आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. शेतकऱ्यांनी अंबानी-अदानींच्या वस्तूंवर बहिष्कार टाकू, असे म्हटले होते. गुरुवारी सोनिपतच्या एका रिलायन्स स्टोअरला शेतकऱ्यांनी टाळे ठोकले.
सिंघू सीमेवर गुरुवारी शेतकरी नेते बुटासिंह म्हणाले की, कायदे रद्द करण्याबाबत आतापर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलक आता रेल्वेगाड्या रोखतील. लवकरच त्याच्या तारखेची घोषणा करू. शेतकरी नेते म्हणाले, आंदोलनास दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी उलटून गेला आहे, पण कायदे मागे घेण्याची सरकारची भूमिका दिसत नाही. कृषी हा राज्यांचा विषय असताना केंद्र त्याबाबतचे कायदे कसे काय आणू शकते, असा प्रश्न शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी उपस्थित केला.
दुसरीकडे नव्या संसद भवनाच्या शिलान्यास समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखांच्या पहिल्या गुरूंची काही वचने उद्धृत केली. ‘गुरुनानक देव यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत जग असेल, तोपर्यंत संवाद सुरू राहावा. देशात धोरणांमध्ये फरक असू शकतो, पण आमचे अंतिम उद्दिष्ट लोकांची सेवा हेच आहे. त्यामुळे संसदेत असो की संसदेबाहेर, वाद-संवाद, राष्ट्रसेवेचा संकल्प, राष्ट्रहिताबाबत समर्पणाची भावना सतत दिसावी.’
शेतकरी-सरकार चर्चेस तयार, पण पुढाकाराची प्रतीक्षा
सरकार आणि शेतकरी पुन्हा चर्चेसाठी तयार आहेत, फक्त एकमेकांच्या पुढाकाराची प्रतीक्षा आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले,‘शेतकऱ्यांनी कोणत्याही क्षणी चर्चेसाठी यावे, आम्ही तयार आहोत. आमच्या प्रस्तावात एखादी गोष्ट राहिली असेल किंवा इतर त्रुटी असतील तर त्याही सांगाव्यात. चर्चा संपलेली नाही, त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याची घोषणा योग्य नाही. सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करा. मग तुम्ही म्हणाल तेव्हा चर्चा करू.’ उत्तरात शेतकरी नेत्यांनी म्हटले,‘आम्ही चर्चेचा मार्ग बंद केला नाही. सरकार दिशाभूल करत आहे. त्यामुळे आंदोलन तीव्र केले. सरकारने दुसरा प्रस्ताव पाठवला तर आम्ही त्यावर विचार आणि चर्चा करू.’
अण्णा हजारेंचा इशारा- शेतकऱ्यांचे ऐका, अन्यथा लोकपालसारखे आंदोलन
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी इशारा दिला आहे की, केंद्राने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला नाही तर लोकपालसारखे जन आंदोलन करू.
हरियाणाचे उपमुख्यमंत्री चौटाला म्हणाले, एमएसपीची मागणी केंद्र सरकारने स्वीकारली; आता निर्णय शेतकरी संघटनांवर
हरियाणाचे उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पार्टीचे (जेजेपी) नेते दुष्यंत चौटाला यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत कुठलीही जाहीर टिप्पणी केली नव्हती. आता त्यांनी चुप्पी तोडून म्हटले आहे की, केंद्र सरकारने एमएसपीची मागणी मान्य केली आहे, आता निर्णय शेतकरी संघटनांनी घ्यायचा आहे. शेतकऱ्यांना लवकरच आपले फायदे समजतील, असा विश्वास मला आहे.
शेतकऱ्यांनी दिला आहे राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा
शेतकऱ्यांनी आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देताना राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जातील, दिल्लीकडे येणारे रस्ते ब्लॉक केले जातील आणि भाजप नेत्यांना घेराव घातला जाईल, असे म्हटले आहे.
सोनिपतमध्ये शेतकऱ्यांनी रिलायन्सच्या स्टोअरला ठोकले कुलूप
सोनिपतमध्ये रिलायन्स स्टोअरला कुलूप लावल्यानंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह तेथेच धरणे आंदोलन केले. स्टोअर मॅनेजर चांद सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी घोषणा देत दुकानाला टाळे ठोकले. व्यवस्थापनाला याची माहिती दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.