आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Expansion Of Modi Cabinet Today; Focus On Electoral States, Focus More On Young And Expert Ministers

मोठे फेरबदल शक्य:मोदी मंत्रिमंडळाचा आज विस्तार; निवडणुकीच्या राज्यांवर नजर, तरुण व तज्ज्ञ मंत्र्यांवर जास्त भर, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, भागवत कराड की गावित?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक
  • मोदी मंत्रिमंडळ विस्ताराआधी आठ राज्यपालांची नियुक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलांची ब्ल्यूप्रिंट तयार झाली आहे. मंगळवारी ८ राज्यपालांच्या नियुक्तीसोबतच त्याची भूमिकाही ठरली. बुधवारी संध्याकाळी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. सूत्रांनुसार, बदलांनंतर हे आजवरचे सर्वात युवा मंत्रिमंडळ असेल. कॅबिनेटमध्ये आरोग्यसारख्या क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश केला जाऊ शकतो. सूत्रांनुसार काही दिग्गज मंत्र्यांना पुन्हा संघटनेत पाठवले जाऊ शकते. ८ ते १२ महिन्यांत निवडणुकांच्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाईल. काही मंत्र्यांचा खातेपालटही हाेऊ शकतो. निवडणुकांकडे पाहता जातीय व प्रादेशिक समीकरणेही साधण्याची तयारी आहे. दरम्यान, मध्य प्रदेशहून राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया व महाराष्ट्रातून नारायण राणे तसेच आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल दिल्लीत दाखल झाले. सूत्रांनुसार, महिला व बाल विकास मंत्रालय आणि वित्त मंत्रालयातही बदल शक्य आहेत. दुसरीकडे अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल यांना बढती मिळू शकते. कॅबिनेट विस्ताराआधी ‘सहकारातून समृद्धी’ व्हिजन साकारण्यासाठी कृषी मंत्रालयातून वेगळे करून प्रथमच ‘सहकारिता मंत्रालय’ स्थापण्यात आले आहे. ते सहकारी क्षेत्राला मजबूत करण्यासाठी स्वतंत्रपणे प्रशासकीय, कायदेशीर आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

नड्डांच्या घरी संध्याकाळी उशिरापर्यंत खलबते : मंगळवारी हिमाचलहून दिल्लीत परतलेल्यानंतर भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटण्यासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता भाजप संघटनमंत्री बी.एल. संतोष दाखल झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व राजस्थानच्या माजी सीएम वसुंधरा राजेंशीही त्यांची भेट झाली. दुसरीकडे, बंगालमधील भाजप खासदार एस. ठाकूर, कर्नाटकचे ए.नारायणसामी, मणिपूरचे आर.आर. सिंह, यूपीचे सकलदीप राजभर, अनिल बलूनी, सुधांशु त्रिवेदी, सुशील मोदी, अश्विनी वैष्णव, जी.व्ही.एल. नरसिंहराव यांचीही नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

मोदी मंत्रिमंडळ विस्ताराआधी आठ राज्यपालांची नियुक्ती
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी आठ राज्यपालांची नियुक्ती केली. मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल केले आहे. गुजरातचे माजी मंत्री मंगूभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. हरिबाबू कंभमपती मिझोरामचे राज्यपाल असतील. पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना गोव्याची जबाबदारी दिली आहे. गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील. हिमाचलचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना हरियाणाला पाठवले. हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची बदली त्रिपुरात झाली. रमेश बैस हे झारखंडचे राज्यपाल असतील.

शिंदे, वरुण, नामग्याल, लेखी यांच्यासह तरुण चेहरे दावेदार
ज्योतिरादित्य शिंदे, वरुण गांधी, जमयांग सेरिंग नामग्याल, राहुल कस्वां, राजीव चंद्रशेखर, मीनाक्षी लेखी, पुरंदेश्वरी देवी, अश्विनी वैष्णव हेे तरुण चेहरे दावेदार आहेत. बिजू जदतून भाजपत आलेले बी. जे. पांडा, बंगाल निवडणुकीआधी तृणमूलमधून आलेले दिनेश त्रिवेदी यांची नावेही चर्चेत आहेत.

अपना दल, जदयू आणि लोजपचीही दावेदारी
यूपी निवडणूक पाहता अपना दलच्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांची जागा निश्चित मानली जात आहे. जदयूनेही चार मंत्रिपदे मागितली आहेत. पक्षाध्यक्ष आर. सी. पी. सिंह चर्चा करण्यासाठी दिल्लीत आले आहेत. पुतण्या चिराग यांच्या जागी लोजप प्रमुख झालेले पशुपती पारसही दिल्लीत आले आहेत.

मोदी-२.० कॅबिनेटचे सरासरी वय ६० वर्षे
मोदी-२.० मध्ये मंत्र्यांचे सरासरी वय ६० वर्षे आहे. २०१९ मध्ये सरकार स्थापन झाले तेव्हा स्मृती इराणी (४४) सर्वात तरुण व रामविलास पासवान (७३) सर्वात वयस्कर मंत्री होते. तेव्हा मोदी-१.० चे सरासरी वय ५९.६ वर्षे होते. नजमा हेपतुल्ला (७४) सर्वात वयस्कर, इराणी (३८) सर्वात तरुण मंत्री होत्या. मनमोहनसिंग यांच्या यूपीए-२ मध्ये हे वय सरासरी ५५ होते. एस. एम. कृष्णा सर्वात वयस्कर (७७) आणि सर्वात तरुण मंत्री म्हणून अगाथा संगमा (२८) होते.

सरप्राइज एंट्रीही शक्य... विषयतज्ज्ञ, व्यावसायिकांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
जेथे एक वर्षात निवडणूक होणार आहे अशा सात राज्यांवर भाजप व संघाचा भर आहे. पंजाबमधील एखाद्या मोठ्या नेत्याला भाजपमध्ये आणून मंत्री केले जाईल, अशीही चर्चा आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याप्रमाणे काही माजी नोकरशहा, व्यावसायिक आणि टेक्नोक्रॅट्सना सरप्राइज एंट्री मिळू शकते. आरोग्य क्षेत्रातील दोन मोठ्या तज्ज्ञांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. पश्चिम बंगाल आणि ईशान्येचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व वाढण्याची अपेक्षा आहे.

देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, भागवत कराड की गावित?
भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे, खा. भागवत कराड, नंदुरबारच्या खा. हीना गावित व भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची नावे महाराष्ट्रातून चर्चेत आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेही नाव चर्चेत असले तरी शिवसेना आगामी काळात भाजपबरोबर येणार असेल आणि राज्यात सत्ताबदल होणार असेल तर फडणवीस यांना इतक्यात कंेद्रात स्थान दिले जाण्याची शक्यता कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...