आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. यामुळे मुस्लिम चेहरा पुढे करुन सत्ताधारी NDA ला आव्हान देण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या विरोधकांना जबर धक्का बसला आहे. अब्दुल्ला म्हणाले - 'माझी आजही जम्मू काश्मीरला गरज आहे. कलम - 370 रद्द झाल्यानंतर खोऱ्यातील स्थिती बिघडली आहे. आता तिथे निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे माझे तिथे असणे गरजेचे आहे. संयुक्त विरोधक जो उमेदवार देतील त्याला आमचा पूर्ण ताकदीने पाठिंबा असेल.'
अब्दुल्लांनी मानले विरोधकांचे आभार
माजी मुख्यमंत्री म्हणाले -विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी माझे नाव प्रस्तावित केल्यामुळे माझा गौरव झाला आहे. बैठकीत ममता बॅनर्जींनी माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर अनेक नेत्यांनी मला फोन करुन पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली.
15 जून रोजी दिल्लीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची एक बैठक झाली होती. त्यात शरद पवार, फारुख अब्दुल्ला व गोपाल गांधी यांच्या नावावर एकमत झाले होते. पवारांनी बैठकीनंतर लगेचच आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर बहुतांश विरोधी पक्षांनी अब्दुल्लांच्या नावावर तयारी दर्शविली होती.
पुढील 2 दिवसांत पुन्हा बैठक
ममता बॅनर्जींच्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना, भाकप, माकप, भाकप-एमएल, पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी, जेडीएस, आरएसपी, आययूएमएल, राष्ट्रीय लोकदल व झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सहभागी झाले होते. या प्रकरणी येत्या 20-21 तारखेला पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.
कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला संपणार
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 18 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदींनुसार, विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच नव्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानुसार, येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक व त्यानंतर 21 जुलै रोजी निकाल जारी होणार आहे.
यामुळे मजबूत आहे NDA
NDA बहुमताच्या जादुई आकड्यापासून अत्यंत जवळ आहे. कारण, त्यांना ओडिशातील सत्ताधारी बीजेडीच्या नवीन पटनायक व आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींचा पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही नेत्यांची यापूर्वीही भेटही घेतली आहे. या दोघांनीही उमेदवाराचे नाव स्पष्ट झाल्यानंतर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, सद्यस्थितीत पाहता या दोन्ही पक्षांचा पाठिंबा सत्ताधारी एनडीएला असेल हे स्पष्ट आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे मागील राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएने अत्यंत समाधानकारक कामगिरी केली होती. त्यात रामनाथ कोविंद यांना 65.35% मते मिळाली होती. यावेळीही एनडीए याची पुनरावृत्ती करेल असा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.