्रम होतील. यंदा दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची आणखीही दोन कारणे आहेत. पहिले, दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच कोरोनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे लोक निश्चिंतपणे पूजा करू शकतील. दुसरे, मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालमध्ये ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत दुर्गापूजेच्या सुट्या जाहीर केल्या आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरमध्ये २२ दिवस सुट्या मिळतील. गेल्या वर्षी १६ सुट्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ४३ हजार क्लबना पूजेसाठीचा मदतनिधी १० हजार रुपयांवरून ६० हजार रुपये केला आहे. विजेच्या बिलातही ६० टक्के सवलत मिळेल.

दुर्गापूजा ही बंगालच्या अर्थव्यवस्थेसाठी कुबेराप्रमाणे आहे. पर्यटन विभागाने मान्यता दिलेल्या ब्रिटिश कौन्सिलच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे की, महामारीच्या आधी दुर्गापूजेशी संबंधित उद्योगांचा व्यवसाय वार्षिक ३२,३७७ कोटी रुपयांचा होता. हे बंगालच्या जीडीपीच्या २.५८% आहे. यंदा यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये रिटेल क्षेत्राचा वाटा जवळपास २७,३६४ कोटी रुपयांचा आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेला बोनस मिळतो. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

मंडप... यंदा व्हॅटिकन सिटी ते संसद भवनपर्यंतचे दर्शन
व्हॅटिकन सिटी : कोलकाता येथील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबचे मंडप रोमच्या व्हॅटिकन सिटीसारखे असेल. पूजा समितीचे सुजित बोस यांनी सांगितले की, १२ फूट उंचीच्या दुर्गामूर्तीला कोट्यवधी रुपयांचे सोने आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांनी सजवण्यात येईल.

ओडिशातील रघुराजपूरची शिल्पकला : बेलगछिया येथील अरबिंदो सेतू क्लब ओडिशातील रघुराजपूर गावाचा देखावा करणार आहे. येथील शिल्पकला जगप्रसिद्ध आहे.

१९४६ च्या आठवणी ताज्या होतील : दक्षिण कोलकात्याचा समाजसेवी क्लब ७५ वर्षांपूर्वीचे म्हणजे १९४६ चे फ्लॅशबॅक दाखवेल. त्या वेळी हिंसाचारामुळे कोलकात्यात मुस्लिम कारागिरांचा जीव धोक्यात आला होता. हिंदूंनी त्यांचे रक्षण केले होते.

वारांगनांच्या समस्या : अलीपूरमध्ये ७८ गावांच्या दुर्गापूजेत ‘चौकट’ थीमद्वारे वारांगनांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. थीम निर्माते अनिर्बाण म्हणाले की, दुर्गापूजेत वेश्यालयाच्या चौकटीच्या मूठभर मातीचा वापर अनिवार्य आहे. तरीही या महिलांच्या आयुष्यात बदल होत नाही.

हिरवळीचे चित्रण : दक्षिण कोलकात्यात चेतला अग्रणी क्लब ‘सबूज’चे (हिरवळ) चित्रण करेल. मंडपाची थीम वृक्ष वाचवाच्या संदेशावर आधारित आहे. याद्वारे वृक्ष वाचवण्याचा संदेश देण्यात येईल. कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम म्हणाले, मंडपाला केळीची पाने आणि जलपर्णीने सजवले जाईल.

अमृतमहोत्सवात दिसेल ऐतिहासिक वारसा : मध्य कोलकात्याच्या सियालदाह येथील संतोष मित्र स्क्वायर पूजा समितीची थीम ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ आहे. मंडपाला तिरंग्याने सजवण्यात येईल. लाल किल्ला, इंडिया गेट आणि नवीन संसद भवनाची छायाचित्रे लावण्यात येतील. दुर्गामातेची १२ फुटांची मूर्ती असेल. भाजप नेते सजल घोष यांनी सांगितले की, उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आमंत्रित केले आहे.

बातम्या आणखी आहेत...