आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकहून मुंबई विधानसभेच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित करण्यात आला आहे. शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी ही माहिती दिली आहे.
शेतकऱ्यांचा लाँग मार्च सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे आहे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी नेते जे. पी. गावित म्हणाले, सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत ही माहिती देऊन त्याबाबतचे निवेदन पटलावर ठेवले आहे. सर्व मोर्चेकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. तसेच, उर्वरित मागण्याही लवकरच मान्य होतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे जे. पी. गावित म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
कांदा उत्पादकांना अनुदान द्यावे, जमीन कसणाऱ्या आदिवासींच्या नावावर ती जमीन करावी, कर्ममाफी द्यावी, यासह 14 प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च काढण्यात आला होता. किसान सभेच्या शिष्टमंडळांसोबत गुरुवारी सायंकाळी विधान भवनात अडीच तास मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. या बैठकीबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन केले. त्यात कांदा अनुदानात ५० रुपयांची वाढ करून आता 350 रुपये करण्यात आली आहे. तसेच वनजमिनींबाबत मंत्री, शासकीय अधिकारी आणि भारतीय किसान सभेच्या नेत्यांची संयुक्त समिती नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, आश्वासनाचे आदेश काढल्याशिवाय ठाणे येथून आंदोलक उठणार नाहीत, असा इशारा भारतीय किसान सभेने दिला होता. मात्र, आज आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा माजी आमदार आणि किसान सभेचे नेते जे. पी. गावित यांनी केली.
आंदोलन मागे घेणार की नाही?
आज पत्रकार परिषदेत जे. पी. गावित म्हणाले की, आता सध्या आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत. आमच्या उर्वरित मागण्या विचाराधीन असल्याचे सरकारने सांगितले आहे. सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले आहे, त्याबाबत मोर्चेकरांशी चर्चा करून आंदोलन मागे घ्यायचे की नाही, हे ठरवणार असल्याचे जे. पी. गावित म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे निवेदन समाधानकारक
जे. पी. गावित यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी ज्या निर्णयांची घोषणा केली होती त्या निर्णयांची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे सुपूर्द केली आहे. आमच्यापर्यंत आलेले निवेदन समाधानकारक आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची प्रत विधानसभेच्या पटलावरही ठेवली आहे. उर्वरित मागण्या काही दिवसांत नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळे आता आंदोलन स्थगित करत आहोत. ही भूमिका घेऊन मोर्चेकरांशी चर्चा करू. त्यानंतर आंदोलन पुढे न्यायचे कि मागे घ्यायचे, याचा निर्णय घेणार असल्याचे गावित म्हणाले.
समितीत अजित नवलेंचा समावेश नाही
दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी एक समिती स्थापन केली आहे. विशेष म्हणजे या समितीत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांचा समावेश केला नसल्याचे समोर आले आहे. या समितीत डॉ. अजित नवले यांचाही समावेश असावा, असे आमदार विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे आणि जे. पी. गावित यांनी मुख्य सचिवांना सांगितल्याची माहिती आहे. तरीही सरकारकडून अजित नवलेंचा समितीत समावेश करण्यात आला नाही. देवेंद्र फडणवीस यांनीच अजित नवलेंच्या नावाला विरोध केल्याची चर्चा आहे. याबाबत डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे की, मी समितीत नसलो तरी आमचे सहकारी व आमदार विनोद निकोले सरकारला पुरुन उरतील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या धसास लावतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.