आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Farmer Sons Company Gramhit Of Yavatmal In Forbes List Success Story Of Pankaj Mahalle And Shweta Thackeray

किसान पुत्राची कमाल:गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दाम्पत्य गावाकडे; शेतकऱ्यांसाठी उभारलेली कंपनी 'ग्रामहित' फोर्ब्सच्या यादीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील पंकज महल्ले व श्वेता ठाकरे (महल्ले) या शेतकरी दाम्पत्याने 'फोर्ब्स' यादीत स्थान मिळवले आहे. आशिया खंडातील नामांकित अग्रगण्य सामाजिक उद्योजकता क्रमवारीत त्यांच्या 'ग्रामहीत' कंपनीला प्रमुख 100 कंपन्यांमध्ये जागा मिळाली आहे.

पंकज व श्वेता महल्ले हे तरुण दाम्पत्य ग्रामहितचे संस्थापक आहेत. गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेतील शेतमालाच्या चढउतारात ‘ग्रामहित’ हे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे.

समाजकार्यची पदवी

पंकज यांनी यवतमाळ येथील सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) मुंबई येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर टाटा सीएसआर प्रकल्पांतर्गत जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये उच्च पदावर काम केले आहे. तर श्वेता महल्ले यांनीही अभियांत्रिक पदवीनंतर हैदराबाद येथून आयआयटी पदव्युत्तर पदवी घेतली. दोघेही उच्चशिक्षित असल्याने बड्या पगाराची नोकरी असल्याने आयुष्य सुकर झाले. पण यवतमाळातील शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या. यानंतर नोकरी सोडून दोघेही गावाकडे आले आणि शेतकरी हिताचा प्रवास सुरू झाला. शेतकऱ्यांसाठी शेतमाल खरेदी-विक्री व्यवहाराचे पारदर्शी मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला व 'ग्रामहित' कंपनी स्थापन केली.

आर्थिक घुसमट टाळली

शेतात पीक घेण्यासाठी शेतकरी विविध ठिकाणावरून कर्ज घेतात. कर्जाच्या पैशातून शेतात पीक उभे करतात. पिककाढणीचा हंगाम आल्यानंतर देणी फेडण्यासाठी शेतकरी एकाच वेळी आपला शेतमाल हा विक्रीला आणतात. एकाचवेळी मोठ्याप्रमाणात माल उपलब्ध झाल्यानंतर व्यापारी वर्गाकडून शेतमालाचा दर पाडला जातो. तेव्हा आर्थिक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना बेभाव माल विकावा लागतो. यातून शेतकरी बांधवांची आर्थिक घुसमट होते. हे होऊ नये यासाठी 'ग्रामहित' ने पाऊल उचलले. ग्रामहितच्या माध्यमातून शेतकरीपुरक बाजार व्यवस्था, सुलभ आणि विश्वसनीय करण्याचा प्रयत्न पंकज यांनी केला आहे.

‘ग्रामहित’ काय करते?

पंकज महल्ले, श्वेता ठाकरे हे शेतमाल साठवून विक्री करण्याची शास्त्रोक्त व आधुनिक पद्धत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. तसेच साठवलेला शेतमाल तारण ठेवून सुलभ व कमी व्याजदरात कर्जाची उपलब्धताही करून देतात. शेतमाल विक्रीत शेतकऱ्यांचे शोषण थांबवून बाजार व्यवस्था सुलभ करणाऱ्यासाठी 'ग्रामहित' काम करते. ही सुविधा घरूनच मोबाईलवर क्लिकवरून दिली जाते. यामुळे वारंवार बाजार पेठेत जाण्याची शेतकऱ्याला गरजही पडत नाही. यापूर्वी ‘ग्रामहित’ची अमेरिकेतील 'सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्वर चॅलेंज-2021'साठी निवड झाली होती.

फोर्ब्स' हे मासिक वर्षातून केवळ आठ वेळा प्रकाशित होते. यात वित्त,उद्योग, गुंतवणूक आणि विपणन या विषयावरील लेख प्रसिद्ध होतात. फोर्ब्स चे यादीत स्थान मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. नव्या सामाजिक उद्योजकांना प्रोत्साहन देईल, अशा अशा कंपन्यांची कामगिरी फोर्ब्स मांडते. यंदा निवड प्रक्रियेत 650 कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.

बातम्या आणखी आहेत...