आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारूक अब्दुल्ला यांची ईडीकडून चौकशी:43 कोटींचे घोटाळा प्रकरण; जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनला मिळाले होते अनुदान

श्रीनगर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकीय बदला घेण्यासाठी कारवाई, फारूक अब्दुल्ला यांचे चिरंजीव उमर यांचा आरोप

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काॅन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी सोमवारी चौकशी केली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे (जेकेसीए) अध्यक्ष असताना २००२ ते २०११ दरम्यान कथित ४३.६९ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ही चौकशी झाली. गेल्या वर्षीही याच प्रकरणी त्यांची ४ तासांहून जास्त वेळ चौकशी झाली होती.

खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने २००२ ते २०११ दरम्यान जेकेसीएला अनुदान दिले होते. त्या रकमेतून हा घोटाळा झाला. चौकशीवर प्रतिक्रिया देताना नॅशनल काॅन्फरन्सने म्हटले आहे की, ‘भाजप राजकीयदृष्ट्या विजय मिळवू शकत नसल्याने केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून आम्हाला लक्ष्य करण्यात येत आहे.’ जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानुसार ईडीने २०१५ मध्ये हे प्रकरण आपल्या हाती घेतले होते.

राजकीय बदला घेण्यासाठी कारवाई : उमर यांचा आरोप

फारूक अब्दुल्ला यांचे चिरंजीव उमर अब्दुल्ला म्हणाले की, आमचा पक्ष ईडीच्या समन्सला लवकरच उत्तर देईल. गुपकार घोषणेसाठी पीपल्स अलायन्सची स्थापना झाल्यानंतर ईडीने सुरू केलेली ही चौकशी म्हणजे राजकीय बदला घेण्याची कारवाई आहे. फारूक अब्दुल्लांच्या निवासस्थानावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही.

आघाडीसाठी १५ ऑकटोबरला घेतली होती बैठक

केंद्राने गतवर्षी जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला होता. तेव्हापासून फारूक नजरकैदेत होते. मुक्ततेनंतर फारूक यांनी ‘गुपकार घोषणे’च्या आघाडीसाठी १५ आॅक्टोबरला घरी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात मेहबूबा मुफ्ती, सज्जाद लोन व इतर प्रादेशिक संघटनांचे नेते सहभागी झाले होते. केंद्राने गतवर्षी कलम ३७० रद्द केल्यामुळे आमचे अधिकार हिरावून घेतले होत, ते परत द्यावेत, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...