आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये व वाटचालीमध्ये मराठी माणसांचे जे कार्य व श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रासह जगभरात मराठी माणसांचे नाव मोठे आहे,' असे ते म्हणालेत.
'राज्याच्या विकासातील वेगवेगळ्या समाजाचे योगदान नाकारता येत नाही. गुजराती असो किंवा मारवाडी समुदाय असो मराठी माणसांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठींचा सहभाग सर्वाधिक आहे यात शंका नाही,' असेही ते यावेळी म्हणाले.
'एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्या समाजाविषयी बोलताना थोडीशी अतिशयोक्ती केली जाते. राज्यपालही तसेच बोलले असतील. त्यांनाही महाराष्ट्र व देशाच्या विकासातील मराठी माणसांचे सर्वाधिक योगदान आहे हे ठावूक आहे. पण बोलण्याच्या ओघात ते तसे बोलले असतील,' असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर हेतुपुरस्सर विधान केल्याचा आरोप केला आहे. याविषयी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी 'राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले याविषयी स्वतः राज्यपाल खुलासा करतील. आम्ही त्यावर भाष्य करणार नाही,' असे स्पष्ट केले.
अजित पवारांवर साधला निशाणा
'विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सत्ता गेल्यानंतर विदर्भाची आठवण झाली. सत्तेत असताना त्यांना त्याची आठवण झाली असती, ते तिथे गेले असते तर मला आनंद झाला असता. त्यांच्या सरकारने विदर्भाला जेवढी मदत केली, तेवढी मदत आम्ही त्यांच्या तुलनेत एक दशांश वेळेत करू,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यपाल काय म्हणाले होते?
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. पण महाराष्ट्र व मुंबईतून गुजराती व राजस्थानी लोकांनी काढता पाय घेतला तर मुंबई, ठाणे व आजूबाजूच्या परिसरात छदामही उरणार नाही. मुंबईची कोणतीही ओळख शिल्लक राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय पटलावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी त्यांच्या विधानावर हरकत नोंदवली आहे, तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.