आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडात पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या चारधाम यात्रेचा आतापासूनच उत्साह दिसून येत आहे. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे यात्रा रद्द झाली होती. या वेळी कोरोना प्रोटोकॉल कडक असला तरीही आगाऊ नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे. चारधामची द्वारे १७ मेपासून उघडणे सुरू होईल आणि गढवाल मंडळ विकास महामंडळाकडे आताच तीन कोटी रुपयांची आगाऊ नोंदणी झाली आहे. तसेच पाच दिवसांत केदारनाथ हेली सेवेसाठी ८७६२ तिकिटांची ऑनलाइन बुकिंग झाली आहे.
पर्यटन महाव्यवस्थापक जितेंद्रकुमार यांनी सांगितले की, २०१९ मध्ये धार्मिक यात्रांच्या बुकिंगमुळे गढवाल विकास महामंडळाला १० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न झाले होते. मात्र, त्याच्या पुढच्या वर्षी उत्पन्न शून्य झाले. आता आगाऊ बुकिंग बघता हे वर्ष पर्यटनासाठी चांगले राहण्याची आशा आहे. दरवर्षी उत्तराखंडात सुमारे ४ कोटी पर्यटक येतात, त्यातील ६० लाख श्रद्धाळू असतात.
पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांचे म्हणणे आहे की, चारधाम यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक तयारी केली जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक ठिकाणी तेथील क्षमतेनुसार लोकांच्या राहण्याची सोय केली जात आहे. तसेच कोरोनामुळे शक्य तेवढी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जात आहेत.
गेल्या वर्षी चारधाम यात्रा सुरू होण्याच्या आधी कोरोनाच्या आगमनामुळे पर्यटन उद्योगास मोठा धक्का बसला होता. कोरोना महामारीच्या भीतीमुळे चारधाम यात्रेचे द्वार उघडूनही यात्रा होऊ शकली नव्हती. यामुळे जवळपास २.५० लाख लोकांसमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले होते.
केव्हा उघडतील चारधामची द्वारे
- गंगोत्री १४ मे
- यमुनोत्री १४ मे
- केदारनाथ १७ मे
- बद्रीनाथ १८ मे
कोविड तपासणीनंतरच यात्रेकरूंना मिळणार राज्यात प्रवेश
दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्यांना कोविड निगेटिव्ह अहवाल वा लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत आणावे लागेल. गेल्या वर्षीही मर्यादित संख्या आणि कोविड निगेटिव्ह अहवालाच्या आधारेच चारधाम यात्रेत यायची परवानगी देण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.