आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली नव्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर जमलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना गृहमंत्री अमित शहांनी शनिवारी सायंकाळी चर्चेचे आवाहन केले. भारतीय किसान युनियनचे पंजाब अध्यक्ष जगजित सिंह म्हणाले की, अमित शहा यांनी सशर्त लवकर भेटण्याचे सांगितले आहे, ते योग्य नाही. त्यांनी विनाअट मोकळ्या मनाने चर्चेची तयारी दाखवायला हवी. ते पुढे म्हणाले की, आम्ही रविवारी बैठकीनंतर सरकारला आमचे म्हणणे सांगू. याआधी केंद्राने शेतकऱ्यांना ३ ऐवजी १ डिसेंबरला चर्चेचा प्रस्ताव दिला आहे.
शनिवारी गृहमंत्री शहा यांनी पंजाबचे शेतकरी नेते बलबीरसिंह राजेवाल, जोगिंदरसिंह उग्राहा, झंडा सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी शेतकरी नेत्यांना सांगितले की, केंद्र शेतकऱ्यांच्या मागणीवर विचार करत आहे. म्हणून आता सरकार शेतकऱ्यांसोबत ३ ऐवजी १ डिसेंबरला बैठकीसाठी तयार आहे. बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेतला जाईल.
सायंकाळी उशिरापर्यंत शेतकऱ्यांची बैठक, केंद्राच्या निमंत्रणावर चर्चा
शेतकरी नेते म्हणाले, आमच्या सर्व संघटनांची रविवारी सकाळी ११ वाजता एक बैठक होईल. यानंतरच केंद्र सरकारसोबतच्या चर्चेची भूमिका मांडू. बैठकीनंतर काही बदल झाल्यास त्याबाबत केंद्राला माहिती दिली जाईल. दरम्यान, सायंकाळी उशिरा शेतकऱ्यांची बैठक सुरू होती. यात केंद्र सरकारच्या निमंत्रणावर चर्चा सुरू होती.
केंद्राचा आग्रह : शेतकऱ्यांनी बुराडी मैदानावर यावे, सर्व सुविधाही पुरवू
शेतकऱ्यांनी दिल्लीच्या निरंकारी भवनातील बुराडी मैदानात येऊन तेथे सभा घ्याव्यात, असा आग्रह केंद्राने केला आहे. तेथे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मूलभूत सुविधांसोबतच गरज भासल्यास वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जातील. या प्रस्तावावर विचार करत असल्याचे आंदोलक शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.
गुरुद्वारा प्रबंधक समितीचा लंगर नाकारला, स्वत: जेवण बनवणार
दिल्लीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी दिल्ली गुरुद्वारा प्रबंध कमिटीने लंगरच्या व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांना ऑफर दिली होती. ती शेतकरी नेत्यांनी अमान्य केली आहे. शेतकरी नेते म्हणाले, पंजाबातील शेतकरी तयारीनिशी आले आहेत. आमच्याकडे ४ ते ६ महिन्यांचा शिधा आहे. यामुळे आम्ही आमचा लंगर चालवू.
आंदोलनावर खट्टर आणि अमरिंदर यांच्यात वाक्युद्ध
पंजाबच्या काँग्रेस सरकारवर हरियाणाचे सीएम मनोहरलाल खट्टर यांनी तिसऱ्या दिवशीही शाब्दिक हल्ला केला. आंदोलन काँग्रेस प्रायोजित असल्याचा आरोप करत खट्टर म्हणाले की, त्यांना पक्की खबर मिळाली आहे की, शेतकरी आंदोलनात अनेक समाजकंटक घुसले आहेत. त्यावर खट्टर यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी पंजाबचे सीएम अमरिंदरसिंग यांनी केली. ते म्हणाले की, खट्टर यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी तरच त्यांच्यासोबत चर्चा करू.
दुसरीकडे, संतप्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर तंबू ठोकला
पानिपत | गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर जाण्यास सांगितले. त्यावर शेतकरी नेते म्हणाले, आम्ही आमच्या मागण्यांसाठी दिल्लीला घेरण्यास निघालो आहोत, स्वत:ची कोंडी करण्यासाठी नव्हे. जंतरमंतरवर जाऊ दिले नाही, यामुळे आता सिंघू व टिकरी बॉर्डर जाम करू. शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर तंबूच ठोकला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.