आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डिझेलमध्ये सतत वाढ होत असून त्याचा परिणाम थेट वाहतूक उद्योग आणि शेतकऱ्यांवर होत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, डिझेलच्या किमतीतील वाढीमुळे वाहतूक खर्चात १५ टक्के वाढ झाली आहे. या वाढीचे कारण देत वाहतूकदार भाडेवाढ करण्याच्या तयारीत आहेत. याचा थेट परिणाम महागाईवर होईल. गेल्या १६ दिवसांत डिझेलच्या किमतीत ९.४६ रुपये वाढ झाली आहे.
ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनचे चेअरमन प्रदीप सिंघल म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे निर्जंतुकीकरण, टोल, विमा आणि देखभाल खर्चात वाढ झाली आहे. कोरोनामुळे चालकांना अतिरिक्त भत्ता देऊन कामावर बोलवावे लागत आहे. रिटर्न ट्रिपही मिळत नाही. त्यामुळे एकूण वाहतूक खर्चात २० टक्के वाढ झाली आहे. सलग डिझेलच्या भाववाढीमुळे वाहतूकदारांचा खर्च वाढला आणि नफ्यात घट झाली आहे. माल वाहतूक आधीच बुक केलेली असते. डिझेलची किंमत वाढल्याने बुकिंग रकमेत वाढ करण्याची कोणतीही तरतूद नसते. परिणामी बुकिंग रक्कम आणि सध्याच्या खर्चाचा कोणताच ताळमेळ बसत नाही, अशी माहिती औरंगाबाद गुड्स अॅँड ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी दिली. टाळेबंदीत केवळ ३०% ट्रक रस्त्यावर होत्या. सरकारने विमा आणि रस्ता करात सवलत दिली पाहिजे. वाहतूकदारांकडे ५० टक्क्यांच्या वर काम नाही.
भास्कर एक्सप्लेनर : महागड्या डिझेलचा परिणाम हा असा
{वाहतुकीच्या खर्चात ६५% हिस्सा डिझेलचा असतो. २०-२५% हिस्सा देखभाल, कर्ज हप्ता आदींत होतो.
{इंदूरहून चेन्नईपर्यंत एक ट्रक(१६ टन) सध्या ६५ हजार रुपयांत बुक होतो, यात आता सुमारे ४० हजारांचे डिझेल लागते.
{वाहतूकदाराकडे २५ हजार वाचतात, ज्यात देखभाल, चालकाचा पगार, हप्ते आणि उत्पन्न आदींचा खर्च निघतो.{अाता डिझेल खर्च ८ हजार वाढून ४८ हजार होईल. अन्य खर्चांसाठी १७ हजार रु. शिल्लक राहतील.
-विजय कालरा, अध्यक्ष, एआयएमटीसी वेस्ट झोन
डिझेलमध्ये सलग वाढ, पेट्राेल ८० जवळ
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सलग १६ दिवस वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल ३३ पैसे आणि डिझेल ५८ पैसे महाग झाले. पेट्रोल ७९.५६ रु. लिटर झाले आहे. गेल्या १६ दिवसांत पेट्रोल ८.३० रुपये आणि डिझेल ९.४६ रुपये महाग झाले आहे. हे नियंत्रणमुक्त केल्यानंतर कोणत्याही पंधरवड्यातील सर्वात जास्त वाढ असल्याचे दिसते.
एप्रिलच्या नीचांकी पातळीपेक्षा क्रूड दुप्पट
नवी दिल्ली| जगभरात टाळेबंदी खुली झाल्यानंतर क्रूडच्या किमतीत तेजी येऊ लागली आहे. साेमवारी ब्रेंट क्रूडची किंमत ४२ डॉलर प्रतिबॅरलपेक्षा जास्त होती. ही एप्रिलमध्ये ब्रेंट क्रूडच्या किमतीच्या नीचांकी पातळीपेक्षा दुप्पट आहे. संपूर्ण जगातील टाळेबंदीमुळे एप्रिलमध्ये ब्रेंट क्रूडची किंमत २० डॉलर प्रतिबॅरलपेक्षा खाली जात होती.
२.५ एकरांचा खर्च ४०० रुपयांपर्यंत वाढला
डिझेल महाग झाल्याने शेतीच्या खर्चात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जाणकारांनुसार, याआधी दोन-अडीच एकर शेतासाठी जवळपास ४,६०० रुपये खर्च येत होता. त्यात ४०० रुपये वाढ होऊन पाच हजारांच्या पुढे गेला आहे. नांगरटीसाठी १० ते १२ लिटर डिझेल लागते. तण काढायलाही ट्रॅक्टरची गरज भासते. पिकाची कापणी व अन्य कामासाठीही डिझेल लागते. त्यामुळे नांगरटीपासून पीक हातात येईपर्यंत शेतीच्या कामात डिझेल लागते. यामुळे डिझेल महाग झाल्याने शेतकऱ्याचा नफा खूप कमी झाला आहे. उदाहरणार्थ दोन एकर जमिनीत ७ ते ८ क्विंटल बाजरी निघते. बाजारात बाजरी नेल्यानंतर पिकाला १४ हजार ते १६ हजार रु. मिळत होते. शेतातून बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्याला ५,१०० रु. खर्च करावे लागत होते. डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना ४०० रुपये जास्त म्हणजे ५,५०० रुपये खर्च करावे लागतील.
टाळेबंदीमुळे मालाची बुकिंग आधीच ५० टक्के सुरू होती. आम्ही सरकारकडे मदत मागत होता, मात्र इंधनाच्या किंमत वाढत असल्याने आमचे कंबरडेच मोडले आहे. बल मलकीयत सिंह, चेअरमन, कोअर कमिटी व माजी अध्यक्ष , एआयएमटीसी
रोजच्या वाढत्या किमतीमुळे लांब पल्ल्याच्या वाहतुकीत जास्त तोटा होत आहे. तीन-चार दिवसांत माल डिलिव्हरी होते तेव्हा डिझेलच्या किमती दोन-तीन रुपयांनी वाढलेल्या असतात. कुलतारणसिंग अटवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.