आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलनास 2 महिने पूर्ण:शेतकरी नेत्यांच्या दबावामुळेच पोलिसांविरोधात दिला जबाब, आंदोलनस्थळावर पकडलेल्या तरुणाचे घूमजाव

नवी दिल्ली, सिंघू, कुंडली, गाझीपूर सीमेवरूनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रॅक्टर संचलनास पोलिसांची संमती : शेतकरी संघटना

दिल्लीनजीक हरियाणाच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनस्थळावर पकडलेल्या तरुणाने शनिवारी आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केले. त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून शेतकऱ्यांच्या दबावामुळेच आपण पत्रकारांशी बोललो आणि पोलिसांच्या विरोधात जबाब दिला असे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

योगेश असे या तरुणाचे नाव असून तो सोनिपत (हरियाणा) येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री त्याला आंदोलनस्थळावरील एका तंबूजवळ संशयास्पदरीत्या फिरताना पकडण्यात आले होते. आपण सुपारी किलर शूटर असून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी पोलिसांनी १० हजार रुपये दिल्याचा सनसनाटी दावा केला होता. तसेच ४ शेतकरी नेत्यांची गोळी घालून हत्या करण्याचेही सुपारी देण्यात आली होती. यामध्ये दोन तरुणींसह १० तरुणांनाही कामास लावण्यात आले होते असा दावा त्याने शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. या तरुणास पकडून शेतकरी नेत्यांनी पोलिसांच्या हवाली केले होते. दरम्यान, पोलिस या तरुणाची चौकशी करीत आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, मात्र त्याच्या सोशल मीडिया अकाउंट आणि कॉल रेकॉर्डची तपासणी केली जात आहे असे पोलिसांनी सांगितले.

गाडीची काच फोडताना व्हिडिओ : शेतकरी नेत्याच्या वाहनाची काच फोडतानाचा आणखी एक व्हिडिओही शनिवारी समोर आला आहे. पोलिसांनीच गाडीची काच फोडली असा दावा केला, मात्र एक व्यक्ती गाडीची काच फोडत असताना शेतकरी नेता मागे उभा असलेला दिसत आहे.

सरकारच्या प्रस्तावावर ३२ शेतकरी संघटनांची बैठक
कृषी कायद्यांची अंमलबजावणी २ वर्षे स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने दिला आहे. या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर आंदोलनात सहभागी सर्व ४० शेतकरी संघटनांची बैठक झाली. केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी यापूर्वीच फेटाळला आहे हे विशेष.

त्या शेतकरी नेत्यांना विरोध न करण्याचे आवाहन
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकरी नेत्यांना विरोध करू नये, मात्र राजकीय कार्यक्रमांमध्ये नेते-मंत्र्यांना विरोध केला जाईल, असे चढूनी यांनी स्पष्ट केले.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची समर्थन रॅली
ट्रॅक्टर परेडच्या समर्थनार्थ आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये शनिवारी अनेक ठिकाणी बाइक रॅली काढली, तर काँग्रेसने मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये राजभवनला घेराव घातला. भोपाळमध्ये राजभवनला घेराव घालणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पिटाळण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.

ट्रॅक्टर संचलनास पोलिसांची संमती : शेतकरी संघटना
२६ जानेवारी रोजीच्या ट्रॅक्टर संचलनास दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे, असा दावा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे. पोलिसांसोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी सांगितले की, गाझीपूर,सिंघू आणि टिकरी सीमेवरून संचलनास सुरुवात होईल. संपूर्ण कार्यक्रमाच्या आराखड्यास रात्री उशिरापर्यंत अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

आंदोलनास दोन महिने पूर्ण
कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनास रविवारी दोन महिने पूर्ण होत आहेत. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारसोबत चर्चेच्या १२ फेऱ्या झाल्या आहेत. सर्व चर्चा आतापर्यंत निष्फळ ठरल्या आहेत. २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन बसले आहेत.

किसान गणतंत्र परेड
या ट्रॅक्टर संचलनास ‘किसान गणतंत्र परेड’ असे नाव देण्यात आले आहे. २६ जानेवारी रोजी सर्व बॅरिकेड्स हटवण्यात येतील, असे शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले, तर शेतकऱ्यांची प्रचंड संख्या पाहता परेडचा कोणताही एक मार्ग निश्चित नसेल, असे अन्य एक शेतकरी नेते गुरनामसिंह चढूनी यांनी सांगितले.