आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाझीपूर बॉर्डरवर ॲक्शन-रिॲक्शन:मध्यरात्री शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच, आज मुझफ्फरनगरात महापंचायत; सिंघू बॉर्डरही चारी बाजूंनी सील

गाझीपूर बॉर्डर /सिंघू बॉर्डर/पानिपतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ॲक्शन: प्रचंड फौजफाटा शेतकऱ्यांना हटवण्यास गेला, रिअॅक्शन: यूपी-हरियाणातून शेतकऱ्यांचा हुंकार

दिल्ली-उत्तर प्रदेशच्या गाझीपूर सीमेवर दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन गुंडाळण्यासाठी यूपी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता धरणे आंदोलन स्थळ चारही बाजूंनी सील केले. पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यासह शेतकऱ्यांना जागा रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली. शेतकरी नेते राकेश टिकैत रडत म्हणाले, ‘ही तर शेतकऱ्यांच्या कत्तलींचीच तयारी आहे.’ परिणामी रात्रीपर्यंत हरियाणा व प. यूपीत जागोजाग शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. रात्री ११ वाजेनंतर अनेक भागांतून शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली. जिंद येथे हायवे जाम केला. हरियाणा-यूपीत रात्रीच खाप पंचायतींनी दिल्लीला जाण्याची घोषणा केली. हरियाणाच्या भिवानीहून १ हजार ट्रॅक्टर्सवर बसून हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. दुसरीकडे मीरत, मुझफ्फरनगर, गाझियाबाद, शामली व बागपतहून शेतकऱ्यांनी रात्री ११ वाजेनंतर दिल्लीकडे कूच केली. दोन्ही राज्यांत परिस्थिती चिघळत असल्याचे पाहता गाझीपूर बॉर्डरवर कारवाईच्या आदेशाची प्रतीक्षा करत असलेल्या पोलिसांनी माघार घेण्यास सुरुवात केली.

टर्निंग पॉइंट... टिकैत धरणे मागे घेण्यास राजी होते, भाजप आमदाराच्या धमकीमुळे अडून बसले
सायंकाळी ६ वाजता राकेश टिकैत अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत आंदोलन स्थळावरून हटण्यास तयार झाले होते. तेव्हा आंदोलनस्थळी भाजप आमदार नंदकिशोर समर्थकांसह पोहोचले. ते म्हणाले-आंदोलन करणाऱ्यांना रविवारपर्यंत हटवा, अन्यथा आम्ही हटवू, असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर टिकैत भडकले. ते म्हणाले,‘भाजपचा आमदार पोलिस दलासह शेतकऱ्यांना ठार मारण्यासाठी आला आहे. त्यामुळे आता आम्ही कुठेही जाणार नाही.’ त्यानंतर टिकैत यांनी देवेंद्र प्रताप सिंह नावाच्या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले.

हाय अलर्ट... रात्री १० वाजता यूपीत टिकैत यांच्या गावी घोषणा- प्रत्येक शेतकरी गाझीपूरला जाईल
मुझफ्फरनगर | गाझीपूर सीमेवर बदलती स्थिती पाहता रात्री १० वाजता मुझफ्फरनगरच्या सिसौली गावात राकेश टिकैत यांच्या घरी ‘गाझीपूर कूच’च्या घोषणा देत गर्दी जमली. जाट नेते रालोद प्रमुख अजित सिंह यांनी टिकैत यांना फोन करून आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. याबरोबरच पूर्ण प्रकरणात जाट राजकारणाचा प्रवेश झाला. मीरत, मुझफ्फरनगर, गाझियाबाद, शामली, बागपत या जाटबहुल गावांतून गाझीपूरसाठी कूच सुरू झाली. मुझफ्फरनगरचे भाजप खासदार संजीव बालियान लोकांशी संपर्क साधून आंदोलनाला पाठिंबा देऊ नये असा संदेश पाठवताना दिसले.

सिंघू बॉर्डरही चारी बाजूंनी सील : आंदोलनाची प्रमुख आघाडी असलेल्या हरियाणाच्या सिंघू बॉर्डरवरही सुरक्षा दलांची तैनाती वाढवली आहे. धरणे स्थळ चारही बाजूंनी सील करण्यात आले आहे. आता तेथे पक्के बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

हमसून रडले राकेश टिकैत, आत्महत्येची धमकीही दिली
सरकार शेतकऱ्यांचे खून करू पाहत आहे. कृषी कायदे मागे घेतले नाही तर मी आत्महत्या करेन. धरणे स्थळ सोडणार नाही. पाणीही पिणार नाही.’

लाल किल्ल्यावर हिंसाचारप्रकरणी राजद्रोहाचा गुन्हा
दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकावणाऱ्या व हिंसाचार करणाऱ्यांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तपासासाठी विशेष टीम स्थापली. आधीच १९ जणांना अटक झाली.पोलिस दीप सिद्धू व गँगस्टर लक्खा सिडाना यांना मुख्य आरोपी मानत आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथके गुरुवारी सायंकाळी सिंघू बॉर्डरवर गेली.

आंदोलनातून आणखी २ संघटनांची माघार : गुरुवारी भारतीय किसान युनियन (एकता) तसेच भारतीय किसान युनियन (लाेकशक्ती) ने आंदाेलन बंद केेले. बुधवारी आणखी दोन संघटनांनी आपले आंदोलन थांबवले होते.

शेतकरी नेत्यांच्या लूकआऊट नोटिसा जारी होणार, पासपोर्टही जप्त करणार : गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लवकरच ३७ शेतकरी नेत्यांच्या लूकआऊट नोटिसा जारी होतील. हिंसेचा आरोप असलेल्या या नेत्यांना पासपोर्ट जमा करण्यास सांगितले जाईल. दिल्ली पोलिस म्हणाले, नेत्यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे हिंसा झाली. त्यांच्याच आवाहनावरून ट्रॅक्टर रॅली झाली.

दीप सिद्धू फरार, व्हिडिओतून शेतकरी नेत्यांना दिली धमकी
दीप सिद्धू फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत. दुसरीकडे दीप सिद्धूने आणखी एक व्हिडिओ जारी करत शेतकऱ्यांचे बिंग फोडण्याची धमकी दिली. शेतकरी नेते बलबीरसिंह राजेवाल म्हणाले,‘दीप भाजपचा एजंट आहे. केंद्र सरकारने त्याच्यामार्फत आंदोलनाच्या बदनामीचा कट रचला व आरोप शेतकऱ्यांवर केले.’

बातम्या आणखी आहेत...