आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली-हरियाणा सीमेवर एक वर्षाहून अधिक काळ आंदोलन करणारे शेतकरी आता घरी परतू लागले आहेत. शनिवारी फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींतून शेतकऱ्यांचे जथ्थे विजयगीत वाजवत सिंघू बॉर्डरवरून परतण्यास प्रारंभ झाला. ज्या ठिकाणी वर्षभरापासून जीव तोडून विजयी आंदोलन केले त्या जागेवर अनेक शेतकऱ्यांनी हवन केले, काहींनी तर कीर्तनांचे आयोजन केले. अनेक शेतकरी विजय दिन साजरा करत भांगडा करताना दिसले.
अंबाला येथील गुरविंदरसिंग म्हणाले, हा अत्यंत भावनिक क्षण आहे. आमचे या भागातील लोकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. येथून परतणे इतके जड जाईल, असे वाटले नव्हते. दरम्यान, पंजाब-हरियाणा सीमेवर असलेल्या सिंघू बॉर्डरवरून परतणाऱ्या शेतकऱ्यांचे हारतुरे आणि मिठाई वाटून स्वागत केले जात आहे. अनेक ठिकाणी कुटुंबीय या शेतकऱ्यांचे जाेरदार स्वागत करत असल्याचे दिसून आले.
दिल्ली-सोनिपत-कर्नाल मार्गावर वाहतूक संथ : ट्रॅक्टर-ट्रॉलीसह गावी परतणाऱ्या शेतकऱ्यांच्या दिल्ली-सोनिपत-कर्नाल मार्गावर रांगा लागल्या होत्या. दिवसभर या मार्गावर वाहतूक अत्यंत संथ झाली होती.
३७८ दिवस चालले आंदोलन : पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या वादग्रस्त तीन कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले होते. संसदेत हे कायदे २९ नोव्हेंबरला रद्द करण्यात आले. सोबत किमान हमीभावाचेही आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन गुरुवारी मागे घेण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.