आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके (कृष्ण कुमार कुन्नथ) यांचे पार्थिव मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाच्या AI 773 फ्लाइटने मुंबईला पोहोचेल. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी त्यांच्या निवासस्थानाजवळील वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
यापूर्वी कोलकाता येथे त्यांना राज्य सन्मानाने श्रद्धांजली वाहण्यात आली होती. यावेळी त्यांची पत्नी ज्योती कृष्णा, मुलगा नकुल आणि मुलगी तमारा यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील रवींद्र सदनात पोहोचून केके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
31 मे रोजी झाले निधन
के.के. (कृष्णकुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. कोलकत्तामध्ये आपल्या शोनंतर परतत असताना ग्रँड हॉटेल येथे केके हृदयविकाराच्या धक्क्याने कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ CMRI (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. पोलिसांनी केके यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे नोंदवले आहे. कोलकातास्थित न्यू मार्केट पोलिस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, केके यांच्या चेहरा आणि डोक्यावर जखमा आढळल्या आहेत.
उद्या होतील अंत्यसंस्कार
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. कॉन्सर्टच्या CCTV फुटेजची चौकशी केली जाणार आहे. केके यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची पत्नी आणि मुले कोलकाता येथे दाखल झाले. शवविच्छेदनानंतर केके यांचे पार्थिव रबींद्र सदन येथे आणले गेले होते.
हॉटेल स्टाफ आणि आयोजकांची होणार चौकशी
पोलिस आयोजक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केके यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात ऑटोप्सी करण्यात येणार आहे. यानंतर हॉटेल स्टाफ आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पीएम मोदींनी व्यक्त केला शोक
केके यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान म्हणाले, केके यांच्या निधनाने मी दुःखी आहे, सर्व वयोगटातील लोक त्यांच्या गाण्यांशी जोडलेले आहेत. आपल्या गाण्यांमधून ते कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही केके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
केके यांच्या निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्ता यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांत केकेसह देशाने दोन गायकांना गमावले आहे.
29 मे रोजी मल्याळम गायक एडवा बशीर यांचाही परफॉर्मन्सदरम्यान मृत्यू झाला. 87 वर्षीय गायक एडवा अलप्पुझा शहरातील टाऊन हॉलमध्ये परफॉर्म करण्यासाठी आले होते. 30 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती.
हिंदी-तामिळसह 11 भाषांमध्ये गायली गाणी
23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत जन्मलेले प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना इंडस्ट्रीत केके या नावाने ओळखले जाते. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे 35,000 जिंगल्स गायल्या.
'माचीस' चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे केले होते पदार्पण
केके यांनी बॉलिवूडमध्ये 'माचीस' या चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप' या गाण्याद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. याशिवाय केके यांनी 'यारो', 'पल', 'कोई कहे कहता रहे', 'मैंने दिल से कहा', 'आवरापन बंजारापन', 'दस बहाने', 'अजब सी', 'खुदा जाने' आणि 'दिल इबादत', 'तू ही मेरी शब है' सारखी अनेक सुंदर गाणी गायली आहेत.
2000 मध्ये केके यांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये 'ओम शांती ओम'मधील 'आँखों में तेरी' आणि 2009 मध्ये 'बचना-ए हसीनो' मधील 'खुदा जाने' या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
'पल' या म्युझिक अल्बममधून गायनाची केली होती सुरुवात
2021 मध्ये केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान केके यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले होते. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही झळकले. केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बममधून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती.
या वृत्ताशी संबंधित आणखी बातम्या येथे वाचा -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.