आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहावडा रेल्वेस्थानकापासून सुमारे दोन तासांचे अंतर गाठल्यानंतर रेल्वेगाडी पूर्व मिदनापूरमधील एका गावात पोहोचते तेव्हा चहूकडे रंगीबेरंगी फुलांची चादर पाहून मन प्रफुल्लित होते. खिराई हे गाव आहे. याला पश्चिम बंगालची फ्लॉवर व्हॅलीदेखील म्हटले जाते. स्थानकावर गर्दी नाही. बाहेर पडताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला कच्ची घरे आहेत. प्रत्येक घराच्या मागे फुलांनी बहरलेले शेत आहेत. ढगांच्या आडून सूर्यकिरणे जेव्हा या फुलांवर पडतात तेव्हा हे दृश्य एखाद्या सुंदर चित्राप्रमाणे दिसते. गावातील ८५० कुटुंबांपैकी बहुतांश लोक फूलशेती करतात. या गावचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे झेंडू. आशियातील सर्वात मोठे घाऊक फूल मार्केट असलेल्या मल्लिक घाट मार्केटमध्ये (कोलकाता) २५ वर्षांपासून व्यवसाय करणारे हरिदास हाल्दार सांगतात, ‘बंगालमध्ये ७०% आणि देशात ४०-५०% झेंडूच्या फुलांचा पुरवठा खिराई गावातूनच केला जातो. मार्केटमधून दिल्ली, ओडिशा, अासाम, बिहार, मुंबईसह इतर राज्यांमध्येही झेंडूसह इतर फुले पाठवली जातात. दिल्लीतूनच परदेशातही पुरवठा केला जातो. यंदा नवरात्रोत्सव आणि अन्नपूर्णा पूजेमुळे फुलांना मागणी वाढली आहे. पुरवठाही सुरळीत आहे.’
फूल व्यावसायिक जयदेव आणि गेंदा दास सांगतात, ‘झेंडू आणि जास्वंदाचे उत्पादन चांगले झाले आहे. यामुळे मागील दोन हंगामाची भरपाई होईल. स्थानिक शेतकरी खोकन अदक म्हणाले, खिराई आणि त्याला लागून असलेल्या कांसाई नदीकिनारी हिवाळ्यात फुलांचा बहर असतो. ही फुले पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात. खोकन यांच्या पत्नी सुमिता यादेखील शेतीसाठी मदत करतात. सुमिता म्हणतात, ‘आम्ही सुमारे ०.२५ एकर शेतीमध्ये झेंडूचे पीक घेतो. उन्हाळा सुरू झाला आहे, पण झेंडू अजूनही आहेत. एप्रिलच्या मध्यापर्यंत येथे फुले मिळतात. फुले उमलण्यासाठी साधारणत: दीड ते दोन महिने लागतात. दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत फुले तोडण्याचे काम होते.’
गेल्या २० वर्षांपासून झेंडूच्या फुलांची शेती करणारे देवाशिष नायक सांगतात, मी जवळपास अर्ध्या एकर शेतात आपल्या तीन भावंडांसोबत झेंडूची शेती करतो. दररोज २०० किलोपेक्षा जास्त फुले तोडली जातात आणि वर्षाला आम्हाला दीड लाखापेक्षा अधिक रुपयांचा नफा होतो. शेतकरी खोकन अदक सांगतात, ‘कोरोनाकाळात फुलांचा पुरवठा ठप्प असल्याने आम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागले. या वर्षी मार्केट चांगले आहे. सरस्वती पूजेपासून ते साधारण दोन महिन्यांपर्यंत फुलांना अधिक मागणी असते.’
पर्यटकांच्या आवडीचे आहेत फुलांचे दागिने : खिराई हे गाव नेहमीपासून असे नव्हते. तीन दशकांपूर्वीपर्यंत येथे काकडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात होते, पण नफा मिळत नसल्याने शेतकरी फूल शेतीकडे वळले. झेंडू, सूर्यफूल, शेवंती, जास्वंदासह अनेक प्रकारच्या फुलांनी खिराई गावाला बंगालची फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळख मिळवून दिली. येथील महिलांकडून तयार करण्यात येणारे फुलांचे दागिने पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.